ग्राऊंड रिपोटींग- शेख रिजवान

ground reporting copy 2ground reporting copy 2
ground reporting copy 2ground reporting copy 1

कोडिन व कॉस्मेटीक पदार्थाचा जास्त प्रमाणात वापर केल्याने बीड शहरात गेला एकाचा बळी तर अनेक संसार उद्धवस्ताच्या मार्गावर; कोरोना काळात कोडिनयुक्त औषध मिळत नसल्याने तो तरूण खात होता ब्रेडला लावून बाम, मरणापुर्वी त्या तरूणाने सहन केल्या भयानक वेदना; ड्रग्जच्या आहारी बळी गेलेल्या तरूणाच्या परिवाराची बिकट अवस्था; आई, पत्नी व मुलगी मजुरी करून भागवतात उपजिविका, त्यांना मदतीची गरज; नशा करणार्‍या तरूणांनी बोध घ्यावा; शहरात या ड्रग्जच्या सेवनामुळे अनेक परिवार भयभीत, वेदना सहन करून कुटुंबातील सदस्य जगतायत जीवन; तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जाता-जाता कोडिनयुक्त औषधी संदर्भात विशेष लक्ष देण्याचे औषध प्रशासन यांना दिल्या सूचना; ड्रग्जचे जाळे ग्रामीण भागात पसरण्यापुर्वीच कोडिनयुक्त औषधाच्या अवैध विक्रीवर लगाम लावण्याची गरज; शहरात कोडिनयुक्त औषध, झोपेच्या गोळ्या विकणारी टोळी सक्रीय असल्याची मिळाली माहिती; बीड शहरात 20 दिवसापूर्वी, तुझ्यामुळे माझ्या धंद्यावर रेट पडलीच्या कारणावरून तरूणाला मारहाण करण्यात आली असल्याची तक्रार बीड शहर ठाण्यात दाखल, तपास सुरू असल्याची मिळाली माहिती; फिर्यादी अद्यापही न्यायाच्या प्रतिक्षेत, ती मारहाण ड्रग्ज विक्रीवरून झाल्याची चर्चा; दै.रिपोर्टरशी गेल्या दोन वर्षापासून ड्रग्ज नशामुक्तीसाठी विशेष मोहिम, रिपोर्टरच्या वृत्तामुळे भारतातील नऊ राज्यात अवैध कोडिनयुक्त औषधाच्या विक्रीची चौकशी सुरू; राष्ट्रीय पातळीवर कारवाईची गरज; काही वृद्ध व तरूण शहरातील एखाद्या दवाखान्यात जावून घेतात एक विशेष इंजेक्शन, त्या इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची चर्चा; कोणत्या औषध दुकानावरून या इंजेक्शनची विक्री झाली त्या अनुषंगाने तपास करण्याची गरज; तात्पुर्ती शक्ती वाढवण्यासाठी ते इंजेक्शन फायदेशीर असले तरी त्या इंजेक्शनचा रोज वापर केल्याने होतात जीवघेणे आजार, परंतू अनेकांना लागले त्या इंजेक्शनचे व्यसन; ड्रग्जच्या व्यसनमुक्तीसाठी शहरातील उलेमा इकराम, नगरसेवक व समाजसेवक सरसावले, दि.13 फेब्रुवारी रोजी जुना दारूल उलुम येथे पालक व कॉलेज विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती मेळावा, दररोज मस्जिदमधून या नशेपासून लांब राहण्यासाठी आवाहन
