बीड (रिपोर्टर) सन 2017-18 ते 2022 या दरम्यान मराठवाड्यात टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा करण्यात आला होता. या टँकरमध्ये मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे समोर आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. जिल्ह्यामध्ये 940 टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा करण्यात आलेला होता. गुत्तेदारांनी कमी खेपा असताना काही ठिकाणी जास्त खेपा दाखवून पाण्यावर मलई काढण्याचे काम केलेले आहे. तक्रारीनंतर बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातील टँकर घोटाळ्याचे चौकशीचे आदेश देण्यात आले असून आता या चौकशीतून नेमके काय निष्पन्न होणार आहे हे समोर येईल.
मराठवाड्यामध्ये सतत दुष्काळी परिस्थिती असते, मात्र तीन वर्षांपासून पाऊस चांगला पडत आहे. तीन वर्षांपुर्वी 2017-18 च्या दरम्यान दुष्काळाने हाहाकार माजवला होता. या दरम्यान सर्वत्र टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात होता. 2018-19 या वर्षी बीड जिल्ह्यात 940 टँकरने पाणीपुरवठा झाल्याची नोंद प्रशासकीय पातळीवर झालेली आहे. दुष्काळामध्ये गुत्तेदार मंडळी मलिदा लाटण्याचे काम करत असतात. कमी खेपा असताना काही ठिकाणी जास्त खेपा दाखवून शासनाच्या पैशाची लूट केली जाते. दुष्काळात मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पाण्यामध्ये मलई काढण्याचे काम झालेले आहे. टँकर घोटाळ्याबाबत राज्य सरकारकडे तक्रारी करण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार शासनाने बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील संपुर्ण टँकर घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले असून या चौकशीतून नेमके काय निष्पन्न होईल हे समोर येईलच. यात गुत्तेदारांसह काही प्रशासकीय अधिकार्यांनी सुद्धा हात धुवून घेतलेले आहेत.










