बीड (रिपोर्टर) आपआपल्या मतदारसंघामध्ये गावागावातील लोकांना आम्ही आश्वासने दिलेली होती. राज्यात जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हा आमच्याकडे दुर्लक्ष होत गेले, पक्ष कमकुवत होत चालला, पुढच्या निवडणुकांना कसे सामोरे जायचे? लोकांचे कामच केले नाही तर असे एक ना अनेक कारणे पक्ष सोडण्यामागे असल्याचे सांगत शिवसेनेसोबत भांडण-तंटा अथवा बाकी संघर्षाचा विषय नसल्याचे बहुचर्चित आमदार शहाजी बापू पाटील यांनी म्हटले.
काय झाडी, काय डोंगर, काय हॉटील या वक्तव्यामुळे सर्वत्र परिचीत असलेले आ. शहाजी बापू पाटील हे काही कामानिमित्त बीड येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अजिबात नाराज नाहीत. फडणवीस हे वैचारिक नेतृत्व आहे. त्यामुळे नाराज होण्याचा संबंध नसल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. आज सकाळी आ. शहाजी बापू पाटील हे शासकीय विश्रामगृहावर आले होते. या वेळी त्यांच्याशी काही पत्रकारांनी संवाद साधला. फडणवीस भाजपामध्ये नाराज आहेत का? असा प्रश्न त्यांना विचारला असता पाटील म्हणाले की, भाजपा पक्ष वेगळ्या विचाराचा आहे. भाजपातील अनेक नेत्यांनी पक्षासाठी मोठा त्याग केलेला आहे. फडणवीस हे एक वैचारिक नेतृत्व असून ते पक्षावर कशाला नाराज होतील, असे पाटील यांनी म्हटले आहे. शिवसेना सोडण्याबाबत बोलताना ते म्हणाले की, आघाडी सरकारच्या काळामध्ये आमचे कामे होत नव्हते, पक्ष कमकुवत होत चालला होता. लोकांना जी आश्वासने दिले ते पर्ण करता येत नव्हते, म्हणून हा निर्णय घेतला गेला. दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात काय झाले हे माहित नाही परंतु अजित पवारांनी पहाटे शपथ घेतली होती हेही तेवढेच खरे. अजित पवार कुठेही गेले तरी त्यांना मान-सन्मान मिळेल आणि पक्षालाही त्यांचं ऐकून घ्यावं लागेल, असेही शहाजी बापू यांनी म्हटले.