इंदापूर (रिपोर्टर) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवसांपासून बारामती दौर्यावर आहेत. आज त्यांनी इंदापूर तालुक्यातील बोरी येथील शेतकर्यांशी थेट बांधावर जाऊन संवाद साधला. वयाच्या 82 व्या वर्षीही ते शेतकर्यांच्या समस्या सोडविण्याबरोबरच त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी थेट शेतकर्यांच्या बांधापर्यंत पोहोचले आहेत.
नवीन वर्षाचा आज पहिला दिवस आहे. एकीकडे लोक नववर्षाच्या सागतासाठी पर्यटन स्थळांवर जात असताना शरद पवार मात्र शेतकर्यांच्या बांधावर पोहोचले आहेत. इंदापूर तालुक्यातील बोरी गावाला त्यांनी भेट दिली. यावेळी बोरी गावच्या ग्रामस्थांकडून पवार यांचे स्वागत करण्यात आले. पवार यांनी बोरी गावातील रामहरी जगताप या शेतकर्याच्या द्राक्ष शेती प्लॉटला भेट दिली. भेटीदरम्यान त्यांनी माहिती घेऊन विचारपूस केली.
दरम्यान श्रीराम चौक बोरी येथे व गॅलेक्सी फ्रेश कोल्ड स्टोरेज येथे पवार यांचा सत्कार करण्यात आला. रीलायबल कोल्ड स्टोरेज बोरी येथे त्यांनी शेतकर्यांशी संवाद साधला. बोरी गाव हे द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहे. येथील द्राक्ष साता समुद्रापार निर्यात होतात. चीन, श्रीलंका, थायलंड मलेशिया, दुबई या देशांमध्ये बोरीची द्राक्ष मोठ्या प्रमाणात निर्यात होते. वयाची 82 पार केल्यावरही तरुणांना लाजवेल असा त्यांचा दिनक्रम सुरू आहे. या वयातही ते थेट शेतकर्यांच्या बांधापर्यंत जाऊन त्यांच्या अडीअडचणी समस्या सोडवण्याचे काम करत असल्याचे दिसते.
भाजपने बारामतीवर लक्ष केंद्रीत केले आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह यांच्यासह भाजपचे आमदार आणि बडे नेते हे बारामतीत येऊन गेले. बारामती हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असला तरी तो अधिक भक्कम करण्यासाठी शरद पवारांचे दौरे सुरू आहेत. इंदापूरमधील बोरी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. आता आज शरद पवारांच्या उपस्थितीत अनेक जण राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.