Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeकोरोनाअग्रलेख- कोरोना रोखायचाय तर अखंड महाराष्ट्राचे तात्काळ लसीकरण करा

अग्रलेख- कोरोना रोखायचाय तर अखंड महाराष्ट्राचे तात्काळ लसीकरण करा

कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊनच पर्याय या मानसिकतेतून राज्य सरकारसह शासन-प्रशासन व्यवस्थेतील प्रत्येकाने आता बाहेर यायला हवं
कोरोना रोखायचाय तर अखंड महाराष्ट्राचे तात्काळ लसीकरण करा
गणेश सावंत

9422742810

‘बीड जिल्ह्यासह अवघा महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने जात आहे का’, असे काहीसे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनावर लस आली आहे, लोक लस घेण्यासाठी रांगा लावत आहेत. लस घेतल्यानंतर कोरोना होणार नाही, यामुळे सुटकेचा नि:श्‍वास टाकत आहेत, असे असताना महाराष्ट्रात रोज दहा हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. तर बीड जिल्ह्यात रोजचा आकडा दोनशेपर्यंत जात आहे. बळींची संख्याही राज्यात ऐंशी ते नव्वदची आहे. तर बीड जिल्ह्यात तीन-चार दिवसाला एखाद दुसर्‍या रुग्णाचा बळी जात आहे. ही परिस्थिती पाहितल्यानंतर कोरोनाने सध्यातरी महाराष्ट्राला आणि बीड जिल्ह्याला वेठीस धरले आहे. यातून सुटका कशी करावी, यावर नुसती जनमाणसात चर्चा होत आहे, परंतु कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी लोक तेवढ्या शिस्तीत राहतात का? आणि कोरोनावर प्रहार करण्यासाठी शासन-प्रशासन तेवढे सतर्क आहे का? असे एक ना अनेक प्रश्‍न आज आटोक्यात येत नसलेल्या कोरोनामुळे उपस्थित होतात. परंतु आजमितीला नुसते प्रश्‍न उपस्थित करून भागणार नाही तर त्या प्रश्‍नांचे उत्तर शोधावे लागणार आहेत. गेल्या वर्ष -सव्वा वर्षापासून कोरोना महामारीने कित्येकांच्या घरात आसवं आणले तर याच कोरोनाच्या लॉकडाऊनने कित्येक घरांना भिखारी बनवले. आर्थिकदृष्ट्या माणसातून उठवले. पुन्हा कोरोनावरचा जालीम उपाय
‘लॉकडाऊन’
करण्याचा सपाटा राज्य सरकारने सुरू केला. ज्या शहरांमध्ये कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्या शहरात गेल्या आठ दिवसांपासून लॉकडाऊन सुरू केले आहे, परंतु लॉकडाऊन केल्यानंतर कोरोना हद्दपार होतोच हे ठामपणे सांगता येत नसले तरी लॉकडाऊनमुळे कष्टकरी, कामगार, व्यवसायिक हे मात्र आर्थिकदृष्ट्या हद्दपार होतात. हातावर कमाई असणार्‍या आणि त्याच कामावर पोट असणार्‍या लोकांचे भविष्य उद्ध्वस्त होते हेही तेवढेच खरे. कोरोनावर कुठला तरी एक जालीम उपाय शोधण्यास तुम्ही-आम्ही कमी पडतोय का? असा प्रश्‍न जेव्हा व्यवस्थेला तुम्ही-आम्ही विचारत असू तेव्हा तो प्रश्‍न स्वत:ला विचारला तर त्यात नक्कीच शिस्तपालनाचे उत्तर आल्याशिवाय राहणार नाही. राज्यात जे रुग्ण सापडत आहेत ती रुग्ण संख्या देशाच्या एकूण रुग्णसंख्येपैकी जास्त आहे. रोज देशामध्ये पाच रुग्ण सापडत असतील तर त्यामध्ये तीन रुग्ण हे एकट्या महाराष्ट्राचे आहेत, असे स्पष्ट झाले आहे त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट मोठा आहे आणि हा विस्फोट रोखण्यासाठी प्रशासन त्यावर लॉकडाऊन उपाय सुचवत आहे. परंतु लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांना आर्थिक व्याधी जडेल ती कुठल्या गोळ्या-औषधाने बरी होणार नाही. त्यामुळे लॉकडाऊनला सर्वसामान्य लोकांमधून विरोध होणे साहजिक आहे. मग या गंभीर परिस्थितीवर शासन-प्रशासन व्यवस्थेने नेमके करायला तरी काय पाहिजे? गेल्या मार्च महिन्यामध्ये ज्या वेगाने कोरोना वाढत होता त्या वेगापेक्षा या वर्षी जास्त वेगाने कोरोना वाढत आहे. हे भीतीदायक चित्र असताना प्रशासन व्यवस्थेच्या निर्णयाला विरोध करणं हे कितपत योग्य? यापेक्षा कोरोनाला सामोरे जाताना लोकांचा आर्थिक स्तरही आबाधित राहील यावर उत्तर शोधणे आज गरजेचे आहे. महाराष्ट्रात जर सर्वात जास्त रुग्ण सापडत असतील तर महाराष्ट्र आणि केंद्र सरकार दूधखुळ्यागत एकमेव पर्याय लॉकडाऊन यावरच येऊन बसत असेल तर ते दुर्दैवच. भारत सरकारने कोरोना विरुद्धची लस काढली ती विदेशातही जाऊन पोहचली. मग आम्ही म्हणतो लॉकडाऊन टाळायचं असेल, कोरोना वाढू द्यायचा नसेल तर येत्या ४५ दिवसात
अखंड महाराष्ट्राचे
लसीकरण करा

