वाहनधारकांची कामे खोळंबली, आज तर एकही अधिकारी नाही, जिल्हाधिकार्यांनी लक्ष द्यावे
बीड (रिपोर्टर) सातत्याने लाचखोरीच्या आणि कामचुकारीच्या विळख्यात अडकून चर्चेत राहिलेल्या बीड आरटीओ कार्यालयात सर्वसामान्यांची कामे ठप्प असून येथील आरटीओसह अन्य महत्वाचे अधिकारी सातत्याने गैरहजर राहत आहेत. कधी मिटिंगचे कारण तर कधी रजेचे कारण सांगून हे अधिकारी गैरहजर राहत असल्याने वाहनधारकांचे अनेक कामे अडकून पडले आहेत. जो वाहनधारक पाच ते दहा हजार रुपये लाच देतो त्याचे काम फोनवर होते. विशेष म्हणजे रात्री हे आरटीओ वसुलीसाठी वेगवेगळ्या रस्त्यांवर दिसून येतात. काम करण्यासाठी मात्र कार्यालयात ते हजर नसतात. यामुळे वाहनधारकात संताप व्यक्त होत असून आरटीओ कार्यालयातल्या बेजबाबदार अधिकारी, कर्मचार्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
राज्यभरातले साखर कारखाने पुढील पंधरवाड्यात सुरू होणार आहेत. ऊस वाहतुकीसाठी ट्रक, ट्रॅक्टरसह अन्य वाहनांची नितांत गरज असते. त्यामुळे वाहन मालक आपल्या वाहनाची खरेदी-विक्री या काळात मोठ्या प्रमाणात करतो. सदरचे वाहन नावावर करणे, अन्य कामे बीडच्या आरटीओ कार्यालयात पेंडिंग आहेत. गेल्या तीन दिवसांपासून जबाबदार अधिकारी कार्यालयात दिसून येत नाहीत. आज तर एकही अधिकारी कार्यालयात नाही. त्यामुळे वाहनधारकांचे सर्व कामे ठप्प पडले आहेत. कधी मिटिंगचे कारण तर कधी रजेचे कारण देऊन दोन्ही अधिकारी दिवसा गायब असतात. रात्री मात्र हेच अधिकारी वेगवेगळ्या रस्त्यांवर वाहने अडवताना आणि त्यांच्याकडून पैसे घेताना दिसून येतात. बीडच्या आरटीओ कार्यालयाचा भोंगळ कारभार सातत्याने अनेकदा अनेकांनी चव्हाट्यावर आणला मात्र आरटीओ कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्यांवर वचक बसवण्यात लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकार्यांना आजपावेत अपयश आले. आज एकही अधिकारी उपस्थित नसल्यामुळे आरटीओ कार्यालयात कुणाचेही काम होत नाही. सदरची बाब ही गंभीर असून लाचखोरी आणि गैरहजेरीत सातत्य ठेवणार्या आरटीओ कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्वस्तरातून होत असून जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी अचानक आरटीओ कार्यालयात जावून तेथील पाहणी केली आणि उपस्थित वाहनधारकांशी चर्चा केली तर आरटीओ कार्यालयातला भोंगळ कारभार जिल्हाधिकार्यांसमोर येईल. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशीही मागणी होत आहे.
मानेंचा मानकापी ‘विक्रम’
आरटीओ कार्यालयातील अधिकारी पदावर असलेले माने हे कार्यालयात सातत्याने गैरहजर राहतात. कधी मिटिंगचे कारण असते तर कधी अन्य कारणे असते. रात्री रस्त्यावर ते दिसून येतात. आपण सात्विक आहोत, पारदर्शक आहोत हे सांगायला न विसरणारे माने काम करण्यासाठी पैसे घेतात, असे वाहनधारकांच्या तक्रारी आहेत. गाडीचे पेपर द्या, पाच हजार द्या तासात फोनवर काम करून देतो, हा विक्रमही त्यांच्याच नावावर पडतो. मानेंना सहकार्य करणारा विक्रम या दोघांची चौकशी जिल्हाधिकार्यांनी केली तर दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी होत मानेंचा ‘विक्रम’ मोडला जाईल.