कोडिनयुक्त औषध असो की औषधातील कोणतेही ड्रग्ज असो त्याचा जास्त प्रमाणात वापर केल्यास शरिरासाठी हानीकारक असते. खोकल्याच्या औषधाचा नशेसाठी वापर होत असल्याने कोडिनयुक्त खोकल्याच्या औषधावर औषध प्रशासनाने विक्रीसाठी प्रतिबंध लावलेले आहेत. खोकल्यासाठी उपयुक्त असलेले हे औषध नशेसाठी वापरत असल्याने याचा मोठ्या प्रमाणात दुरूपयोग होवू लागला. ही बाब राज्य शासनाच्या लक्षात आल्यानंतर संपूर्ण राज्यात कोडिनयुक्त औषधासह ड्रग्ज म्हणून वापरण्यात येणार्‍या गोळ्यांवरही राज्य शासनाने राज्यभरात प्रतिबंध लावले. राज्यातील औषध विक्रेत्यांनी कोडिनयुक्त औषधाचे गांभीर्य लक्षात घेवून गरजू रूग्णांना औषध देवू लागले. एकंदरीत महाराष्ट्र राज्यात कोडिनवर कंट्रोल झाले. कोडिनयुक्त औषधाच्या विक्रीवर राज्य शासनाने कंट्रोल केले असले तरी बीड शहरातील विविध ठिकाणी कोडिनयुक्त औषधाच्या वापरात आलेल्या बाटल्या आढळून येत आहे. या संदर्भात औषध प्रशासनाने मोठी दखल घेतली असून शहरात आढळून आलेल्या बाटल्यावरील बॅच नंबरच्या सहाय्याने औषध प्रशासन तपास करतांना दिसत आहे. बीड शहरात विविध ठिकाणी आढळून आलेल्या या बाटल्या महाराष्ट्र राज्यातून नव्हे तर इतर राज्यातून बीड शहरात आल्याचे बाटल्यावरील बॅच नंबरवरून दिसून येत आहे. त्यानुषंगाने औषध प्रशासनाचे ड्रग्ज इंस्पेक्टर आर.बी.डोईफोडे गेल्या दीड वर्षापासून पाठपुरावा करत आहेत. परंतू हा विषय इतर राज्याचा असल्याने बीड औषध प्रशासनाची ताकद कमी पडतांना दिसते. जोपर्यंत राष्ट्रीय पातळीवर पुर्णपणे कोडिनयुक्त औषध व ड्रग्ज ज्याचा नशेसाठी वापर होतो अशा औषधाच्या विक्रीवर कंट्रोल होत नाही तोपर्यंत कोडिनयुक्त महाराष्ट्रच काय इतर राज्यही होणार नाहीत. या नशेची भयंकरता पाहता हा नशा नशा करणार्‍यांसाठी व त्याच्या परिवारासाठी किती घातक आहे याची परिकाष्टा करणे शक्यच नाही. अत्यंत भयंकर वेदना सहन करूनही काही तरूण हा नशा आजही करत आहेत. एवढेच नव्हे तर बीड शहरात कोडिन आऊट ऑफ कंट्रोल झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्याचे ताजे उदाहरण पहायला मिळाले ते चार महिन्यापूर्वी. शहरातील शहेंशाहवली दर्गाह परिसरात राहणारा तरूण या ड्रग्जच्या आहारी जावून बळी गेला. ही अत्यंत भयंकर बाब असून सध्या शहरात ड्रग्जचे नशेसाठी वापर होतांना दिसून येत आहे. या नशेचे जाळे ग्रामीण भागात पसरू नये त्यापुर्वीच प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून राष्ट्रीयस्तरावर ज्या औषधाचा नशेसाठी वापर होत असेल अशा औषधाच्या विक्रीवर एकट्या राज्यातच नव्हे तर इतर राज्यातही कंट्रोल करण्याची गरज असून भविष्यात या नशेचे जाळे तरूणांना घेरणार यात काही शंका नाही. तरूणांनीही ज्या घटना नशा करणार्‍या तरूणांसोबत घडत आहेत. यातून बोध घेण्याची गरज आहे.
