दोन एजन्स्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली
बाधीत रुग्णांची संख्या वाढली; तीनशेपेक्षा अधिक जणांवर उपचार सुरू
बीड (रिपोर्टर) बीडसह गेवराई तालुक्यातील काही गावांमध्ये भगरीतून विषबाधा होऊन शेकडो बाधीत रुग्णालयात उपचारासाठी डेरेदाखल झाल्यानंतर केवळ गुटख्याच्या हपत्यात दंग असलेल्या अन्न व औषध प्रशासन खडबडून जागे झाले अन् ग्रामीण भागातील दुकानासह मोंढा भागातील दुकानावर छापे मारले असता ज्या भगरीतून विषबाधा जाली ती भगरच संपल्याचे दुकानदाराने सांगितल्याने दुकानदारांनी ती भगर गायब केल्याचे बोलले जाते. मात्र प्रकरण अत्यंत गंभीर असल्याने शहरातील मोंढा भागात असलेल्या ओम एजन्सी आणि आशीर्वाद एजन्सी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली अन्न व औषध प्रशासनाने सुरू केल्या असून रात्रीतून तब्बल ९ हजार ६०० किलो भगर जप्त करण्यात आली आहे. ३०० बाधित रुग्णांवर बीड जिल्हा रुग्णालयासह अन्य रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
याबाबत अधिक असे की, नवरात्राचे उपवास सुरू झाल्याने उपवासाच्या साहित्याची मागणी वाढली. बीड आणि गेवराई तालुक्यात अनेकांनी भगर खरेदी केली. सदरच्या भगरीमधून काल गेवराई आणि बीड तालुक्यातील काही गावात विषबाधा झाली. शेकडोंवर बाधीत रुग्ण उपचारासाठी शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयामध्ये डेरेदाख होत गेले. या घटनेची माहिती कळताच अन्नभेसळ विभागाच्या अधिकार्यांनी कोळवाडी येथील किराणा दुकानावर छापा मारला. त्यावेळी दुकानदाराने सदरची भगर संपल्याचे सांगितले आणि ती भगर आशीर्वाद एजन्सी आणि ओम एजन्सी बीड येथून आणल्याचे सांगितले. अन्नभेसळ विभागाने बीड येथेही रात्री उशीरा छापा मारला. मात्र या दोन्ही एजन्सीच्या मालकाने संबंधित भगर संपल्याचे घोषीत केले. घटना घडल्यानंतर या एजन्सीज्नी भगर लंपास केल्याचे बोलले जाते मात्र अशा स्थितीतही रात्रीतून ९ हजार ६०० किलो म्हणजेच ९० क्विंटलपेक्षा जास्त भगर जप्त करण्यात आली. या प्रकरणी अन्नभेसळ विभागाने या दोन्ही एजन्सीज्वर गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तर दुसरीकडे भगरीतून विषबाधा झालेल्या लोकांच्या संख्येत वाढ होत आहे.
बीड तालुक्यातील नाळवंडी, शहरातील शाहूनगर, गेवराई तालुक्यातील मालेगाव, बीड जवळील पाली, कोळगाव, नाळवंडी, जुजगव्हाण, कपिलधारवाडी, शास्त्रीनगर, गांधीनगर यासह अन्य परिसरातील जवळपास तिनशे जणांना विषबाधा झाली. यातील ८० ते ८५ रुग्ण हे जिल्हा रुग्णालयात दाखल आहे तर इतर रुग्ण शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्यासह डॉ. शिरीष गुट्टे, डॉ. सुधीर राऊत, डॉ. सोनाली सानप सह आदी डॉक्टर व कर्मचार्यांनी जिल्हा रुग्णालयातील रुग्णांवर उपचार केले. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान शिरूर तालुक्यामध्येही काही जणांना भगरीतून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे.
सुट्टी भगर खाऊ नका
विविध कंपनीच्या भगरी बाजारात आहेत. त्यावर आयएसआयचा मार्क आहे. अशी भगरच खरेदी करा, सुट्टी भगर खरेदी करताना काळजी घ्या, अशा भगरीतून विषबाधा होण्याची शक्यता दाट असते, असे अन्नभेसळचे सय्यद इमरान हाशमी यांनी सांगितले. स्वत:च्या आरोग्यासाठी तडजोड न करता भगर ही सुट्टी घेऊ नका, कुठे काही अस्वच्छ अथवा निकृष्ट साहित्य अन्न-धान्य, किराणा कोणी विक्री करत असेल तर त्याची माहिती प्रशासनाला द्या. काल ज्या नागरीकांनी भगर खरेदी केली त्या नागरिकांनी ती भगर खाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकार्यांची रुग्णालयाला भेट
भगर खाऊन विषबाधीत झालेले रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज दुपारी राधाबिनोद शर्मा यांनी जिल्हा रुग्णलायात येऊन रुग्णांबाबतची माहिती जिल्हा शल्यचिकित्सांकडून जाणून घेतली व रुग्णांची विचारपूस केली.