वडवणी (रिपोर्टर) चुलत्याने पुतण्यावर कोयत्याने वार करत निर्घृणपणे खून केल्याची थरारक घटना रात्री वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथे घडली. आपणच पुतण्याला मारल्याची कबुली चुलत्याने पोलिसांकडे दिली असल्याचे सांगण्यात येते. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा अधिक तपास वडवणी पोलीस करत आहेत. या घटनेने वडवणी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी माजलगाव उपविभागाचे डीवायएसपी धिरजकुमार यांनी धाव घेतली होती. हा खून नेमका कशामुळे झाला हे मात्र समजू शकले नाही. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. (पान 7 वर)
वडवणी तालुक्यातील मौजे पिंपरखेड येथील सुरज श्रीकृष्ण शिंदे (वय 16 वर्षे) हा रात्री साडेसातच्या सुमारास जि.प. शाळेच्या पुढच्या गल्लीत उभा होता. या वेळी गावातील वीज गेली होती. याचाच फायदा उचलून गणेश अर्जुन शिंदे (वय 20 वर्षे) याने सुरज शिंदेच्या पाठीमागून कोयत्याने वार केले. यात तो गंभीररित्या जखमी झाला. त्याच्या डोक्याला, गालावर जबर मार लागला. सदरील घटना घडल्यानंतर ग्रामस्थ त्याठिकाणी धावून आले, सुरजला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात घेऊन जात असताना त्याचा रस्त्यामध्येच मृत्यू झाला. मध्यरात्री माजलगावचे पोलीस उपअधिक्षक धिरजकुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन या प्रकरणाची चौकशी केली. आज सकाळी मृतदेहावर जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणातील आरोपी गणेश शिंदे हा घटना घडल्यानंतर फरार झाला होता. मात्र तो देवडी शिवारात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास ताब्यात घेण्यात आले. त्याने खुनाची कबुली दिली असल्याचे सांगण्यात आले. मयत आणि आरोपी हे सख्खे चुलत चुलते व पुतणे असल्याचे सांगण्यात आले. मयताचे वडील हे परराज्यात ऊसतोडणीसाठी गेलेले होते. या घटनेने वडवणी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकणाचा अधिक तपास सुरू असल्याचे एपीआय आनंद कांगुणे, पी.एस.आय. यादव यांनी म्हटले आहे.