Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeराजकारणकॉंग्रेसचा इशारा अन् नाराजीचा सूर

कॉंग्रेसचा इशारा अन् नाराजीचा सूर

मजीद शेख | बीड
९६५७६६०७७५

कॉंग्रेस पक्षात ‘जाण’ फुंकण्यासाठी पक्ष संघटनेच्या पदाधिकार्‍यांत बदल करण्यात आले. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच ते कामाला लागले. पटोले यांनी पत्रकार परिषद घेवून कॉंग्रेस पक्षाची नाराजी जाहीर केली. कॉंग्रेसला कमी निधी दिला जात असल्याचा त्यांनी आरोप आहे. आरोपात तथ्य ही असू शकतं. सध्या राज्यात चलते ती राष्ट्रवादीची, त्यामुळे कॉंग्रेस पक्षाला निधी कमी दिला जावू शकतो. त्यातच यापुर्वी ही कॉंग्रेसच्या ज्येेष्ठ नेत्यांनी तक्रारीचा पाढा वाचला होता. मात्र त्यांच्या तक्रारीकडे तितकं गांभीर्याने घेतलं नव्हत. पटोले हे आक्रमक आणि अभ्यासू आहेत. त्यामुळे पटोले यांच्या तक्रारीची सरकार चालवणार्‍यांना नक्कीच दखल घ्यावी लागणार? सरकार चालवायचं म्हटलं तर रुसवे-फुगवे काढावेच लागणार, असे रुसवे पुर्वीच्या भाजपा-शिवसेनेत ही होते. तोच कित्ता सध्याच्या सरकारमध्ये गिरवला जात आहे. मात्र सरकार चालवणारे मुख्यमंत्री ठाकरे आणि खा. शरद पवार हे अनुभवी आणि ‘चाणक्य’ असल्यामुळे कॉंग्रसेच्या नाराजीला ते जास्त ताणून धरणार नाही.

तीन पक्षाचं सरकार चालवणं तसं तारेवरची कसरत आहे. भाजपाला सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी आणि भाजपाचा अहंकार जाळून टाकण्यासाठी ह्या तीन पक्षांनी एकत्रीत येवून सत्तेचा मार्ग निवडला. मुख्यमंत्री शिवसेनेचे उध्दव ठाकरे असले तरी सरकारवर वचक राष्ट्रवादीचीच आहे हे मान्य करावं लागणार आहे. राष्ट्रवादीत अनुभवी नेत्यांची मोठी फळी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार राजकारण आणि प्रशासन कोळून पिलेले नेते आहेत. राज्याच्या काण्या-कोपर्‍यांची त्यांना चांगलीच जाण आहे. खा. शरद पवार यांच्या नंतर अजित पवार यांना राज्याचा खडा न खडा माहित आहे. त्यामुळे शिवसेना काही प्रमाणात राष्ट्रवादीला झुकतं माप देणारच, कॉंग्रेसला नाराज करुन सत्ता भोगता येणार नाही. कॉंग्रेस सोबतीला आली नसती तर राज्यात अशा पध्दतीचं सरकार बनलं नसतं. त्यामुळे कॉंग्रेसला योग्य तो वाटा दिला पाहिजे असं कॉग्रंसेच्या नेत्यांना वाटतं. कॉंग्रेसला निधी कमी दिला जातो असं यापुर्वी अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात व इतर काही नेत्यांनी म्हटलं होतं, पण त्यांचं हे वक्तव्य तितकं गांभीर्याने घेतलं नव्हतं. राज्यात कॉंग्रसेचा विस्तार आणि पक्ष वाढीसाठी पक्ष संघटनेत बदल करण्यात आले. विधानसभा अध्यक्ष असलेले नाना पटोले यांना मैदानात उतरवण्यात आले. पटोले हे आक्रमक व अभ्यासू नेते आहेत. कॉंग्रेस पक्षातील इतर नेत्याप्रमाणे ते राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या दबावाला बळी पडणारे नाहीत. आपला पक्ष वाढवण्यासाठी त्यांना आपला दबाव गट निर्माण करुन राज्यातील कॉंग्रेसच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना बळ द्यावेच लागणार. निधी वाटपात दुजाभाव होतो असं पटोले यांचं म्हणणं आहे. यात तथ्य असू शकतं. आज पर्यंत सर्वात जास्त निधी हा पश्‍चिम महाराष्ट्रात खर्च होत आलेला आहे. मराठवाडा व इतर विभागाला पश्‍चिम महाराष्ट्राच्या तुलनेत निधी दिला जात नाही. निधीच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी समानता राखली पाहिजे. भले ही तिजोरीच्या चाव्या अजित पवार यांच्याकडे असल्या तरी समान निधी वाटप करुन तिन्ही पक्षात समन्वयाची भुमिका राखली तर हे तीन पक्षाचं सरकार सुरळीत चालू शकतं. नसता, खटके उडणे हे सहाजीकच आहे. तिन्ही पक्षांना एकमेकांच्या आधाराची गरज आहे. त्यामुळे खुपच ताणलं जावून दोर तुटणार नाही याची खबरदारी राज्याचे मुख्यमंत्री आणि खा. शरद पवार हे घेतील. नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेवून आपली नाराजी जाहीर केली. ते आपली नाराजी मुख्यमंत्र्यांना भेटून ही सांगू शकत होते पण एक दबावाचा अवलंब म्हणुन त्यांनी जाहीर रित्या नाराजी जाहीर केली. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीला कॉंग्रेसला विचारात घेवूनच निधीचे वाटप व अन्य कुठलेही निर्णय घ्यावे लागणार हे मात्र नक्की!

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!