कोरोना लॉकडाऊनमध्ये सर्व प्रकारचे देशी विदेशी दारूचे दुकाने बंद होती. व्यसन करणारे दारू मिळत नसल्याने हैराण झाले होते. या कोरोना काळात अनेकांची व्यसनमुक्ती झाली तर काही अगळ्या वेगळ्या पद्धतीचा नशा करू लागले. बीड शहरात गेल्या अनेक वर्षापासून खोकल्याच्या औषधापासून (कोडिनयुक्त) तरूण मंडळी नशा करत असल्याची बाब समोर आलेली आहे. परंतू कोरोना लॉकडाऊनमध्ये ड्रग्जपासून नशा करणार्‍या तरूणांना कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज मिळत नसल्याने काही तरूण मंडळी विविध प्रकारचे कॉस्मेटिक पदार्थांपासून नशा करू लागले. दै.रिपोर्टरने गेल्या ग्राऊंड रिपोर्टींगमध्ये कॉस्मेटिक पदार्थापासून नशा करत असल्याची बाब समोर आणून दिलेली आहे. काही तरूण चक्क ब्रेडला बाम लावून ते ब्रेड खाऊन नशा करतात. बीड शहरातील शहेंशाहवली दर्गाह परिसरात राहणारे हसन हे पण अशा प्रकारे कोडिनयुक्त औषध, झोपेच्या गोळ्या व हातात इंजेक्शन घेवून नशा करत होते. कोरोना काळात वरील औषधी नशेसाठी मिळत नसल्याने बे्रडला बाम लावून हसन यांनी व्यसन केले. पंधरा दिवसानंतर त्यांची प्रकृती खालावली. भयानक वेदना होवू लागल्या, नशा मिळत नसल्याने हसन तडपू लागले. त्यानंतर 12 एप्रिल 2020 रोजी हसन यांची या नशेपोटी प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्‍चात तीन मुली, दोन मुले, आई, पत्नी असा परिवार आहे. अत्यंत वेदनादायक ते परिवार जीवन जगत असून त्यांना मदतीची गरज आहे. त्यांची मुलगी, आई, पत्नी मोलमजूरी करून आपली उपजिविका भागवितांना दिसतात. या संदर्भात उशिरा का होईना दै.रिपोर्टरच्या प्रतिनिधीला माहिती मिळाल्यानंतर हसन यांच्या घरी जावून भेट घेतली त्यावेळी त्यांना वाटले आपल्याला या बातमीच्या माध्यमाने मदत मिळते की काय? पण रिपोर्टरच्या प्रतिनिधीने त्यांना सांगितले की, या बातमीमुळे तुमचा फायदा होणार नाही परंतू या नशेपोटी तुमच्या घरी अंधार झालाय. किमान तुमची ही बाब लोकांसमोर आल्यावर इतर नशा करणारे तरूण बोध घेतील. या दृष्टीकोनातून हसन यांच्या परिवाराने विचार केला आणि आम्हाला जरी मदत नाही मिळाली तरी किमान या नशामुक्तीसाठी आम्ही कामी आलोत हेच बस झाले. अशी प्रतिक्रिया देवून हसनच्या परिवाराने ही बाब प्रशासनासमोर आणा, कोडिनयुक्त औषधाच्या विक्रीवर इतर राज्यातही बंदी करा जेनेकरून अशा तरूणांचे संसार उद्धवस्त होणार नाही असे म्हणत हसन यांच्या आईच्या डोळ्यात आश्रू आले. एक विशेष बाब पहायला मिळाली ती म्हणजे शुक्रवारी हजरत शहेंशाहवली दर्गाह कब्रस्तानमध्ये हसनचे दोन्ही मुले वडिलांच्या समाधीजवळ उभे राहून दुवाँ मागतांना दिसून आले. बाप नशा करणारा असो की कसा पण तो मुलांसाठी मोठा आधार असतो हे दृश्ट हृदय हेलावणारे होते. नशा करणार्‍या तरूणांनी या मुलांकडून बोध घेण्याची गरज आहे. नशा करतांनाही वेदना आणि नशा सोडतांनाही वेदना अत्यंत भयान परिस्थिती पुढे चालून या नशा करणार्‍यांची होते. त्यांच्या परिवाराकडे पाहिल्यास थरकाप होतो. अत्यंत भयभीत अवस्थेत वेदनामय जीवन या तरूणांचे परिवार जगत आहेत. प्रशासनाने आता आपल्यास्तरावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. यासंदर्भात गेल्या 20 दिवसापूर्वी शहरातील एका जणावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तो तरूण गंभीररित्या जखमी झाला होता. त्या तरूणाच्या फिर्यादीवरून बीड शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. यानुषंगाने बीड शहर पोलीस तपास करत असल्याची माहिती मिळाली असून तो फिर्यादी तरूण न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. विशेष बाब म्हणजे शहरात झालेला हा हल्ला ड्रग्ज विक्रीच्या कारणावरून झाला असल्याची चर्चा होत आहे.

