Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeबीडनॉट फॉर सेल औषधांची ब्लॅक मार्केटींग

नॉट फॉर सेल औषधांची ब्लॅक मार्केटींग


कोव्हॅक्सीन लस, अँटीबॅटीक औषधे, ऍसिडीटीचे इंजेक्शनचा साठा शेडमध्ये आढळून आला; ‘तो’ शासकीय औषधांचा साठा कोणाचा?
३० मे दुपारचे ३ वाजले होते. पोलीस अधिक्षक यांचे पथक नुकतेच आपल्या हातातील काम करून थोड्या वेळ विश्रांती घेत असतांनाच पोलीस अधिक्षक पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे यांना एक कॉल आला. त्या कॉलवर बोलणे संपताच क्षणाचाही विलंब न करता त्यांनी आपल्या पथकाला सोबत घेवून थेट पेठ बीड हद्दीतील अचानकनगर गाठले. तेथे गेल्यानंतर त्यांना फोनवरून मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी एका पत्र्याच्या शेडमध्ये कारवाई केली. ते पत्र्याचे शेड रिकामे होते, बाहेरून कडी लावलेली होती, कुलूप फक्त लटकलेले होते. पथकाने दार उघडून त्या शेडमध्ये प्रवेश केला आणि आतमधील अवस्था पाहून पोलीस प्रशासन दंग झाले. त्या शेडमध्ये काही औषधांचा साठा पडलेला होता. सर्व प्रथम हे शेड कोणाचे? पोलीसांनी याचा तपास लावला, शेडमध्ये आढळून आलेला औषध साठा ताब्यात घेवून थेट पेठ बीड पोलीस ठाणे गाठले. तेथे संबंधित शेड मालकाला बोलवण्यात आले आणि चौकशी सुरू झाली. विशेष म्हणजे जो औषध साठा सापडून आला त्यात ‘नॉट फॉर सेल’ लिहिलेले होते, म्हणजे हे औषधी शासकीय होती. पोलीस प्रशासनात खळबळ माजली, नेमका हा काय प्रकार? हे औषधी शासकीय कोठ्यातील मग अचानक नगरमधल्या त्या शेडमध्ये कशी आली? संबंधित शेड मालकाला बोलवण्यात आले. तो शेड मालक गेल्या दोन-चार दिवसापासून बीडमध्येच नव्हता. त्याचे राहते घर दुसरीकडे आहे, त्या शेडला बाहेरून भिंत दिसते, दरवाजाला कुलूप लावलेला दिसतो पण तो कुलूप फक्त लटकलेला असतो. शेड मालकाने थेट पेठ बीड पोलीस ठाणे गाठले. स्वत:चे शेड असल्याने जिम्मेदारी घ्यावीच लागणार. नियमाने पेठ बीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्‍वास पाटील यांनी या प्रकरणी पुढील तपासासाठी माहिती औषध प्रशासनाचे ड्रग्ज इंस्पेक्टर आर.बी.डोईफोडे यांना दिली. डोईफोडे यांच्या फिर्यादीवरून संबंधित शेड मालकावर गुन्हा दाखल झाला आणि या प्रकरणाचा गंभीर तपास डोईफोडे आणि पोलीस निरीक्षक विश्‍वास पाटील हे स्वत: करू लागले. विशेष म्हणजे या औषध साठ्यात कोव्हॅक्सीन लस आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसापूर्वी बीड जिल्हा रूग्णालयातून मयत झालेल्या रूग्णांचे रेमडेसीवर इंजेक्शनचा काळा बाजार झाल्याचा आरोप असतांनाच आता पुन्हा शासनाकडून पुरवठा होणारी लस थेट त्या औषध साठ्यात आढळून आल्याने कोरोना काळात रेमडेसीवर सोबत आता कोव्हिड लसचेही ब्लॅक मार्केटींग सुरू झाली की काय? असा संशय व्यक्त केला जात असला तरी या मागचे गुपीत अत्यंत भयंकर असून या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. विशेष म्हणजे हे औषधी जिल्हा रूग्णालयातून की जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या औषध भंडारातून बाहेर गेली हे सांगणे शक्य नाही. कारण की, औषध भंडारातून ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रूग्णालय किंवा जिल्हा रूग्णालयातील अंतररूग्ण विभाग येथे औषधी देतांना औषध भंडार विभाग डिमांड व्हाऊचरवर फक्त औषधाची नाव आणि किती औषधी दिली याचाच उल्लेख करतात. त्या व्हाऊचरवर बॅच नंबर नमुद नसल्याने नेमकी शेडमध्ये आढळून आलेली औषधे औषध भंडारमधून शेडमध्ये आली की? कोणत्या रूग्णालयातून शेडमध्ये आली हे सांगणे शक्य होणार नाही. नेमकी हे औषधे आली कोठुन? हा तपासाचा भाग आहे. यात कोणी शासकीय कर्मचारी इनवॉल आहे का? नेमके हे औषधे कोणत्या दृष्टीकोनातून जमा करण्यात आली? या औषधांची विक्री करून रूग्णांची फसवणूक करण्याचा उद्देश होता की काय? असे अनेक प्रश्‍न अनुत्तरीत असून पोलीस व औषध प्रशासन याचा शोध घेत आहे.
आढळून आलेल्या शासकीय औषध साठ्यात अँटीबॅटीक औषधे, ऍसिडीटीचे इंजेक्शन, कोव्हॅक्सिन लस व बीसीजी लस असा औषधांचा समावेश आहे . या औषधांवर नॉट फॉर सेल लिहिले असल्याने नेमकी या औषधांची किंमत किती आहे? हे सांगणे सध्या शक्य नाही. हे औषधे बीड जिल्ह्यातील आरोग्य विभागाची आहे की? इतर जिल्ह्यातून बीडपर्यंत पोहचली आहेत? याचा तपास सुरू आहे. त्या औषध साठ्यावरील बॅच नंबरवरून नेमकी ही औषधे कोणत्या जिल्ह्यासाठी देण्यात आली होती? याची माहिती मिळेल. पोलीस प्रशासनाने या सर्व प्रकरणाची माहिती औषध प्रशासनाला दिल्यानंतर डोईफोडे यांनी पेठ बीड पोलीस ठाण्यात जावून नियमाने गुन्हा दाखल केला असून आढळून आलेल्या साठ्याचे औषध नमुणे तपासणीसाठी घेण्यात आलेले आहेत. या औषध साठ्यात पावडर टाईप इंजेक्शन असल्याने पोलीस प्रशासन या प्रकरणाकडे गंभीरतेने लक्ष देवून असून रूग्णांना या औषधातून फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आल्याचेही माहिती डोईफोडे यांनी दिली. शासकीय पुरवठ्याचे औषधे खासगीमध्ये आली कशी? आरोग्य प्रशासनाचा कोणी कर्मचारी यात आहे का? किती दिवसापासून शासकीय औषधांचा खासगीमध्ये ब्लॅक मार्केटींग सुरू आहे. या प्रश्‍नांची उत्तरे सध्या तरी निरूत्तरीत आहेत. आता आरोग्य प्रशासनाने आपल्यास्तरावरही चोर शोधण्याची गरज असून घरका भेदी लंका ढाये अशी अवस्था आरोग्य प्रशासनाची झालेली दिसून येत आहे. ज्या प्रकारे या औषध साठ्यात कोव्हॅक्सिन लस आढळून आली यातून कोव्हॅक्सीनचाही काळा बाजार झाला की काय? असा संशय व्यक्त केला जात असून विशेष म्हणजे कोव्हॅक्सिन लस सरकारी व खासगी औषध दुकानावर शासनाकडूनच पुरवठा झालेला आहे. शासनाने या लसची किंमत दिडशे रूपये ठरवून दिली. त्या प्रमाणे संबंधित डॉक्टरांनी आपले व्यवसाय म्हणून इतर खर्च असे समजून शंभर रूपये व्यतिरीक्त रूग्णांकडून घ्यावे असे ठरविण्यात आले आहे. म्हणून खासगीमध्ये ही लस अडीचशे रूपयाला देण्यात येते. हे सर्व काही सुरळीत असतांना शासकीय औषधांचा साठा आढळून येणे ही अत्यंत गंभीर बाब असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज आहे.

