बीड (रिपोर्टर)ः- मनरेगाच्या कामावरील मजुरांची उपस्थिती नोंदवण्यासाठी गावातील ग्राम रोजगार सेवकांकडून एनएमएमएस (नॅशनल मोबाईल मॉनेटरींग सिस्टिम) प्रणाली द्वारे दिवसातून दोनदा जिओ टॅग करुन मोबाईलवर कार्यस्थळाचा फोटो घेवून मजुरांचे हजरी पट भरण्याच्या जाचक अटीमुळे मग्रारोहयोची सर्व कामे बंद झाली आहे. परिणामी शेतकर्यांच्या फळबागासह इतरचे पैसे रखडले असून गावातील मजुरांवर देखील उपासमारीची वेळ आली. या जाचक अटीमुळे यंत्रणेचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रीक सहाय्यक, सिडीईओ ऑपरेटर यांनी आपल्या मागणीसाठी असहकार आंदोलन सुरू केल्यामुळे या योजनेचा बोजवारा उडाला आहे. दरम्यान याबाबत शासनाने तात्काळ योग्य ते निर्णय घ्यावा अशी मागणी ग्राम रोजगार सेवकांसह इतर कर्मचार्यांकडून केली जात आहे.
मग्रारोहयोच्या कामावरील मजुराची उपस्थिती नोंदवण्यासाठी गावातील ग्राम रोजगार सेवकांमार्फत मोबाईल एनएमएसएस या अॅपचा वापर करुन दिवसातून दोनदा (सकाळी 6 ते 11 ) यावेळात व दुपारी (2 ते 4 ) या दरम्यान फोटो घेेणे बंधनकारक केले आहे. ग्रामीण भागातील ग्राम पंचायतीच्या रोजगार सेवकांना मोबाईल दिला नाही. आणि शासन त्यांना अशा पध्दतीने हजेरी घेण्यास सांगत आहे. त्यामुळे कर्मचारी सतप्त झाले असून त्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले. त्याचा परिणाम मजुरांवर झाला. मजुरांची मजुरी रखडली. शेतकर्यांसह इतरांचे पैसे अडकून पडले आहेत. याबाबत शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी कर्मचार्यांच्यावतीने केली जात आहे.