अखंड हिंदुस्तानात पाच रुग्ण सापडले तर त्यामध्ये तीन रुग्ण हे महाराष्ट्रातले आहेत, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात येते. महाराष्ट्रात जर कोरोनाचा एवढा मोठा प्रादुर्भाव आहे तर मग कोरोनाचा प्रतिकार करू शकणारी लस सरसकट महाराष्ट्रातील जनतेला तात्काळ का दिली जात नाही? कोरोना हा संसर्ग वाढवणारा आजार आहे. एक रुग्णापासून किमान ३० रुग्णांना हा बाधीत करू शकतो, एवढा गंभीर हा आजार आहे. त्यासाठी शासन-प्रशासन व्यवस्थेकडे केवळ लॉकडाऊन एवढेच उत्तर आहे. कोरोना विरुद्धची लस घेतल्यानंतर त्या व्यक्तीची प्रतिकार शक्ती वाढते आणि कोरोना संसर्ग टाळता येतो. मग हीच कोरोनाची लस देशातील अन्य भागात देण्यापेक्षा परदेशात वितरीत करण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या प्रमुख शहारांसह कानाकोपर्‍यामध्ये जावून जसं की पोलिओ लसीकरण करण्यात येतं तशी कोरोना लसीची मोहीम आखली आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची पहिली लस दिली आणि २८ दिवसानंतर पुन्हा ती लस देण्यात आली तर एकूण ४५ दिवसांमध्ये महाराष्ट्रातील लोकांची इम्युनिटी पॉवर वाढेल आणि लॉकडाऊन न करता पंचेचाळीस दिवसात कोरोनाची ईडापिडा टळेल. याचा विचार राज्य सरकारने नक्कीच करायला हवा. त्यापेक्षा महाराष्ट्राच्या नावाने बोटं मोडण्यापेक्षा, महाराष्ट्राला नाव ठेवण्यापेक्षा किंवा महाराष्ट्रात सर्वात जास्त रुग्ण आढळतात ही बोंब ठोकत ठाकरे सरकारविरोधात गरळ ओकण्यापेक्षा केंद्र सरकारने आणि महाराष्ट्रातल्या अभ्यासू विरोधी पक्षनेेते देवेंद्र फडणवीसांनी, भाजपाने महाराष्ट्रात सरसकट कोरोनाविरुद्धच्या लसीचे लसीकरण मोहिमेबाबत केंद्र सरकारकडे आग्रह धरावा. साधं लॉजिक आहे, लॉकडाऊन करून लोकांचे व्यवसाय, संसार येणार्‍या पंचेचाळीस दिवसांमध्ये उद्ध्वस्त करण्यापेक्षा पंचेचाळीस दिवसांच्या कालावधी अखंड महाराष्ट्राचे लसीकरण करा. परंतु शासन-प्राासन व्यवस्थेने याचा विचार केलाय की नाही आम्हाला माहित नाही, परंतु
कोरोनाचा नैसर्गिक विषाणू आणि
मानवनिर्मित लॉकडाऊन विषाणू

हे दोन्हीही सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसांला मरणशय्येवर घेऊन जाणारे आहेत. गेलं वर्ष लॉकडाऊनमध्ये गेलं. छोटे-मोठे उद्योग-व्यवसाय अक्षरश: उद्ध्वस्त झाले. बँकेचे कर्ज काढून ज्या लोकांनी तीन-चार लाखापासून पाच-पन्नास लाखापर्यंत गुंतवणूक करून उद्योग उभा केले ते बँकेच्या व्याजामध्ये अक्षरश: खपले. गेल्या वर्षीचे ते संकट सहन करीत पुन्हा फिनीक्स पक्ष्याप्रमाणे महाराष्ट्राचा प्रत्येक उद्योग-व्यवसाय करणारा गगनभरारी घेण्यासाठी उभा राहतोय, राहिला आणि पुन्हा महाराष्ट्रात कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन पर्याय घेऊन शासन-प्रशासन जर रस्त्यावर येत असेल आणि उद्योग व्यवसायांना घरबंद राहण्याचे आदेश देत असेल तर हा कोरोनावरचा उपचार मानता येणार नाही. आम्ही उघडपणे ठाकरे सरकारला या अग्रलेखाच्या माध्यमातून सांगू इच्छितो, ‘लॉकडाऊन हा पर्याय होऊ शकत नाही, आज तुमच्याकडे लस उपलब्ध आहे, ४५ दिवसांच्या कालखंडामध्ये राज्यभरात लसीकरण मोहीम हाती घ्या, कोरोना रोखला जाईल,’ हा महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्रचाया बाहेरही कोरोनाला रोखता येईल.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!