राजकारणात अवमेळ राहिला नाही. राजकारण हे पुर्णंता बेभरोशाचा झालं. कोणाच्या मनात कोणता पक्ष असेल हे काही सांगता येत नाही. निष्ठा, तत्व हे शब्द फक्त ठेवणी पुरते मर्यादीत राहिले. जिथं स्वार्थ आहे, तिथं राजकारण शिजू लागलं. स्वार्थामुळे राजकारणाचा बेरंग होवू लागला. जे कार्यकर्ते हाडाचे आणि तत्वाचे आहेत. त्यांच्यासाठी आजचं राजकारण नरक बनू लागलं. सत्ता म्हणजे सर्व काही नाही, पण आजच्या राजकारण्यांना सत्ता हे र्स्वस्व वाटू लागलं. सत्तेसाठी प्रमुख पक्षाचे नेते काय निर्णय घेतील हे सांगता येत नाही. फाटाफुट, बंडखोरी अशा राजकीय ‘कंड्या’ सर्रासपणे वापरल्या जावू लागल्या. एका पक्षाकडून निवडून यायचं आणि दुसर्या पक्षाच्या घरात घुसायचं हे बेचव राजकारण जन्माला आलं. बंडखोर निष्ठेची आणि तत्वाची भाषा बोलू लागले याचचं नवलं वाटू लागलं. बंडखोरी सत्यासाठी झाली तर त्यात काही वावगं नाही, पण कुणाला तरी धडा शिकवायचं, सत्ता मिळवायची यासाठी बंडखोरी करणं म्हणजे हा सरळ, सरळ राजकीय द्रोह आहे. या द्रोहाचीच राजकारणात जास्त वाढ होवू लागली. जे लोक राजकारणात अविचार पेरू लागले. त्या लोकांनाच पुढे धोके निर्माण झाले तर नवल वाटायला नको. काही बड्या पक्षांनी सरळ, सरळ राजकारणाला वेशीवर टांगण्याचे काम केलं. सत्ता कधी कोणाची कायमची नसते, ती कधी ना कधी उलटून पडत असते. सत्तेचा अहंकार कुणाला नसावा. एकदा सत्ता गेली की, कुणी विचारत नाही. त्यासाठी राजकारणाला विचाराची बैठक देणं गरजेचं आहे. राज्याच्या राजकारणात अनेक नेते असे होवून गेले. त्यांनी सत्तेचा कधी मोह ठेवला नाही. आपल्या विचाराशी तडजोड केली नाही. राजकारणातील विचाराची परंपराच मोडीत काढण्याचे काम जोमाने सुरु आहे. हा प्रकार लोकशाहीला प्रचंड घातक आहे.
काँग्रेसचं घर खिळखिळं !
काँग्रसेचं काही राहतं की, नाही असचं वाटू लागलं. काँग्रेसमधील एक,एक बडा नेता दुसर्या पक्षाचं दार ठोठावू लागला. काहींना बेहिशोबी संपत्तीच्या चौकशीची भीती वाटू लागली. काहींना आपलं राजकीय करिअर धोक्याचं वाटू लागलं. भाजपात गेल्या नंतर सगळं काही सुरळीत होतं असा काही पुढार्यांचा समज झाला. भाजपात गेल्यावर आपण स्वच्छ धुतल्या सारखं होतोत असं ही वाटू लागलं. त्यामुळे गेल्या पाच वर्षात अनेकांनी भाजपात जावून आपण किती चांगले आहोत असं सांगून काँग्रेस किती वाईट आहे असं सांगायला सुरुवात केली. त्यामध्ये नगरचे विखे पाटील आहेत. त्याच बरोबर इतर काही नेते आहेत. ज्यांची संपुर्ण ह्यात काँग्रेसमध्ये गेली तेच आज काँग्रेस पक्षाला ‘शहाणपणा’ शिकवू लागले. राज्याच्या काँग्रेसमध्ये अवमेळ राहिला नाही. काँग्रेसमधला प्रत्येक जिल्हयाचा नेता हा बडा प्रस्थापीत आहे. त्यामुळे तो स्वत:ला मोठा समजतो. संस्थानिक असल्यामुळे जिल्हयाच्या राजकारणात बड्या नेत्याचा चांगला जोर असतो. काँग्रेसचा बडा नेता कोणत्याही पक्षात गेला तरी तो ठरावीक मताचा धनीच असतो. त्यामुळे कोणत्याही पक्षासाठी बडे नेते फायद्याचे असतात. निवडणुकीतलं आर्थिक गणीत बरच जुळतं असतं. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना भाजपा तितका वाव देत नाही पण बड्यांना जास्त भाव देवू लागला. पद, आमदारकी, खासदारकी बड्यांच्या पदरी पडू लागली. त्यामुळे बड्यासाठी भाजपा हा चांगला पर्याय ठरू लागला. आता पर्यंत भाजपाने प्रस्थापीताच्ंया विरोधात बोटं मोडले आज मात्र तोच भाजपा प्रस्थापीतांना आपल्या पक्षात घेण्यासाठी पायघड्या घालू लागला. काँग्रेसचे नेते तत्वाची जी भाषा बोलत असतात. तेच नेते भाजपात गेल्यानंतर जातीयतेची आणि विखारी भाषा बोलतात याचचं आश्चर्य वाटतं. मतासाठी आणि राजकारणासाठी किती लाचारी पत्कारली जाते याचे उदाहारण राज्यात रोजचं पाहावयास मिळत आहे.
