वडवणी (रिपोर्टर) परतीच्या पावसाने बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये मोठं नुकसान केलं. कापूस, सोयाबीन ही दोन्ही पिके पाण्यात गेली. यंदाची दिवाळी शेतकर्यांसाठी काळी ठरली. नुकसान होऊनही विमा कंपनी आणि शासनाने भरपाई घोषीत केली नसल्याने आज भर दिवाळी दिवशी किसान सभेने वडवणीत अर्धनग्न होत सरकार विरोधात दिवाळं आंदोलन केलं.
यावर्षी बीड जिल्ह्यामध्ये खरीपाचे पिक चांगले आले होते, मात्र परतीच्या पावसाने होत्याचं नव्हतं केलं. कापूस, सोयाबीन ही दोन्ही प्रमुख पिकं वायाला गेली. शेतकर्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. खरीप पिकं वाया गेल्याने शेतकर्यांना काळी दिवाली साजरी करण्याची वेळ आली. शासनाने अद्यापही नुकसान भरपाई जाहीर केली नाही. विमा कंपनीनेही विमा घोषीत केला नाही. शासन आणि विमा कंपनीच्या निषेधार्थ आज किसान सभेच्या वतीने वडवणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अर्धनग्न होत दिवाळं आंदोलन करण्यात आलं. या वेळी किसान सभेचे अजय बुरांडे, दत्ता डाके, भगवान बडे, जगदीश फरताडे, राजाभाऊ बादाडे, सावळाराम उबाळे, सुमंत गोंडे, शुभम् बादाडे, महादेव आगे, मुन्ना गोंडे, अजय लंगडे, राहुल सुरवसे, मारुती आगे, गजानन शिंदे, अंकुश गोंडे सह आदींची उपस्थिती होती. दरम्यान आंदोलनकर्त्यांनी निषेधाच्या प्रचंड प्रमाणात घोषणा दिल्या. विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, मुर्दाबाद मुर्दाबाद बजाज कंपनी मुर्दाबाबत, शेतकरी जुटीचा विजय असो यासह आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या आगळ्यावेगळ्या आंदोलनामध्ये अनेक शेतकर्यांचा सहभाग होता. भर दिवाळी दिवशी किसान सभेने हे आंदोलन करून शासन-प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते.