जोपर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा आक्रमक पवित्रा
बीड (रिपोर्टर)ः- मंजूर असलेल्या घरकूलाला जागा उपलब्ध करुन दयावी या प्रमुख मागणीसाठी पारधी समाजातील अप्पाराव पवार गेल्या अनेक वर्षापासून प्रशासनाच्या दारात खेटे घालत आहे. प्रशासन कसल्याही प्रकारची दखल न घेतल्याने पवार कुटूंब जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलं होतं. यातील कुटूंब प्रमुख अप्पाराव पवार यांचा उपोषणस्थळी रात्री मृत्यु झाला. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आल्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी आक्रोष सुरू केला होता. पोलीस प्रशासनासह महसूल विभागाचे अधिकारी,कर्मचारी कलेक्टर कचेरी समोर दाखल झाले होते. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये नेण्यात आला होता. जोपर्यंत घरकूलाचा प्रश्न मार्गी लागत नाही तो पर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता.
पारधी समाजाचे अप्पाराव पवार हे गेल्या अनेक वर्षापासून वासनवाडी शिवार सर्व्हे नं. 166/अ याठिकाणी राहत आहे. त्यांना काही महिन्यापूर्वी घरकूल मंजूर झाले होते. या घरकूलाचा पहिला हप्ता त्यांना अदा करण्यात आलेला आहे. मात्र दुसर्या हप्त्याला जागा नसल्यामुळे आडकाठी आली. जागा उपलब्ध करुन दयावी अशी मागणी अप्पाराव पवार यांनी वेळोवेळी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. त्यासाठी त्यांनी कुटूंबासमवेत कित्येक वेळा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केलेले होते. घरकूलाच्या मागणीसाठीच ते 03-12-2022 पासून पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते. यावेळी त्यांच्या समवेत पत्नी कवीता पवार सह अन्य कुटूंबातील सदस्य उपस्थित होते. रात्री अप्पाराव पवार यांचा उपोषणस्थळी मृत्यु झाला. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नातेवाईकांनी आक्रोश सुरू केला. घटनेची माहिती महसूल सह पोलीस प्रशासनाला झाल्यानंतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. काही समाजसेवकही धावून आले होते. मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. जोपर्यंत घरकूलाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करण्यात येणार नाही असा पवित्रा अप्पाराव पवार यांची पत्नी कवीता पवार यांनी घेतला होता. जिल्हा रुग्णालयात परिसरात महसुलविभागाचे अधिकार्यांसह पोलीसांचा फौजफाटा उपस्थित होता.
जागेचे लेखी आदेश दिल्यानंतरच
मृतदेह ताब्यात घेणार- पत्नी-कवीता पवार
महसूल प्रशासनाकडून मयत अप्पाराव पवार यांची पत्नी कविता पवार व इतर नातेवाईकांसोबत चर्चा करुन उद्याची उद्या बैठक लावून तुम्हाला जागा मंजूरीची आदेश देवू असे सांगितले. मात्र जो पर्यंत लेखी स्वरुपात उपलब्ध करुन दिल्याचे प्रशासकीय आदेश मिळाल्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा मयताच्या नातेवाईकांनी घेतला होता.
महसूलकडे जागा खरेदीचा प्रस्ताव पडून आहे-सामाजिक न्याय विभाग
पारधी समाजाच्या मंजूर झालेल्या घरकूलासाठी सामाजिक न्याय विभागाने पंडीत दिनदयाल योजनेअंतर्गत प्रत्येक घरकूल जागे खरेदीसाठी 50 हजार रुपये मंजूर करावे आणि वासनवाडी शिवारातील राहत असलेली जागा खरेदी करावी यासाठी महसूल विभागाला प्रस्ताव पाठवला होता. मात्र महसूल विभागाच्या द्फ्तर दिरंगाईमुळे हा प्रस्ताव मंजूर न झाल्यामुळे शेवटी उपोषणकर्ते अप्पाराव पवार यांना आपला जिव गमवावा लागला.