तांबे यांचं असत्याचं राजकारण!
राज्याच्या राजकारणात काही ठरावीक घराण्यांची नावे घेतली जातात. त्यात तांबे कुटूंब आहे. सुधीर तांबे हे काँग्रेस पक्षाकडून तीन वेळा आमदार राहिलेले आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत सुधीर तांबे यांनाच पक्षाने उमेदवारी दिली होती. तांबे यांनी शेवट पर्यंत आपला अर्ज दाखल केला नाही. सुधीर तांबे यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी देखील अर्ज दाखल केला होता. सुधीर तांबे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नसल्याने काँग्रेस पक्षावर मोठी नामुष्की आली. पक्षाने एखाद्या नव्या कार्यकर्त्याला संधी देण्याऐवजी जुन्या आणि प्रस्थापीत नेत्यालाच उमेदवारी दिली. सत्याजीत तांबे हे तर काँग्रेसचे प्रदेश युवक अध्यक्ष आहेत. असं सगळं काही चांगलं असतांना त्यांनी पक्षाशी गद्दारी करुन आपला हिसकाच पक्षाला दाखवून दिला. दुसरीकडे भाजपाने त्या ठिकाणी उमेदवार दिला नाही. याचा अर्थ भाजपा आणि तांबे याचं आधीच बोलणं झालं होतं. त्यात काँग्रेस पक्षाला अंधारात ठेवून सगळा गेम करण्यात आला. भाजपाने सरळ, सरळ काँग्रेसच्या उमेदवाराला फोडून त्यास आपल्या घरात घेतलं. तांबे हे बाळासाहेब थोरात यांचे नातेवाईक आहेत. असं असतांना ही तांबे बंडखोरी करतात याचा अर्थ काय?
संघटन कुचकामी
काँग्रेसचं राज्यात संघटन खुप कमी झालं. नुसते पदे घेण्याचा सपाटा सुरु आहे. आमदार, खासदार झाल्यानंतर नेते पक्ष वाढीसाठी कुठलाच प्रयत्न करत नाही. पक्ष कसा वाढवायचा याचा आदर्श काँग्रेसने भाजपाकडून घेतला तर नक्कीच बरं होईल. भाजपा पक्षात एक वेगळी शिस्त आहे. ती कॉग्रेंस पक्षात पुर्वी होती पण आता राहिली नाही. गाव पातळीपासून ते राज्य पातळीवर काँग्रेसचं संघटन होतं, हे संघटन इतिहास जमा झालं. सत्ता असो किंवा नसो. पक्षात वाढ होत नाही. दिल्ली पातळीवरुन पक्ष वाढत नसतो. राहूल गांधी, सोनिया गांधी यांच्या सभा घेतल्याने पक्षाचे कार्यकर्ते वाढत नसतात. ग्राऊंड पातळीवर काम झालं तरच पक्षाचं संघटन वाढत असतं. राज्यातील नेत्यांना अंगमेहनत घ्यावी लागेल तेव्हाच पक्ष पुढे जावू शकतो. नसता आहे त्या काँग्रेसचे चिरे ढासळून पडल्याशिवाय राहणार नाही.
काँग्रेसमध्ये कुणी
येत नाही?
