मुंबई (रिपोर्टर) अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणूकीसाठी मतदान झाल्यानंतर आज सकाळपासून मतमोजणीला सुरूवात झाली. दुपारपर्यंत सोळा फेर्या पार पडल्या. यात ऋतूजा लटके यांना 58 हजार 875 मते मिळाली असून त्यांचा विजयावर शिक्कामोर्तब झाला आहे. तर दुसरीकडे नोटाला दुसर्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. लटके यांना मिळालेली मतांची आघाडी पाहता शिवसेनेच्यावतीने ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक जाहिर झाली होती. ठाकरे गटाकडून ऋतूजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली होती. याचदरम्यान ठाकरे आणि शिंदे गटाचा वाद कोर्टामध्ये गेला होता. न्यायालयामध्ये शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवून ठाकरे गटाला मशाल तर शिंदे गटाला ढालतलवार हे चिन्ह देण्यात आले होते. मशाल चिन्हावर पहिल्यांदाचा लटके या निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. अंधेरी पूर्व मतदार संघातील मतदारांनी लटके यांना स्विकारून 16 व्या फेरीत 58,875 मते पडली होती. भाजपाने याठिकाणी उमेदवार दिलेला नव्हता. दुसर्या क्रमांकाची मते नोटाला पडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नोटाला सोळाव्या फेरीत 11,569 मते मिळालेली होती. या मतमोजणीच्या एकूण 19 फेर्या पूर्ण होणार आहेत. लटकेच्या यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून शिवसेनेच्यावतीने सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात येत आहे. शिवसेना फुटल्यानंतर ठाकरे गटाचा हा पहिला विजय आहे.