बीड (रिपोर्टर) मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भातान बोगद्याजवळ तीन महिन्यांपूर्वी शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांच्या कारला भीषण अपघात झाला होता. याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सीआयडीचा तपास पूर्ण झाला असून मेटेंच्या कारचा चालक हाच अपघातास कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. रायगड जिल्ह्यातील रसायनी पोलीस स्टेशनमध्ये चालक एकनाथ कदम याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राज्य सीआयडीने कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लवकरच कार चालक एकनाथ कदम याला ताब्यात घेतलं जाणार आहे.
विनायक मेटे यांच्या गाडीला 14 ऑगस्ट 2022 रोजी पहाटे पाच वाजता मुंबई पुणे (पान 7 वर)
एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला होता. त्यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल केलं होतं. परंतु तिथे विनायक मेटे यांना मृत घोषित करण्यात आलं. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन परिस्थितीची माहिती घेतली होती. तेव्हा प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मेटे यांच्या मृत्युची सखोल चौकशी करण्यात येईल असं जाहीर केलं होतं. तसंच काही दिवसांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना या मृत्यूची सीआयडी चौकशी करुन आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश दिले होते.तेंव्हा चालकाने मेटेंना तासभर मदतच मिळाली नसल्याचा आरोप केला होता. चालक एकनाथ कदम याने रस्त्यावर गाड्या थांबविण्यासाठी झोपलो पण होतो, पण गाड्या थांबल्या नाहीत, असे म्हटले होते. आता हाच चालक दोषी असल्याचे सीआयडी तपासात निष्पन्न झाले आहे. विनायक मेटेंच्या कारचा चालक एकनाथ कदमवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सीआयडीने रसायनी पोलीस ठाण्यात 304 र, 304 -2 अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.कदम हा मेटेंची कार 140-150 किमीच्या वेगाने चालवत होता. भातन बोगद्याजवळ आल्यावर त्याने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्याने उजव्या बाजुच्या लेनमध्ये गाडी घातली. परंतू तिथे आणखी एक गाडी ओव्हरटेक करत होती. ओव्हरटेक करता येणार नाही हे समजल्यावरही त्याने त्या लेनमधून गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. यामुळे मेटेंची कार डाव्या बाजुने आदळली. सकृतदर्शनी कदम हाच मेटेंच्या अपघाती मृत्यूस आणि अपघातास कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. यामुळे त्याला लवकरच ताब्यात घेऊन अटक करण्यात येणार आहे. गुन्ह्यात वापरलेल्या कलमांनुसार कदम याला दोन ते चार वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे.
सीसीटीव्हीत नेमकं काय आढळलं?
सीआयडीने केलेल्या सीसीटीव्ही तपासणीत विनायक मेटेंच्या चालकाने तासी 130-140 किलोमीटर वेगाने गाडी चालवल्याचं समोर आलं आहे. याशिवाय गाडीचा अपघात होण्याआधी चालक एकनाथ कदमने दुसरी गाडी ओव्हरटेक करत असतानाही आपली गाडी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं. जागा नसतानाही ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नातच हा अपघात झाला, असंही या तपासात समोर आलं आहे.