विशेष इंजेक्शन आणि शक्ती
सध्या एक विशेष बाब समोर येत असून काही वृद्ध व तरूण मंडळी दररोज सकाळी एखाद्या दवाखान्यात जावून हातात शीरेमध्ये एक इंजेक्शन घेतात. ते इंजेक्शन घेतल्यानंतर काही वेळेतच इंजेक्शन घेणार्‍या व्यक्तीच्या शरिरात शक्ती संचार करते. दिवसभर त्या इंजेक्शनच्या पावरने रूग्णांना बरे वाटत असावे परंतू आता चक्क फिटनेस राहण्यासाठी या इंजेक्शनचा वापर होत असल्याची चर्चा असून औषध प्रशासनाने अशा इंजेक्शनचा शोध घेवून शहरातील कोणत्या औषध दुकानावरून या इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे याचा तपास घेण्याची गरज आहे. विशेष म्हणजे हे इंजेक्शन रूग्णांसाठी फायदेशीर असले तरी याचा जास्त प्रमाणात वापर केल्यास शरिरासाठी अत्यंत घातक असून भविष्यात जिवघेणे आजार या इंजेक्शनच्या अतिरीक्त सेवनामुळे होण्याची शक्यता टाळता येणार नाही.

बॅच नंबर खोडून विक्रीची नवी शक्कल
ज्याअर्थी रिपोर्टरच्या प्रतिनिधीने काट्याकुपाट्यातून रिकाम्या कोडिनयुक्त औषधाच्या वापरलेल्या बाटल्यावरून औषध प्रशासनाच्या सहकार्याने रिकाम्या बाटल्याचा शोध लावला. म्हणून आता अवैध विक्री करणार्‍यांनी कोडिनयुक्त औषध विक्रीची नवीन शक्कल लढवली असून कोडिनयुक्त औषधी विकतांना किंवा झोपेच्या गोळ्या विकतांना त्या गोळ्यावरील, औषधावरील बॅच नंबर खोडून विक्री करण्याची नवीन शक्कल लढवली आहे. म्हणून सध्या कोडिनयुक्त औषधाच्या रिकाम्या बाटल्यावर बॅचनंबर व पत्ता खोडलेला दिसून येत आहे.

