बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यातल्या 704 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असल्याने गावागावांत बोचर्या थंडीत राजकीय वातावरण चांगलच तापलं. काही गाव पुढार्यांनी ग्रा.पं. निवडणुका अत्यंत प्रतिष्ठेच्या केल्या. तालुक्यासह जिल्हा पातळीवरच्या बड्या नेत्यांनी गावपातळीवरच्या राजकारणात चांगलेच लक्ष घातले असून काही गावात दुरंगी तर काही गावात तिरंगी लढती होणार आहेत. उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. 2 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना प्रचंड महत्व आलेले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य होण्यापेक्षा गावपुढारी सरपंच होणे पसंत करू लागले. बीड जिल्ह्यातल्या 704 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असल्याने गावागावांत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अनेक गावपुढार्यांनी ग्रामपंचायतच्या निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. ग्रा.पं. निवडणुकीतून जि.प. आणि पं.स. निवडणुकीचे अंदाज बांधले जात असल्याने तालुक्यासह जिल्हा पातळीवरच्या नेत्यांनी ग्रा.पं.च्या निवडणुकीत चांगलच लक्ष घातलं आहे. जे नामांकित राजकीय पुढारी आहेत त्यांनीही आपआपल्या गावातील निवडणुक जिंकण्यासाठी आपल्य कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. 2 डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. कुठल्या वार्डात कोणते उमेदवार टाकायचे यासाठी बैठकांवर बैठका सुरू असल्याचे दिसून येत आहे.
तरुणांची संख्या जास्त
गावपातळीवरच्या राजकारणात गावातल्या मातब्बरांची मक्तेदारी असते, मात्र आता बदल होत असल्याचे दिसून येऊ लागले आहे. अनेक नेत्यांनी तरुणांना संधी देण्यासाठी ग्रा.पं. निवडणुकीत पॅनल उभे करण्यासाठी समर्थन दिले आहे तर काही तरुण मंडळी सरपंचपद थेट जनतेतून असल्यामुळे त्यांनी स्वत:चं पॅनल उभा केले आहे. सर्वात जास्त तरुणांची संख्या या ग्रा.पं. निवडणुकीत दिसून येऊ लागली आहे.
बीड, माजलगाव, अंबाजोगाई, गेवराई, धारूर तालुक्यातही चांगलीच रंगत
बीड, माजलगाव, अंबाजोगाई, गेवराई, धारूर तालुक्यात देखील ग्रा.पं. च्या निवडणुकीमध्ये चांगलीच रंगत भरली आहे. तालुका पातळीवरच्या नेत्यांनी आपल्या सर्कलमधील गावे आपल्याकडे ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. जे नाराज आहेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
केजमध्ये भाजप, राष्ट्रवादीत लढत
केज मतदारसंगातील 66 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये रमेश आडसकर आणि बजरंग सोनवणे या दोन्ही नेत्यांनी अनेक ग्रामपंचायतींमध्ये लक्ष घातले आहे. वरपगाव, चिंचोलीमाळी, कळमअंबा, आनंदगाव यासह इतर ग्रा.पं.मध्ये दुरंगीसह तिरंगी लढती पहावयास मिळणार आहे.
कड्यासह बड्या
ग्रा.पं.मध्ये नेत्यांचे लक्ष
आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघातील कडा ग्रामपंचायत सर्वात मोठी आहे. या ग्रामपंचायतीमध्ये 17 सदस्य असल्याने ही ग्रामपंचायत आपल्या ताब्यात राहाण्यासाठी आ. सुरेश धस, आ. बाळासाहेब आजबे आणि माजी आमदार भीमराव धोंडे चांगलेच लक्ष घालत असल्याचे दिसून येते. कड्यासह खुंटेफळ, कुंडी, भाळवणी, वाहिरा, सराटेवडगाव, हिंगणी, केळसांगवी, घाटापिंप्री, फत्तेवडगाव, शेखापूर, सुलेमान देवळा, कापसी, घोंगडेवाडी, चिंचाळा, वाघळुज, कानडी खुर्द, चिंचोटी, बाळेवाडी, हाजीपूर, पारोडी, पिंपळगाव यासह अन्य ग्रा.पं.मध्ये या तिन्ही नेत्यांचे वेगवेगळे पॅनल उभे राहणार आहेत.