पशुसंवर्धन अधिकारी सतर्क; जनावरांची काळजी घ्यावी ,
2 गायींचे नमुने पॉझिटिव्ह, एका गावचा अहवाल येणे बाकी बाधित जनावरांपासून 5 कि.मी अंतरावर लसिकरण सुरू
आष्टी (रिपोर्टर):- सतत संकटाचा सामना करणार्या बळीराजाच्या पशुधनावर लम्पी आजाराने आक्रमण केले आहे.शेजारील अहमदनगर जिल्ह्यात लम्पी ने थैमान घातले असून आता आष्टी तालुक्यातील इमनगांव,देवळाली येथे प्रादुर्भाव आढळून आला आहे.2 जनावरांना बाधा झाली असून, तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकारी या रोगापासून जनावरांचा बचाव व्हावा, यासाठी युद्धपातळीवर कामाला लागले आहेत.लम्पी स्किन या संसर्गजन्य आजाराने तालुक्यात शिरकाव केल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे. तालुका पशुसंवर्धन विभागाच्या अधिकार्यांनी गावा-गावात जनावरांमधील लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव आणि प्रसार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना व जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.
आष्टी तालुका पशुसंवर्धन विभागाने संशय आल्याने इमनगांव,फत्तेवडगांव, देवळाली येथील जनावरांचे नमुने पुणे येथील प्रयोग शाळेत पाठवले होते.तपासणीमध्ये 2 गावातील 2 गायी बाधित असल्याचे आढळले आहे.अजुन फत्तेवडगांवचा अहवाल येणे बाकी आहे.तालुक्यातील इमनगांव, देवळाली मध्ये या संसर्गजन्य आजाराने शिरकाव केल्याने पशुसंवर्धन विभागाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. रोगाचा प्रसार बाह्य डास, माश्या, गोचिड किटकनाशकांपासून होत असल्याने आजारी नसलेल्या सर्व जनावरांवर तसेच गोठ्यात बाह्य कीटकांच्या निर्मूलनासाठी औषधांची फवारणी करावी,बाधित परिसरात स्वच्छता तसेच निर्जंतुक द्रावणाची फवारणी करावी, नजिकच्या पशूवैद्यकीय दवाखान्यात कळवावे,अशा प्रकारे सोशल मीडिया द्वारे पशुसंवर्धन विभाग जनजागृती करत आहे.
बाधित जनावरांच्या 5 कि.मी.अंतराच्या
परिसरातील जनावरांचे लसीकरण सुरू
हा आजार संसर्गजन्य आहे. पशूपालकांनी घाबरून जाण्यासारखे नाही परंतु काळजी घ्यावी. बाधित जनावरे तात्काळ वेगळी करावी. गोठ्यामध्ये किटकांच्या निर्मुलनासाठी औषधांची ची फवारणी करावी. बाधित जनावरांपासून 5 कि मी अंतरावर लसिकरण करण्यात येत आहे.जनावरांना लम्पी स्कीनची लक्षणे आढळल्यास त्वरित तालुका पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा.
-डॉ. मंगेश ढेरे, (पशूधन विकास अधिकारी,आष्टी)