230 रस्ते अपघातात 201 नागरिकांचा बळी;
137 जण अतिगंभीर जखमी; दुचाकीस्वारांची संख्या सर्वाधिक
9922773117
बीड जिल्ह्यात 29 ठिकाणे ’जीवघेणी’ (ब्लॅकस्पॉट) असून मांजरसुंबा घाट, संभाजी चौक, बागपिंपळगा, पाडळसिंगी फाटा ब्रीज, गढी पुल, नित्रुड या भागात सर्वाधिक अपघात घडले आहेत. या ‘प्लॅक स्पॉट’वर जानेवारी 2020 ते 30 नोव्हेंबर 2022 अखेरीपर्यंत वेगवेगळ्या भागात 230 अपघाताच्या घटना घडल्या असून त्यामध्ये 201 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 137 जण अतिगंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये सर्वाधीक दुचाकीस्वार मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण आहे. गतवर्षी पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड पोलिसांनी ब्लॅक स्पॉटवरील अपघात रोखण्यासाठी दिर्घकालीन कृती आराखडा तयार करून उपाययोजना केल्याने सात ठिकाण ब्लॅक स्पॉटमधून बाहेर आली आहेत.
बीड जिल्ह्यात वाढत्या अपघाताची कारणे पोलिस प्रशासन आणि आरटीओ यांच्या विशेष पथकांनी शोधून काढली आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर, राज्य महामार्गावर अथवा बीड जिल्ह्यातील इतर मुख्य रस्त्यावर सुमारे 500 मिटर अंतरामध्ये सलग तीन वर्षात एकाच ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा जास्त अपघात होवून एका अपघातात किंवा त्यापेक्षा जास्त अपघातात 10 किंवा त्यापेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. असे ठिकाणे ‘जीवघेणी’ (ब्लॅकस्पॉट) म्हणून घोषीत करण्यात आली आहेत. बीड जिल्ह्यात अशी 29 ठिकाणे आहेत. या भागात सातत्याने अपघात घडतात. या भागातील अपघात रोखण्यासाठी वाहतूक विषयक सुधारणा करण्याची गरज आहे. वाहतूक पोलिसांकडून वाहतूक विषयक उपाययोजना तसेच सुधारणा करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांशी वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. ब्लॅकस्पॉट भागातील अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलीस, जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दीर्घकालीन कृती आरखडा तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाील लवरकच पोलिस प्रशासन, आरटीओ यांची बैठक होणार असून त्यानुसार या भागातील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत.
——
ब्लॅकस्पॉट भागातील अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलीस, जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दीर्घकालीन कृती आरखडा तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाील लवरकच पोलिस प्रशासन, आरटीओ, महामार्ग अधिकारी यांची बैठक होणार आहे. गेल्या वर्षी काही ’ब्लॅकस्पॉटवर’ दीर्घकालीन उपायोजना केल्याने जिल्ह्यातील 7 ठिकाणे ब्लॅकस्पॉटमधून बाहेर आली आहेत.
– सचिन पाडकर
अप्पर पोलिस अधिक्षक, बीड
—-
उपाय योजनेनंतर 7 ठिकाणे ब्लॅकस्पॉटमधून बाहेर
बीड जिल्ह्यात गत वर्षी पोलिस प्रशासन, आरटीओ आणि महामार्ग अधिकार्यांनी मिळून ब्लॅकस्पॉटवर होणार्या अपघातांची वेगवेगळी कारणे शोधून त्या संदर्भात उपाय योजना केल्या होत्या. त्यानंतर जिल्ह्यातील शिवशारदा पब्लीक स्कुल (घाटी, गेवराई), रानमळा शिवार, तळेवाडी फाटा, डोईठाण शिवार ता. आष्टी, बाळेवाडी फाटा, सावरगाव (मदरसा) माजलगाव- परभणी रोडवरील गॅस गोडाऊन जवळ अशी सात ठिकाणे ब्लॅक स्पॉटमधून बाहेर आली आहेत. मात्र यावर्षी नव्या 14 ठिकाणांची ब्लॅकस्पॉट म्हणून नोंद झाली आहे.
