प्रयागराज (वृत्तसेवा) उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे (सपा) संस्थापक मुलायम सिंह यादव यांचं गुरुग्राममधील रुग्णालयात उपचारांदरम्यान निधन झालं आहे. ते 82 वर्षांचे होते. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयामध्ये मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते.
मुलायम यांचा जन्म 29 नोव्हेंबर 1939 साली उत्तर प्रदेशमधील इटावा येथे झाला. त्यांनी अगदी तरुण वयापासून राजकारणात सक्रीय सहभाग घेतला होता. मुलायम सिंह यादव यांनी तीन वेळा उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवलं आहे. तसेच 1996 ते 1998 दरम्यान ते केंद्र सरकारमध्ये संरक्षणमंत्रीही होते. 1992 साली मुलायम सिंह यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. 5 डिसेंबर 1989 रोजी मुलायम यांनी पहिल्यांदा राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. ते 24 जानेवारी 1991 पर्यंत या पदावर कार्यकरत होते. नंतर मायावती राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या. 1992 साली समाजवादी पक्षाची स्थापना केल्यानंतर वर्षभरात म्हणजेच 5 डिसेंबर 1993 रोजी मुलायम सिंह दुसर्यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले.
पुढील 11 वर्षांमध्ये सातत्याने संघर्ष करत त्यांनी तिसर्यांदा मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली. 29 ऑगस्ट 2003 रोजी यांनी तिसर्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच म्हणजेच चार वर्ष झाल्यानंतर 11 मे 2007 रोजी पदाचा राजीनामा दिला. उत्तर प्रदेशच्या राजकारणावर आपली छाप पाडणार्या मुलायम सिंह यादव यांनी केंद्रामध्येही संरक्षण मंत्रीपदासारखी महत्त्वाची भूमिका पार पाडली. एच.डी. देवेगौडा आणि त्यानंतर इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान असताना मुलायम सिंह यादव हे संरक्षण मंत्री होते. 1 जून 1996 ते 19 मार्च 1998 दरम्यान त्यांनी या पदाची जबाबदारी पार पाडली. त्यानंतर हे पद जॉर्ज फर्नान्डिस यांनी संभाळलं.
पंतप्रधान मोदी हळहळले
आठवड्याभरापासून गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयामध्ये उपचार घेत असणारर्या मुलायम सिंह यादव यांची प्राणज्योत आज सकाळी सव्वा आठच्या सुमारास मालवली. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे (सपा) संस्थापक तसेच माजी अध्यक्ष असणार्या मुलायम सिंह यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहेत. राजकीय विरोधक असणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्वीटरवरुन मुलायम सिंह यांनी कायमच देशहिताचा विचार केल्याचं नमूद करत श्रद्धांजली अर्पण केली आहे. मोदींनी तीन ट्वीटमधून मुलायम सिंह यांच्यासोबतचे आठ फोटो ट्वीट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.