उलमा इकराम व नगरसेवक सरसावले
शहरातील अनेक तरूण हा नशा करत असल्याची बाब रिपोर्टरच्या माध्यमाने समोर आल्यानंतर शहरातील उलमा इकराम, नगरसेवक, समाजसेवक ड्रग्ज व्यसनमुक्तीसाठी सरसावले असून येत्या 13 फे्रबुवारी रोजी शहरातील जुना दारूल उलुम येथे नशा करणार्‍या तरूणांच्या पालकांसाठी व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विशेष मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती मौलाना अब्दुल बाखी साहब, नगरसेवक हाफीज अशफाक साहब (मजाहेरी राज), यांनी दिली. तसेच मौलाना बाखी यांनी रिपोर्टरने ड्रग्ज व्यसनमुक्तीसाठी उचललेले पाऊल महत्त्वाचे असल्याचे सांगितले. तसेच या नशेपासून मुक्ती मिळवितांना तरूणांना भयान वेदना सहन कराव्या लागतात. यासाठी डॉक्टरांशी चर्चा करून जे तरूण व्यसनमुक्तीकडे जाणार आहेत अशा तरूणांना उपचारासाठी मदतही करणार असल्याचे मौलाना बाखी व हाफेज अशफाक यांनी सांगितले. विशेष म्हणजे ड्रग्ज मुक्तीसाठी उलमा इकराम सरसावले असल्याने आता पालकही आपल्या तक्रारी घेवून यांच्याकडे येत असल्याचे दिसून येत आहे. या नशेच्या मुक्तीसाठी मस्जिदमधूनही आवाहन करण्यात येत असल्याची माहितीही मौलाना यांनी दिली.

नगरसेवकांची छापेमारी कोडिनयुक्त औषध,झोपेच्या गोळ्या याचा वापर नशेसाठी होत असल्याची बाब रिपोर्टरने समोर आणून दिल्यानंतर शहरातील अनेक समाजसेवक व नगरसेवक ड्रग्ज मुक्तीसाठी प्रयत्न करत आहेत. येथील नगरसेवक खुर्शीद आलम यांनी आपल्या मित्रांसोबत मिळून एक अगळीवेगळी मोहिम राबवण्याचे काम सुरू केलेले आहे. यात ज्या ठिकाणी बसून तरूण मंडळी अशा प्रकारचा नशा करतात अशा ठिकाणी रात्री अपरात्री अचानक छापा टाकून त्या मुलांना रंगेहाथ पकडायचे. त्यानंतर त्या मुलांना या नशे संदर्भात माहिती देवून जनजागृती करायची अशा प्रकारची नगरसेवक यांची छापेमारी सुरू असून या कामी समाजसेवक फय्याज कुरेशी, कलाम शेख, शेख वाजेद, मोहम्मद शेहबाज, इमरोज इनामदार यांचे सहकार्य मिळत असल्याचे खुर्शीद आलम यांनी सांगितले. विशेष म्हणजे दै.रिपोर्टरने लावलेली व्यवसनमुक्तीची ठिणगी पेटली असून आता प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे.

जिल्हाधिकारी यांनी याचा पाठपुरावा करावा तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे कोडिनयुक्त औषधाविषयी पाठपुरावा करत होते. त्यांची बदली झाल्यानंतर जिल्हाधिकारी राजेंद्र जगताप यांनी पदभार घेतला. त्यानुषंगाने कोडिनयुक्त औषधासंदर्भात थोडक्यात माहिती अशी की, शहरातील विविध भागात कोडिनयुक्त औषधाच्या रिकाम्या बाटल्या दिसून येत होत्या. यानुषंगाने रिपोर्टरच्या प्रतिनिधीने औषध प्रशासनाचे ड्रग्ज इंस्पेक्टर आर.बी.डोईफोडे यांच्या सहाय्याने या फेकून दिलेल्या रिकाम्या बाटल्यावरील बॅच नंबरवरून तपास सुरू केला. या बाटल्या भारतातील इतर राज्यातून बीड शहरात आल्याचे दिसून येते. याचा पाठपुरावा सुरू आहे. जिल्हाधिकारी यांनी आपल्यास्तरावर या विषयाची चौकशी करण्याची गरज असून हा मुद्दा राष्ट्रीय मुद्दा असल्याने उच्च पातळीवरच लक्ष देण्याची गरज आहे. जोपर्यंत इतर राज्यात कोडिनयुक्त औषध संदर्भात महाराष्ट्र राज्यासारखी कडक प्रतिबंधक कारवाई केली तरच कोडिनयुक्त औषधापासून मुक्ती मिळू शकेल. जिल्हाधिकारी जगताप यांनी याचा पाठपुरावा करण्याची गरज आहे.