रोज रुग्णात होतेय वाढ, जिल्हाधिकार्यांनी गाठले जिल्हा रुग्णालय, परिस्थितीची केली पाहणी, स्वत:ही घेतली कोरोनाची लस, म्हणाले, लस सुरक्षित, कोरोनाची अर्धी लढाई जिंकली, अर्धी बाकी, जनतेने शासनाच्या नियमांचे पालन करावे
बीड (रिपोर्टर)- जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी काल जिल्हावासियांसाठी नियमावली बनवत आठवडी बाजार बंद केल्यानंतर आज जिल्हाधिकार्यांनी थेट जिल्हा रुग्णालयात येऊन कोविड परिस्थितीची माहिती घेतली. ऑक्सीजन सिलेंडरपासून ओटू प्लान्टची माहिती घेत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. याच वेळी जिल्हाधिकार्यांनी कोरोना लस घेऊन कोरोना अद्याप गेलेला नाही, कोविड विरुद्धची निम्मी लढाई आपण जिंकलो आहोत निम्मी राहिली आहे, ती जिंकण्यासाठी शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे, कोविड लस ही सुरक्षित असून ती सर्वांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी केले.
गेल्या आठ दिवसांच्या कालखंडात बीड जिल्ह्यात रोज कोरोना बाधितांच्या आकड्यामध्ये वाढ होताना दिसून येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव बीड शहरासह अन्य शहरात झपाट्याने वाढत असल्याचे पाहून जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी कालच जिल्ह्यासाठी नियमावली बनवली. आठवडी बाजार बंद करण्याबरोबर ज्या भागात पाच पेक्षा जास्त कोरोना बाधीत आढळतात त्या भागाला सील करण्याचेही आदेा दिले आहे. आज दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी जगताप यांनी जिल्हा रुग्णालयात येऊन आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली, कोविड वार्डांची माहिती घेतली, बंद असलेल्या ओटू प्लान्टबद्दलही माहिती घेत सध्या रुग्णांना ऑक्सीजन पुरेसे आहे का? ते कसे दिले जाते, त्याचा पुरवठा सुरळीत आहे का यासह अन्य औषध व्यवस्थेसह कोरोना रुग्णांसाठी लागणार्या बेड व्यवस्थेची माहिती घेऊन जिल्हधिकार्यांनी स्वत: कोरोना लस घेतली. या वेळी रिपोर्टरशी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, कोरोना अद्याप गेलेला नाही. आपण कोरोना विरुद्धची लढाई निम्मी जिंकली आहे, निम्मी लढाई जिंकणे अद्याप बाकी आहे. ही लढाई जिंकायची असेल तर शासनाने दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करा, लस सुरक्षित असून ही लस प्रत्येकाने घ्यावी, असे आवाहन जगताप यांनी केले.