परळी (रिपोर्टर) नवविवाहितेकडून पतीच्या खुनाची गेवराई तालुक्यातली घटना ताजी असतानाच तिकडे परळी तालुक्यात पत्नीनेच नवर्याचा दोरीने गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आधी नवर्याचा दोरीने गळा आवळून नंतर त्याने गळफास घेतल्याचा कांगावा करत सदर महिलेने पोलिसांना माहिती दिली. मात्र शवविच्छेदनात खरा प्रकार उघडकीस आल्यानंतर खुनी पत्नीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना परळी तालुक्यातल्या हिवरा येथे घडली.
याबाबत अधिक असे की, परळी तालुक्यातील हिवरा येथे हनुमान ऊर्फ राजाभाऊ अशोक काकडे (वय 30 वर्षे) हा आपल्या पत्नीसह राहतो. 11 नोव्हेंबर रोजी हनुमान उर्फ राजाभाऊ याची पत्नी वैष्णवी हिच्यासोबत त्याचे जोरदार भांडण झाले. त्यानंतर रात्री उशीरा वैष्णवी आणि हनुमान ऊर्फ राजाभाऊ झोपण्यासाठी खोलीत गेले. वैष्णवीने खोलीचा दरवाजा लावून घेतला. रात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास तिने हनुमान याचा गळा दोरीने आवळला. त्यानंतर तिने सुताची दोरी छताच्या हुकाला अडकवली. दरवाजा उघडून बाहेर येत हनुमान याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा कांगावा केला. या घटनेची माहिती सिरसाळा पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलीस कर्मचारी बुर्हान नसीर, शेणकुडे, राऊत, भंडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावर हनुमान ऊर्फ राजाभाऊ पलंगावर उतरण्यास्थितीत दिसून आला. इतर नातेवाईकांच्या मदतीने हनुमानचा मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केला. तेथून त्यास परळी येथे हलविण्यात आले. तेव्हा अधिकृतपणे डॉक्टरांनी हनुमान याचा मृत्यू झाल्याचे घोषीत केले. शवविच्छेदन करण्यात आले तेव्हा हनुमान ऊर्फ राजाभाऊ याचा मृत्यू हा गळा दाबल्याने झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सिरसाळा पोलिसांनी या प्रकरणी वैष्णवीविरोधात कलम 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आज सोमवार रोजी वैष्णवी हिस न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. कालच गेवराई तालुक्यातील निपाणीजवळका तांडा येथे नवविवाहितेने लग्नाच्या 21 व्या दिवशी नवरा पसंत नसल्याचे कारण पुढे करत नवर्याचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली होती. त्यापाठोपाठ परळी तालुक्यात ही घटना उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.