काय लिहावं, 29 वर्षांचा हा कालखंड… दोन तपाचा तो किती खडतर… अवघड… हे आम्हालाच माहित. मात्र दगड-धोंड्यांच्या आणि निधड्या सह्याद्रीच्या कडा कपारातून जसे छत्रपती शिवबांनी आपल्या मावळ्यांच्या जोरावर स्वराज्य निर्माण केलं, रयतेचं राज्य आणलं तसं आपण सर्व तमाम वाचकांच्या बळावर रिपोर्टरने विश्वासार्हतेचं छत्र निर्माण केलं. कष्टकर्यांचं, कामगारांचं, सर्वसामान्यांचं वृत्तपत्र म्हणून रिपोर्टरला चारचौघात नव्हे तर जिल्हा आणि परजिल्ह्यातही नवाजलं गेलं. हे आमच्यासाठी अभिमानास्पद. रिपोर्टरचं हे कर्तृत्व नुसतं माझं नाही, माझ्या टिमचंही नाही तर रिपोर्टरवर प्रेम करणार्या तमाम वाचक वृंदांचं आहे हे मी छातीठोकपणे सांगेन. गेल्या दोन वर्षांच्या कालखंडामध्ये जे काही घडलं ते थरारक होतं.
अंगावर काटा आणणारं होतं. मृत्यूसमोर सर्व धर्म-पंथ सारखेच असतात हे सांगणारा तो कालखंड होता. कोरोनाने माणसाला माणूस म्हणून जगवण्याची जशी शिकवण दिली तशी त्या कालखंडात एकमेकांत दुरावाही निर्माण करून सोडला. आपली भेट ही बर्याच दिवसानंतर होत आहे. निमित्त रिपोर्टरचा 29 वा वर्धापनदिन. आपला रिपोर्टर आता 30 व्या वर्षात पदार्पण करत आहे. हा कालखंड पहाताना आणि मागच्या आठवणींना उजाळा देताना बसमध्ये बसावं, बस सुसाट वेगाने मार्गस्थ व्हावी, त्या वेळी खिडकीतून बाहेर डोकवावं, तेव्हा झाडे जशी मागे पळताना दिसतात तशी मनाची चलबिचल आज होते. तुमच्या शुभेच्छा… तुमचे प्रेम हे प्रचंड आहे. यात दुमत असण्याचं कारणच नाही. उलट आम्ही कुठं कमी पडलो असतो, मात्र वाचक मायबाप आमच्या पाठीवर थाप मारायला विसरले नाहीत, डोक्यावरून मायेचा हात फिरवायला विसरले नाहीत. चुकलोच तर खडेबोलही वाचकांनी सुनावले. हा अधिकार तुम्हाला यासाठीच आहे, हा रिपोर्टर तुमचा आहे सर्वसामान्यांचा आहे, कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळ्यांचा आहे. वृत्तपत्र काढणे जेवढे सोपे तेवढेच ते चालवणे किती अवघड हे आम्हालाच माहित. एखादं लेकरू जन्माला यावं, त्यावेळी त्या मातेला जेवढ्या कळा लागत नसतील तेवढ्या कळा वृत्तपत्र चालवताना लागतात. आत्ताच बघा ना कागदाचे भाव गगनाला भिडले, शाई गगनाला भिडली अशा स्थितीतही चार रंगीत आणि चार कृष्णधवल पानाचा पेपर अवघ्या तीन रुपयांमध्ये देत आहोत. खरंतर एका पेपरला तयार होऊन बाहेर पडण्यासाठी 9 ते 11 रुपये लागतात. परंतु रिपोर्टरवर प्रेम करणार्या आणि रिपोर्टर तितक्या लोकात जातोय म्हणून ज्या विश्वासाने जाहिरातदार आमच्या सोबत आहेत ते रिपोर्टरसाठी एक खांब म्हणावे लागतील. वृत्तपत्र चालवताना जाहिरात आणि विश्वासार्हता जपायची असते आणि ती तेव्हाच जपली जाते जेव्हा ‘सत्य-असत्याशी मन केली ग्वाही मानलिय नाही बहुमता’ हा सिद्धांत जपला जातो. ‘वेदाचा तो अर्थ आम्हाशी ठावा, इतरांनी वहावा भार माथा’, असे सडेतोड उत्तर देण्याची हिम्मत ठेवावी लागते. ती आमच्यावर झालेल्या आमच्या पित्याच्या संस्कारामुळे आमच्यात आजही आहे. दु:ख एका गोष्टीचं वाटतं… आज तेच पितृछत्र आमच्या डोक्यावरून बाजुला झालं ज्या पित्याने शेतात कष्ट करून शहरात शिकवलं, वृत्तपत्र काढताना पाठिशी खंबीरपणे उभे राहत धाडस दिलं. रिपोर्टरचा एवढुसा वेल गगनावर जात असताना नावाचं, कर्तृत्वाचं, ध्येय-धोरणाचं फलित झालं ते पाहण्यासाठी आज आमचे वडील शेख सिकंदर आमच्यात नाहीत हे दु:खच. परंतु त्यांची शिकवण, त्यांचे धैर्य ठेवून संघर्ष करण्याची आम्हाला दिलेली शिदोरी आमच्या सोबत आहे. गेल्या वर्षात ते अल्लाहला प्यारे झाले. आम्ही पोरके झालेलो असलो तरी त्यांच्या कष्टाचे आणि कर्माचे फळ नितीमत्तेने जगून आणि लोकांचे प्रश्न समाजासह शासन-प्रशासन व्यवस्थेसमोर मांडून ते आमच्या प्रत्येक कार्यात कायम असणार हेही तेवढेच खरे. रिपोर्टरने आजपर्यंत अनेक गोष्टी सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिल्या. लोकांचे प्रश्न ते आमचे प्रश्न मानून आम्ही ते मांडले. अनेक प्रश्नांना उत्तरही सापडले. काहींना ते द्यावे लागले. या सर्व कालखंडामध्ये रिपोर्टर थांबला नाही. नव्हे नव्हे कोरोनासारख्या महामारीत सर्व वर्तमानपत्रांच्या प्रिंटिंग बंद होत्या, प्रत्यक्षात पेपर छापणे बंद केले गेले होते मात्र अशा स्थितीतही महाराष्ट्रात एकमेव रिपोर्टर हा होता की त्याने कोरोनाच्या कार्यकाळामध्ये एक दिवसही छपाई बंद ठेवली नाही. लोकांना सत्य माहिती, शासनाच्या गाईडलाईन्स, कोरोनापासून बचावासाठी असणार्या उपाययोजना वृत्तपत्रातून आणि ई-पेपरच्या माध्यमातून दिल्या. आज 29 वं वर्ष संपलं तसं तिसाव्या वर्षामध्ये पदार्पण करताना आम्ही बीड जिल्ह्याच्याच नव्हे महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसांचा आवाज बनणं पसंत करू. हे करताना आज पावेत आपण जे सहकार्य, जे प्रेम आम्हाला दिलं ते यापुढेही आपण द्याल हीच अपेक्षा ठेवतो.