बीड (रिपोर्टर)ः- गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात ऊसाचे गाळप झाले. मे, जून पर्यंत कारखाने चालले. अतिरिक्त ऊसामुळे उशिरापर्यंत कारखाने सुरू ठेवावे लागले. येत्या काही महिन्यात दुसरा गळीत हंगाम सुरू होईल. मात्र अनेक शेतकर्यांचे अद्यापही पैसे कारखानदारांनी दिले नसल्याचे समोर आले आहे. ज्या शेतकर्यांचे पैसे थकीत आहे. त्यांचे पैसे ऊस गाळपाच्या पंधरा दिवसात अदा करण्याच्या सुचना साखर सहसंचालक कार्यालयाकडून देण्यात आल्या आहे.
सलग तिन वर्ष बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात चांगला पाऊस पडला. या पावसामुळे जिल्हाभरातील सर्व तलावे पुर्णतः भरले होते. पाणी भरपूर असल्यामुळे ऊसाची लागवड वाढली. ऊस अतिरिक्त ठरला. गत हंगामामध्ये ऊस उत्पादक शेतकर्यांची मोठी तारांबळ उडाली. उसाचं सर्व गाळप करण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्यानंतर मे, जुन पर्यंत कारखाने सुरू ठेवण्याचे निर्देश सहकार विभागाचे होते. बीड जिल्ह्यातील गेवराई, माजलगांव, अंबाजोगाई, परळी या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस होता. जिल्ह्यातले काही कारखाने बंद होते. तर सात कारखाने सुरू होते. गेल्या हंगामातल्या अनेक शेतकर्यांचे पैसे अद्यापही कारखानदारांने दिले नसल्याचे समोर आले आहे.
सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्यांकडे 34 कोटी 77 लाख 94 हजार, जयभवानी 10 कोटी, 13 लाख, 20 हजार, जय महेश 18 कोटी 93 लाख 34 हजार, वैद्यनाथ 15 कोटी 40 लाख 25 हजार, येडेश्वरी 1 कोटी 52 लाख 7 हजार रुपयांची थकबाकी आहे. दरम्यान हे पैसे कारखान्याने ऊस गाळपाच्या पंधरा दिवसात अदा कराव्यात अशा सुचना प्रादेशीक साखर सहसंचालकांनी दिल्या आहेत.