शेतकर्यांना मार्गदर्शन, अधिकारी-कर्मचार्यांना लसीकरण करून घेण्याच्या सूचना
एजाज खतीब । पात्रूड
बीड जिल्ह्यातील अकराही तालुक्यात लम्पी रोगाचा शिरकाव झाल्याने शेतकर्यांचे पशुधन संकटात सापडले आहेत. अशा वेळी शेतकर्यांना मार्गदर्शन आणि प्रशासनाला सक्तीच्या सूचना करण्यासाठी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा हे आरोग्य विभागाची यंत्रणा घेऊन थेट शेतकर्यांच्या बांधावर जात आहेत. शेतकर्यांना योग्य मार्गदर्शन करत अधिकारी, कर्मचार्यांना तात्काळ जनावरांचे लसीकरण करून घेण्याच्या सूचना देत आहेत.
आज सकाळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा हे माजलगाव तालुक्णयातील पात्रुड येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, राज्याचे पशुधन विभागाचे आयुक्त शैलेश कोंडे, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी विजय देशमुख यांना घेऊन जिल्हाधिकार्यांनी पात्रुड परिसरातील जनावरांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन केले तर अधिकारी, कर्मचार्यांना गावागावात जावून लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पात्रुड परिसरात लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. असद खान यांनी प्रशासनाला माहिती दिली होती. त्यावरून जिल्हाधिकार्यांनी थेट आपला फौजफाटा घेऊन जात शेतकर्यांना आधार दिला. या वेळी पात्रुडचे सरपंच अॅड. कजीम मनसबदार, शेतकरी हाफीज इनामदार, डॉ. असद खान यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.