बीड (रिपोर्टर) कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळ्यांसाठी काम करणारे ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. पंडितराव शिवाजीराव देशपांडे (परळीकर) यांचे वयाच्या 95 व्या वर्षी वृद्धापकाळाने काल निधन झाले. आज त्यांच्या पार्थीवदेहावर अमरधाम स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी सर्व क्षेत्रातले लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अॅड. पंडितराव देशपांडे हे कम्युनिस्ट पार्टी मार्फत सक्रिय राहून लोकांचे रस्त्यावर आणि न्याय व्यवस्थेत काम करत सर्वसामान्यांना न्याय द्यायचे. ते अॅड. धनंजय देशपांडे, अॅड. प्रशांत देशपांडे यांचे वडील होते.
जो काळ अज्ञानाचा होता, ज्या काळी शासन-प्रशासन व्यवस्था, सर्वसामान्य दिनदुबळ्या, कष्टकरी कामगार, शेतकरी शेतमजुरांना आपल्या अन्यायकारी धोरणाखाली चिरडीत होते त्याकाळी ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. पंडितराव शिवाजीराव देशपांडे हे कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने सक्रिय होत या सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरायचे. अन्यायकारी व्यवस्थेला न्याय दरबारी खेचून सर्वसामान्यांना न्याय द्यायचे. सामाजिक चळवळीमध्ये सातत्याने भाग घेत अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद करणारे पंडितराव यांचे वयाच्या 95 व्या वर्षी काल वृद्धापकाळाने त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. चंपावती शिक्षण संस्थेसह अन्य संस्थांमध्ये त्यांनी प्रत्यक्षात काम केले. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी कष्टकर्यांचा आवाज बनने पसंत केले. त्यांच्या पार्थीवदेहावर आज सकाळी बीड शहरातील मोंढा रोड भागात असलेल्या अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी जिल्हा न्यायाधीश महाजन, वकील संघाचे अध्यक्ष, सर्व ज्येष्ठ वकील, आजी-माजी आमदार, विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी, व्यापारी, पत्रकार, शिक्षक, प्राध्यापक चळवळीतील कार्यकर्ते, यांच्यासह सर्वक्षेत्रातील लोक उपस्थित होते. ते अॅड. धनंजय देशपांडे, अॅड. प्रशांत देशपांडे यांचे वडील होते. त्यांच्या पश्चात दोन मुली, नातवंड असा परिवार आहे.