जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराच्या उद्या तोफा थंडावणार
वैयक्तीक गाठीभेटीवर राहणार भर
संवेदनशील गावात पोलिस यंत्रणेची करडी नजर
बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यातल्या 704 ग्रा.पं.साठी 18 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. गेल्या आठ दिवसापासून गावागावात प्रचाराची धुम सुरू आहे. काही गावात दोन तर काही गावात तिन पॅनल निवडणूकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी पॅनल प्रमुखासह उमेदवारांनी गाव पिंजून काढले. प्रचारासाठी बॅनर, पोस्टर व भोंग्याचा वापर सुरू आहे. उद्या प्रचाराच्या तोफा थंडावणार असून आता वैयक्तीक गाठीभेटीवर उमेदवारांचा जास्त भर राहणार आहे. जे गावे संवेदन व अती संवेदनशील आहेत अशा गावांवर पोलिस प्रशासनाची विशेष नजर राहणार आहे. निवडणूकीमुळे ग्रामीण भाग ढवळून निघाला आहे.
स्थानिक पातळीवरच्या महत्वाच्या असलेल्या ग्रा.पं.निवडणूकीचा रणसंग्राम सुरू आहे. जिल्ह्यातल्या 704 ग्रा.पं.साठी 18 डिसेंबरला मतदान होत असल्याने 8 दिवसापासून प्रचाराचा रणसंग्राम गावागावात सुरू झालेला आहे. काही गावात दोन तर काही गावात तीन पॅनल निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. ग्रामपंचायत, सरपंचपद जनतेतून असल्यामुळे निवडणूकीला अधिकच महत्व प्राप्त झाले आहे. आपलाच पॅनल निवडून आला पाहिजे यासाठी अटीतटीच्या लढती होत आहेत. गाव पुढार्यांनी गाव ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली. प्रचारासाठी ठिकठिकाणी बॅनर, पोस्टर व भोंग्याचा वापर सुरू आहे. पॅनलप्रमुख रॅली काढून मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करत आहेत. उद्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. शनिवारी उमेदवार मतदारांच्या वैयक्तीक गाठीभेटी घेण्यावर जास्त भर देतील. काही गावामध्ये मतदानावरून यापूर्वी मारामार्या झालेल्या आहेत. अशा संवेदनशील आणि अतिसंवेदनशील गावामध्ये राडा होवू नये म्हणून पोलिस प्रशासनाची करडी नजर राहणार आहे.