आष्टी (रिपोर्टर) राजस्थान येथून देवदर्शन करून परतणार्या बोरा कुटूंबियांची गाडी पोखरीच्या पुलावरून खाली कोसळली. यामध्ये जामखेड येथील प्रतिष्ठीत व्यापारी जागीच ठार झाले. तर गाडीतील अन्य चौघे जण गंभीररित्या जखमी झाले. ही घटना आज सकाळी घडली असून जखमींना उपचारासाठी नगर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी आष्टीचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नामदेव धनवडे, भरत गुजर, बी.ए.वाणी यांनी धाव घेतली होती.
जामखेड शहरातील प्रसिध्द व्यापारी असलेले महेंद्र शांतीलाल बोरा हे काही दिवसापूर्वी आपल्या कुटूंबासमवेत राजस्थान याठिकाणी देवदर्शनाला गेले होते. ते रात्री विमानाने पुणे विमानतळ याठिकाणी आल्यानंतर त्यांची गाडी क्र.एम.एच.16 ए.टी.8807 ने आपल्या कुटूंबासमवेत पुण्याहून पहाटे जामखेडकडे निघाले होते. त्यांची गाडी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास नगर-जामखेड रोडवरील पोखरी फाट्याजवळ आली होती. ड्रायव्हरला पोखरीजवळ सोडले आणि मुलगा भूषण गाडी चालवत होता. पोखरीच्या धोकादायक वळणावर टायर फुटल्याने गाडी पुलावरून खाली पलटी झाली. यामध्ये महेंद्र बोरा (वय 58) यांचे जागीच निधन झाले. तर त्यांच्या गाडीमध्ये असलेल्या त्यांच्या पत्नी रेखा महेंद्र बोरा (वय 52), सुन जागृती भूषण बोरा (वय 28), नात लियाशा भूषण बोरा (वय 6), मुलगी हे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने जामखेड येथील समर्थ हॉस्पीटल याठिकाणी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले आहे. त्यांचा मुलगा भूषण शांतीलाल बोरा (वय 34) हा किरकोळ जखमी झाला. मयत महेंद्र बोरा यांचे शवविच्छेदन जामखेड ग्रामीण रूग्णालयात करण्यात आले. बोरा यांच्या अपघाती निधनाने जामखेड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक नामदेव धनवडे, भरत गुजर, वाणी यांनी जावून घटनेचा पंचनामा केला.