अकोला (रिपोर्टर) भाजपाचे नेते शेतकर्यांवर काहीच बोलत नाहीत, देशातला शेतकरी अडचणीत आहे. देशात महागाई आहे, रोजगार नाहीत, शेतकर्यांना दिलासा मिळत नाही, अशा गंभीर परिस्थितीत केवळ जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सत्ताधार्यांकडून सातत्याने केला जातो. भारत जोडो यात्रावर आम्ही निघालो आहोत. अशा स्थितीत भारत जोडो यात्रेतून देशाचे नुकसान होत असेल तर त्यांनी भारत जोडो यात्रा रोखून दाखवावी, असे आव्हान राहुल गांधी यांनी भाजपाला दिले.
काँग्रेसची भारत जोडो यात्रा थांबवण्यात यावी, अशी मागणी शिंदे गटातील नेते राहुल शेवाळे यांनी केली आहे. शेवाळे यांच्या याच मागणीवर काँग्रेसेचे खासदार राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना भारत जोडो यात्रा रोखायची असेल तर त्यांनी जरूर रोखावी. प्रत्येकाने आपापले मत मांडावे. सरकारला ही यात्रा रोखायची असेल, तर त्यांनी तो प्रयत्न करावा, असे राहुल गांधी म्हणाले. ते आज (17 नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत बोलत होते.
या लढाईला अगोदर समजून घ्यावे लागेल. लोकशाहीत एक पक्ष दुसर्या पक्षाशी लढत असतो. या युद्धात देशातील इतर संस्था पारदर्शकता निर्माण करतात. मात्र आता ही लढाई फक्त दोन पक्षांत नाहीये. विरोधकांचे माध्यमांवर नियंत्रण नाही. मात्र भाजपाचे माध्यमांवर नियंत्रण आहे. वेगवेगळ्या संस्थावरही भाजपाचे नियंत्रण आहे. ते न्यायव्यवस्थेवरही दबाव टाकतात. त्यामुळे काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून कमी पडतोय, हे मत चुकीचे आहे. हा वरवरचा समज आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
सावरकरांच्या मुद्यावरून महाराष्ट्रात विरोधकांनी राहुल गांधींविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आज राहुल गांधी पत्रकारांसमोर आले. अकोल्यात पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी भाजपाच्या व्यवस्थेवर आणि कार्यपद्धतीवर सडकावून टिका केली. याच पत्रकार परिषदेत त्यांनी ‘सावरकरांचा माफीनामा’ वाचून दाखवला. त्यावर सावरकरांनी सही केल्याचेही त्यांनी म्हटले. पुढे बोलताना एका प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले, पैशाचं आमिष देऊन विरोधी पक्ष संपवण्याचा प्रयत्न होत आहे. 50 कोटी रुपये देऊन आमदार खरेदी केले जात आहेत. सध्या सर्वांचं पोट भरणारा शेतकरी संकटात आहे, देशात शेतकर्यांच्या अनेक समस्या असून विदर्भातील शेतकरी समस्येत असताना त्यावेळी आमच्या सरकारने मदत केली होती. हे सरकार शेतकर्यांकडे ढुंकूनही बघत नाही. ही यात्रा कन्याकुमारीपासून काश्मिरपर्यंत जाणार असल्याचे राहुल गांधींनी सांगून सध्या देशापुढे दोन मोठ्या समस्या आहेत, देशात युवकांना रोजगार मिळत नाही. शेतकर्यांना कुठलाही दिलासा नाही. शेतकरी वेळेवर पीक विमा भरतात मात्र त्यांना पैसे मिळत नसल्याचे गांधी यांनी या वेळी म्हटले. भारत जोडो यात्रा रोखण्याबाबत वक्तव्य झाल्यानंतर राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा रोखून दाखवावी, असे खुले आव्हान भाजपाला दिले. महात्मा गांधींबरोबर आपली तुलना करू नका, असेही ते या वेळी म्हणाले. सत्ताधार्यांकडून न्यायव्यवस्थेवर दबाव आणला जात असल्याचे त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये म्हटले. या वेळी प्रसार माध्यमांनी त्यांना मराठीतून बोलण्याचा आग्रह केला. त्यांनी तसा प्रयत्नही केला. या पत्रकार परिषदेला त्यांच्या सोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते.
पण स्वातंत्र्यलढ्यात तुमचे कोण होते, उद्धव ठाकरेंचा
भाजपला सवाल; म्हणाले – तुमचीही कुंडली काढा
राहुल गांधी यांचे सावरकरांबद्दलचे वक्तव्य चूकच आहे. त्यांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही. मात्र, आमची भूमिका विचारणारे तुम्ही कोण. तुमचीही कुंडली काढा की, स्वातंत्र्यलढ्यात तुमचे कोण होते, असा खडा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला. ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी खासदार संजय राऊत उपस्थित होते. देशाचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. आपली हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.