बीड (रिपोर्टर) बीडपासून जवळ असलेल्या संभाजी चौकात काल मोटारसायकल आणि टेम्पोचा अपघात झाला. यात मोटारसायकलवरील एक इसम जखमी झाला. त्याच्या जवळ एक गाठोडं होतं. त्या गाठोड्यातून उग्र असा वास येत होता. या गाठोड्यात नक्कीच काही असावं, असा संशय पोलिसांना आला आणि पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. हे गाठोडं जिल्ह्यात रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणलं. तिथे हा गाठोडं सोडलं असता त्यात चक्क 9 भोपळे निघाले. गाठोड्यात भोपळे निघाल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
काल दुपारी चार वाजता बीडपासून जवळ असलेल्या संभाजी चौकात मोटारसायकल आणि टेम्पोची धडक झाली. मोटारसायकलवरील एक व्यक्ती जखमी झाला. या अपघाताची माहिती बीड ग्रामीण ठाण्याचे पोलिस निरीक्षक साबळे यांना झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पीएसआय आवारे यांना पाठवले. पोलिसांनी जखमीला रुग्णालयात दाखल केले. मात्र जखमीजवळ एक गाठोडं आढळून आलं आणि त्या गाठोड्यातून उग्र असा वास येत होता. गाठोड्यात नेमकं काय? असा संशय पोलिसांना आला आणि पोलिसांची धावपळ उडाली. पोलिसांनी हे गाठोडं शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणला. शवविच्छेदनगृहात हा गाठोडा सोडला असता त्यात चक्क 9 भोपळे निघाले. हा इसम भोपळे घेऊन कुठे जात होता हे मात्र समजू शकले नाही.