लेबल आणि पावडर टाईप इंजेक्शन
शासकीय औषध साठ्यात आढळून आलेल्या इंजेक्शनमध्ये हमखास पावडर टाईप इंजेक्शन आहेत. या इंजेक्शनमध्ये पाण्याचे वॉयल टाकून पावडरमध्ये मिक्स करून इंजेक्शन दिले जाते. विशेष म्हणजे रेमडेसीवर इंजेक्शन सुद्धा याच पद्धतीने तयार केले जाते. यासाठ्यात हमखास पावडर टाईप इंजेक्शन असल्याने या पावडरच्या इंजेक्शनचा रेमडेसीवर इंजेक्शन बनवून बोगसपणे रूग्णांचा विकण्याचे हे षडयंत्र होते की काय? अशी चर्चा असून औषध प्रशासन या दृष्टीकोनातून विचार करतांना दिसून आले. जर हे पावडर रेमडेसीवर इंजेक्शनच्या रिकाम्या बाटलीत भरून लेबल रेमडेसीवरचा दाखवून जर विक्री झाले असते तर मोठी जिवितहानी झाली असती यात काही शंका नाही?

ड्रग्जसाठीही औषधांचा वापर
आढळून आलेल्या औषध साठ्यात तीन-चार प्रकारचे औषधी आहेत. शहरातील काही तरूण मंडळी औषधांचा ड्रग्ज म्हणून वापर करत असल्याची बाब समोर आलेली आहे. शहरातील काही तरूण मंडळी काही औषधांचा वापर नशेसाठी करतात. पोलीस प्रशासन आढळून आलेल्या या साठ्यातील औषधांचा वापर नशेसाठी तर होणर नव्हता? या दृष्टीकोनातूनही तपास करत आहेत. पोलीस अधिक्षक यांच्या पथकातील विलास हजारे यांची ही अत्यंत महत्त्वाची कामगिरी असून या संदर्भात एसपी पथकाने आता औषधांचा वापर ड्रग्जसाठी करणार्‍यांवर विशेष नजर ठेवणार असल्याची माहिती दिली. तसेच औषधातील ड्रग्ज संदर्भात राष्ट्रीयस्तरावर पर्दाफाश करणार असल्याची माहिती हाती आली आहे.

Most Popular

error: Content is protected !!