केज (रिपोर्टर): दोन वर्षांपूर्वी कोटेशन भरूनही वीज जोडणी होत नाही, वारंवार महावितरणचे खेटे घातले तरी लाईट मिळत नसल्याने विहीरीत पाणी असतांनाही डोळ्यादेखत उभं पिक जळून चालल्याने संतप्त झालेल्या टाकळी येथील शेतकर्याने आज सकाळी महावितरण कार्यालय गाठत आत्मदहनाचा प्रयत्न केला. अंगावर पेट्रोल ओतून घेतले. काडी पेटवण्यापूर्वीच पोलीसांनी प्रसंगावधान दाखवत त्या शेतकर्यास ताब्यात घेतले. दोन वर्षांपासून खेटे घालणार्या शेतकर्याला वीज जोडणी होत नसल्याने केज महावितरण विरोधात संतापाची लाट पसरली आहे.
धनराज सदाशिव घुले रा.टाकळी या शेतकर्याने लाईट मिळावी यासाठी दोन वर्षांपूर्वी कोटेशन भरले, शासनाचे पुर्ण कागदपत्र तयार करून लाईट जोडणीची मागणी केली मात्र आज जोडू, उद्या जोडू म्हणून घुले यांना महावितरणचे अधिकारी मुंडे हे वारंवार टाळत होते. विहिरीला पाणी असतांना लाईट नसल्याने उभं पिक डोळ्यादेखत करपून चालल्याने मुंडे हे अस्वस्थ झाले होते. कालच त्यांनी महावितरणच्या अधिकार्यांना लाईट जोडून द्या अशी विनंती केली. अशा विनंत्या त्यांनी वारंवार केल्या मात्र याची कसलीही दखल महावितरण अधिकारी मुंडे यांनी घेतली नाही. त्यामुळे धनराज घुले यांनी आज दुपारी 1 वा. केजचे महावितरण कार्यालय गाठत सोबत आणलेली पेट्रोलची बाटली अंगावर ओतून घेतली. खिशातील काडी पेटवणार तोच केजच्या पोलीसांनी प्रसंगावधान दाखवत शेतकरी धनराज यांना ताब्यात घेत त्यांच्याकडील काडीपेटी हिसकावून घेतली. माझं पिक केवळ आणि केवळ महावितरण अधिकार्यांच्या गलथान कारभारामुळे जळून जात आहे. उभं पिक जळत असल्याने मलाही जळू द्या असे म्हणत धनराज घुले यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. केज पोलीस ठाण्याचे ठाणेप्रमुख शंकर वाघमोडे यांनी पाठविलेल्या पो. मतीन, पो.गीते, चौधरी, आवेज, अहंकारे यांनी वेळीच घटनास्थळी दाखल होत शेतकर्याचा जीव वाचवला. महावितरणने शेतकर्याचा अंत न पाहता विज जोडणी करावी अशी मागणी होत आहे.