———–
छत्रपती संभाजी महाराज चौक, लक्ष्मी चौकात उड्डाणपुलाची आवश्यकता
बीड शहराबाहेरून जाणार्या बायपासवरील दोन्ही चौकात मोठ्या प्रमाणात अपघात होतात. हे अपघात रोखण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे छत्रपती संभाजी महाराज चौक आणि लक्ष्मी चौकात उड्डाणपुलाची आवश्यकता आहे. यासाठी वेळोवेळी आंदोलनेही झाले आहेत. अजुन किती बळी गेल्यावर येथे उड्डाणपुल होणार आहे? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
———–
रांजणीजवळ भुयार मार्ग असावा
पोलिस प्रशासन, आरटीओ यांनी जेव्हा एकाच ठिकाणी वारंवार होणारे अपघात आणि त्यात मृत्यूमुखी पडणारी माणसे याचे कारणे शोधले तेव्हा अनेकठिकाणी सदोष रस्ते हे अपघाताचे मुळ कारण आहे. गेवराई तालुक्यातील रांजणीजवळ मोठ्या प्रमाणात अपघात होतात. हे अपघात रोखण्यासाठी येथे भुयार मार्ग असणे आवश्यक आहे असे पोलिस प्रशासनाने निदर्शनास आणुन दिले आहे. शिवाय येथे भुयार मार्ग व्हावा यासाठी रांजणी ग्रामपंचायतच्यावतीने आंदोलनही करण्यात आली आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.
———–
अतिवेगच अपघाताचे कारण
बीड जिल्ह्यातून जाणारा धुळे-सोलापूर असो की मुंबई-विशाखापट्टणम असो हे राष्ट्रीय महामार्ग चार पदरी झालेले आहेत. त्यामुळे वाहनचालक वेग मर्यादा पाळत नाहीत. अनेकवेळा अपघात झाल्यानंतर या महामार्गावर जिवीत हानी मोठ्या प्रमाणात होते. प्रशासनाने जेव्हा अपघाताचे कारणे शोधले त्यामध्ये प्रामुख्याने वेगमर्यादा न पाळणे, सीट बेल्ट न लावणे हे अपघाताचे अन अपघातात मृत्यू होण्याचे कारण जास्त आहे.
ठिकाण अपघात मयत जखमी
वाघळूज शिवार 5 5 6
साबलखेड मधुबन हॉटेल समोर 5 3 6
भारती मंगल कार्यालय धामनगाव 6 4 4
आष्टी : पांढरी गावाच्या जवळ 9 8 8
पाटोदा: चुंबळी फाटा 5 5 3
बीड : मांजरसुंबा घाट 10 12 0
संभाजी चौक 11 14 0
मंजेरी फाटा 6 6 5
पांगरबावडी 6 11 2
महादेव मंदिर समोर पाली 5 5 0
गेवराई : बागपिंपळगाव 14 9 7
रांजणी फाटा 9 3 6
इसार पेट्रोलपंप गेवराई 7 7 1
सावरगाव पुलाजवळ 8 5 6
नागझरी 8 7 01
मादळमोही 7 3 19
पाडळसिंगी फाटा ब्रीज 10 5 5
वडगाव ढोक फाटा 8 6 3
गढी पुलाजवळ 10 4 7
चकलांबा : सुर्य मंदिर 5 5 4
सिरसदेवी शिवार 7 6 2
बर्दापूर : नांदगाव फाटा 5 16 21
अंबाजोगाई :लोखंडी सावरगाव 7 7 1
लाडेवडगाव फाटा 7 13 8
चंदनसावरगाव 7 7 4
सुर्डी पाटी ते मांडगाव फाटा 9 8 6
सिरसाळा गाव 6 5 1
नित्रुड 10 9 0
धारुर 8 4 4
—