बीड (रिपोर्टर): मध्यप्रदेशमधील तीन अल्पवयीन मुलांना ऊसतोडणीसाठी दिंद्रुड येथे आणण्यात आले होते. सदरील हा प्रकार बालकल्याण समितीच्या निदर्शनास आल्यानंतर याबाबत बालकल्याण समितीने पोलिस प्रशासनाला माहिती दिली. मुलांच्या घरच्यांना बीड येथे बोलावुन घेण्यात आले. याप्रकरणी दिंद्रुड पोलिस ठाण्यात ऊसतोड मुकादमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
विनोद नामदेव कांबळे (वय 50) रा.मोहखेड ता.धारूर जि.बीड याने गेल्या काही दिवसापुर्वी मध्यप्रदेश येथील महेंद्रवाडी ता.घोराडोंगरी जि.बैतुल येथुन तीन अल्पवयीन मुलांना ऊसतोडणीसाठी आणले होते. हे मुल माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड हद्दीमध्ये ऊसतोडणीचे काम करत होते. सदरील हा प्रकार मयुर कांबळे यांना निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याची माहिती चाईल्ड लाईनला दिली. त्यानुसार चाईल्ड लाईनने पोलिस प्रशासनाकडे याची तक्रार केली. तसेच अल्पवयीन मुलांच्या घरच्या लोकांना बीड येथे बोलावुन घेतले. या तीनही मुलांच्या आई बीड येथे आलेल्या आहेत. या मुलांचे वय 14, 15 आणि 13 असे आहे. सदरील हा प्रकार चुकीचा असुन मुलांना इतर ठिकाणाहुन आणुन त्यांच्याकडुन काम करून घेता येत नाही. याप्रकरणी बत्तेसिया नंदु उईके (वय 45) रा.महेंद्रवाडी यांच्या फिर्यादीवरून मुकादम विनोद कांबळे याचा विरोधात दिंद्रुड पोलिस ठाण्यात कलम 370, 374, 34 (3) भादंवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. बालकल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे, सदस्य अॅड.संतोष वारे, सुरेश राजहंस, प्रा.छाया गडगे, तत्वशील कांबळे यांच्या प्रयत्नामुळे सदरील हा प्रकार उघडकीस आला आहे. या समितीने वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळेच आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला.