मुंबई (रिपोर्टर) अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली होती. या मागणीनंतर फडणवीस आपला मोर्चा दिल्लीकडे वळवणार का? असे विचारले जात होते. त्यानंतर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नेते आहेत. ते कोठेही जाणार नाहीत, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. तसेच आगामी काळात फडणवीस भाजपा-शिवसेना युती सरकारचे मुख्यमंत्री असतील, असे मोठे विधानही बावनकुळे यांनी केले. ते अकोल्यात माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
या राज्याचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस करत आहेत. पुढेही करत राहतील. ते दिल्लीला जाणार नाहीत. सध्या येत असलेल्या बातम्या काल्पनिक आहेत. देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत. आगामी काळात ते भाजपा-शिवसेना युती सरकारचे मुख्यमंत्री होतील. आमच्यासारखा कोणताही कार्यकर्ता देवेंद्र फडणवीस यांची बरोबरी करू शकत नाही. या राज्याला देवेंद्र फडणवीसच पुढे नेऊ शकतात. त्यांच्याकडे विकासाचा दृष्टिकोन आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.