बीड (रिपोर्टर) कुठल्याही निर्बंधाशिवाय गणेश उत्सव साजरा केला जाणार असल्याची घोषणा दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे. मात्र जिल्हाभरातील गणेश मंडळांनी स्थानिक पोलिसांचा परवाना घेणे आवश्यक असून तशा सूचना बीड जिल्ह्यातल्या ठाणेप्रमुखांनी हद्दीतील गणेश मंडळांना दिल्या आहेत. आपल्या हद्दीतील पोलीस ठाण्यातून परवाना घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या सूचना ठाणेप्रमुखांनी संबंधित गणेश मंडळांना माध्यमांच्या मार्फत देऊन ऑनलाईन परवाना घेण्याचे आवाहन केले आहे.
गेली दोन वर्षे कोरोनामुळे निर्बंधात अनेक उत्सव झाले नाहीत. काल-परवा दहीहंडीचा उत्सव राज्यभरात निर्बंधाशिवाय झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गणेश उत्सवासह अन्य उत्सव निर्बंधाशिवाय होणार असल्याचे घोषीत केले. बीड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या ठाणेदारांनी सोशल मिडियावर गणेशोत्सव 2022 बाबत सूचना व्हायरल केल्या असून त्यामध्ये यावर्षी कुठल्याही निर्बंधाशिवाय श्रीगणेशोत्सव साजरा करण्यात येणार असून गणपती स्थापनेसाठी स्थानिक पोलीस पोलीस प्रशासनाकडे ऑनलाईन अर्ज करून परवानगी घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. या परवानगीसाठी अध्यक्षाचा फोटो, आधारकार्ड, जागा मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र, धर्मादाय आयुक्त नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. गणेश मंडळांनी श्रीगणेशाची स्थापना करण्यासाठी ऑनलाईन प्रमाणपत्र काढावा, असे आवाहन आणि ऑनलाईन परवाना काढण्याबाबतच्या आवश्यक लिंक दिल्या आहेत.