बीड (रिपोर्टर) जिल्ह्यामध्ये सर्वत्र गुटखा माफियांनी उच्छाद् मांडला असून महिन्याभराच्या कालखंडामध्ये निव्वळ गुटख्याची खरेदी-विक्री 50 कोटींच्या पुढे असल्याचे सांगण्यात येत असून काल माजलगाव ग्रामीण पोलीस व जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या पथकाने बीड-माजलगाव या ठिकाणी छापे मारून तब्बल 12 लाख रुपयांच्या आसपास गुटखा पकडून आरोपींच्या मुसक्या बांधल्या. बीडच्या मोमीनपुरा भागात गुटख्याबरोबर दोन माफियांना जेरबंद करून एसपींच्या पथकाने पेठ बीड पोलिसांच्या स्वाधीन केले मात्र पेठ बीड पोलिसांनी गुटखा माफियानां सोडून दिल्याची जोरदार चर्चा होत असून पेठ बीड पोलिसांनी मात्र आरोपी पोलिसांच्या हाताला झटका मारून पळून गेल्याचे सांगत आहेत. जेव्हा या प्रकरणात ओरड झाली आणि हे प्रकरण आपल्या अंगलट येईल म्हणून संबंधितांवर पळून गेल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक असे की, बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुटख्याची तस्करी होते, महिन्याकाठी 50 कोटींच्या पुढे उलाढाल होत असल्याचे सर्वश्रूत आहे. अशा स्थितीत गुटख्याला आळा घालण्याच्या हेतुने काही पोलीस गुटखा माफियांवर छापे मारत आहेत. काल जालना येथून माजलगावकडे येत असलेला गुटखा सादोळ्याजवळ पकडला. सदरचा गुटखा हा ट्रक क्र. (एम.एच. 13 डी.ओ. 1776) यामध्ये होता. सदरचा गुटखा हा तब्बल 3 लाख 7 हजार 200 रुपयांचा असून माजलगाव पोलिसांनी या प्रकरणी बाळू बाबासाहेब बहिरवाळ (रा. घोसापुरी ता. जि.बीड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सपोनि. निलेश विधाते, अमलदार अनिल आसेवार यांनी केली तर दुसरीकडे गुटखा माफियांचे माहेरघर म्हणून संबोधल्या जाणार्या बीड शहरात जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या पथकाने छापा टाकला. शहरातल्या मोमीनपुरा भागात पिकअप क्र. एम.एच. 20 सीटी 3517 मधून गुटखा जात होता. तो या पथकातील पोलिसांनी पकडला. या पिकअपमधला गुटखा हा सुमारे 8 लाख 82 हजार रुपये किमतीचा होता. सदरचा गुटखा पकडून त्यासोबत गुटखा माफिया शेख मोहसीन शेख सलाउद्दीन (वय 28, रा. खाजा नगर, मोमीनपुरा बीड), शेख एकबाल शेख रशीद (रा. बार्शी रोड, बीड) या दोघांनाही ताब्यात घेऊन गुटख्यासह आरोपींना पेठबीड पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमर ठाकूर यांचे विशेष पथकप्रमुख सपोनि. विलास हजारे आणि त्यांच्या पथकाने केली. दोषींवर गुन्हाही दाखल करण्यात आला मात्र अवघ्या काही तासात हे दोन्ही आरोपी पोलीस ठाण्यामध्ये दिसून आले नाहीत. त्यामुळे पेठ बीड पोलिसांनी आरोपींना सोडून दिल्याची चर्चा सुरू झाली. सदरचं प्रकरण हे गंभीर होतय हे लक्षात आल्यानंतर पेठ बीड पोलिसांनी गुटख्यासह पकडलेले आरोपी हे पोलिसांचा हात झटकून पळून गेल्याची तक्रार करत तशा आशयाचा गुन्हा दाखल केला. सदरचं प्रकरण हे पेठ बीड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलं. विशेष म्हणजे एसपींच्या पथकाने आरोपींना पेठ बीड पोलिसांच्या हवाली केल्यानंतर त्या आरोपींना कोठडीत टाकणं हे पेठ बीड पोलिसांचं कर्तव्य असताना ते आरोपी एसपींचे पथक जाताच पळून कसे जातात? असे एक ना अनेक प्रश्न यावरून उपस्थित होत असून पथकांनी छापे टाकायचे, ठाणेप्रमुखांनी माफियांना आर्थिक देवाण-घेवाणीतून अभय द्यायचं म्हणजेच ‘हमाम मे सब नंगे’ या भूमिकेत तर बीडची पोलीस यंत्रणा काम करत नाही ना, अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.