नूर कॉलनी भागात घराच्या वर तारा लटकलेल्या
मागणी करूनही वीज कंपनी दुर्लक्ष करते
बीड (रिपोर्टर) बीड शहरासह ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी विजेच्या तारा खाली लटकलेल्या दिसून येतात. तारा दुरुस्तीकडे वीज कंपनी वेळोवेळी दुर्लक्ष करते. शहरातील गांधीनगर भागात असलेल्या नूर कॉलनी परिसरात घराच्या वर तारा लटकलेल्या आहेत. अगदी हाताला येतील, इथपर्यंत या तारा लोंबकळलेल्या आहेत. मे महिन्यात येथील नागरिकांनी तारा दुरुस्त करण्याबाबतचे निवेदन दिलेले आहे, तरी अद्याप त्यावर कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. दुर्दैवी घटना घडल्यानंतर तारा दुरुस्ती करणार का?अशा संतप्त प्रतिक्रिया या भागातील नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
गांधीनगर येथील नूर कॉलनी परिसरातील सोनवणे डीपी अंतर्गत विजेच्या तारा अनेक ठिकाणी खाली लटकलेल्या अवस्थेत आहेत. ज्या भागात तारा लटकलेल्या आहेत, त्या ठिकाणी पत्र्याचे शेड मारलेले आहे. तार एखाद्या वेळेस तुटली तर अख्ख्या घरात विजेचा प्रवाह उतरून दुदैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या भागात सतत पाण्याचे टँकर ये-जा करतात. टँकरलाही तारा घासून दुर्दैवी घटना घडू शकते. तारा दुरुस्ती संदर्भात मे महिन्यामध्ये येथील समाजसेवकांसह नागरिकांनी वीज वितरण कंपनीकडे तक्रार केलेली आहे, अद्यापपर्यंत यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतरच वीज कंपनी झोपेतून जागे होणार का? अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.