ज्यांची चलती आहे. त्याकडे प्रवाह वाहत असतो. काँग्रेसचे अनेक बडे नेते पक्ष सोडून गेले, पण काँग्रेसमध्ये कुणी यायला तयार नाही. काँग्रेस बद्दल सध्या तरी नकारात्मक भावना कार्यकर्त्यांची निर्माण झाली. देश पातळीवर राहूल गांधी यांचे कार्य चर्चेत असले तरी राज्यात तितका प्रभाव दिसेना. भारत जोडो यात्रेने बराच फरक फडला. राहूल यांनी चांगली वातावरण निर्माीती केली. त्याला फायदा राज्यातील काँग्रेसला कारता येईना. काँग्रेसने मेळावे घेणे, बैठका घेणे हे कमीच केले. कार्यकर्त्यांशी संवाद झाला तरच कार्यकर्ते जोडले जावू शकतात. राज्यात सगळ्यात जास्त बडे नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात आहे, पण त्याचा तितका फायदा दोन्ही पक्षाला होतांना दिसत नाही. भाजपाने फोडाफोडी करुन आपलं घर पुर्णंता हाऊस फुल्ल करुन ठेवलं. बसायला जागा नाही इतकी गर्दी आज भाजपाच्या गोटात निर्माण झाली. इतर काही बडे नेते भाजपाच्या वाटेवर असल्याच्या वावड्या उठवल्या जात आहे. मध्यंतरी लातुरच्या देशमुख कुटूंबीयांचे नाव होते. त्यांनी त्यावर पडदा टाकण्याचे काम केले. स्व. विलासराव देशमुखापासून ते सध्याचे आ.अमित देशमुख यांची राजकीय कारकीर्द काँग्रेसमध्ये गेलेली असतांना. अमित देशखमुख काँग्रेस सोडणार अशी चर्चा सुर होते म्हणजे कुठं तरी काही तरी शिजत आहे असचं म्हणावं लागेल? येत्या निवडणुकीच्या तोंडावर आणखी किती काँग्रेसला भगदाड पडतं कुणास ठाऊक. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष संपतील. या दोन्ही पक्षाच्या फक्त बोटावर मोजण्या इतक्याच जागा निवडून येतील असं सांगितलं जात होतं, पण राष्ट्रवादीमुळे काँग्रेस पक्ष सावरला गेला. स्वत: शरद पवार मैदानात उतरले होते. पवार यांनी प्रचार दौरे केल्यामुळेच गत निवडणुकीत दोन्ही पक्षांची आब्रु वाचलेली आहे. येत्या निवडणुकीत काँग्रेसने जोमाने तयारी केली नाही तर काँग्रेसला अस्तित्व वाचवणे मुश्कील होणार आहे.
भाजपाची व्युहरचना !
महाराष्ट्र राज्य स्थापनेपासून ते आज पर्यत राज्यात अनेक राजकीय घडमोडी घडलेल्या आहेत. कित्येक वेळा दगाफटका करुन वेगळी सत्ता निर्माण करण्याचे काम अनेक वेळा झालेलं आहे. मग पुलदोचा प्रयोग असेल किंवा अन्य काही राजकीय घडमोडी असतील. राजकारण करतांना फोडाफोडी महत्वाच्या ठरू लागल्या. ज्यांना चांगलं राजकारण जमतं. तोच नेता राजकारणात यशस्वी होऊ शकतो. महाआघाडी सरकारला पाडून नवं सरकार स्थापन करण्यात आलं. शिवसेना फोडण्यात भाजपाचाच हात आहे हे आता समोर आलं. भाजपाचे नेते तसं उघड, उघड बोलून दाखवू लागले. शिवसेना फोडण्यात देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची भुमिका बजावली असणार? त्यात दिल्लीचा हात असणार? राज्यात कोणत्या ही निवडणुका घोषीत झाल्या तरी त्या फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली लढवल्या जातात. इतरांना निवडणुकीत हास्तक्षेप करण्याची संधीच दिली जात नाही. अगदी उमेदवारी कोणला द्यायचा याचा अधिकार सुध्दा फडणवीस यांच्याकडेच आहे? फडणवीस यांना राजकारणाचा चांगला अभ्यास झाला. कोणाला कसं गेअरमध्ये घ्यायचं, कोणाला पटकी द्यायची हे त्यांना बरोबर माहित आहे. आपल्या पक्षात कोणाला डावलायचं आणि कोणाला वर आणायचं हे सुध्दा फडणवीस ठरवतात. फडणवीस सध्याच्या राजकारणातील ‘चाणक्य’ ठरु लागले. फडणवीस यांच्या बाजुचे नेते तुपात असतात. विरोधातील नेत्यांना वाळीत टाकण्याचं काम केलं जात आहे. पंकजा मुंडे भाजपात पक्षात नाराज आहेत. पंकजा यांना जाणीव पुर्वक डावण्यात येत आहे. ‘मी पक्षात नाराज नाही’ असं किती ही पंकजा म्हणत असल्या तरी त्यांची नाराजी लपत नाही. पंकजा यांनी आमच्या पक्षात यावं असं शिवसेना, काँग्रेस साकडं घालत आहे. सध्या तरी पंकजा शांतच आहेत. फडणवीस यांनी बाहेरच्या नेत्यांचा सन्मान करुन त्यांना महत्वाची पदे दिली. विखे पाटील याचं भाजपासाठी काय योगदान आहे. त्यांना पक्षाने महत्वाचं महसूल खातं दिलं. पंकजा यांना मंत्रीमंडळात स्थान दिलं असतं तर नाराजी नाट्य दिसून आले नसते. ते पक्षासाठी चांगलं राहिलं असतं. भाजपा दुसर्यांचे लेकरं मांडीवर घेवून खेळवत आहे, पण स्व पक्षातील काहींना छळवत आहे, हे राजकारण नक्कीच चांगलं नाही. परवा भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा होत आहेत. जनतेचं राज्य 26 जानेवारीला अस्त्तित्वात आलं. आज राजकारणातील ‘नितीमत्ता’ बदलली. जनतेच्या हितापेक्षा राजकीय घडमोडीला महत्व मिळू लागलं. घटनेला अपेक्षीत असलेलं राजकारण हेच देशाच्या हिताचं ठरु शकतं.