बीड (रिपोर्टर) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सानिध्यात राहून भाजपासोबत संधान साधण्याच्या प्रयत्नात असलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत जाहीरपणे भाजपा उमेदवाराला पाठिंबा दिला. तेव्हा आघाडीचा उमेदवार धोक्यात असल्याच्या चर्चा घडवून आणण्यात आल्या. मात्र बीड जिल्ह्यातल्या मतदारांसाठी आ. संदीप क्षीरसागरांनी विजयी निती आखत कुणालाही घाबरण्याचे कारण नाही. मी तुमच्या पाठिशी आहे, असे जाहीरपणे म्हरत शिक्षक मतदारांना आधार दिला आणि तिथेच थोरल्या क्षीरसागरांच्या पाठिंब्याचे महत्व संपुष्टात आले. दुसरीकडे जयदत्त क्षीरसागरांची भाजपाशी जवळीक पहिल्याच निवडणुकीत भाजपासाठी पनौती ठरली अन् संदीप क्षीरसागरांची विजयी निती कामाला आल्याची जोरदार चर्चा होताना दिसून येत आहे.
बीड जिल्ह्याच्या राजकारणात क्षीरसागरांना वगळून जमत नाही, असे अनेकदा बोलले जाते. मात्र आता थोरल्या क्षीरसागरांना वगळले तरी त्यात काही विशेष नाही असा विश्वास निर्माण करण्यासारखी गोष्ट मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील निकालातून समोर आली आहे. गेल्या सहा-सात वर्षांच्या कालखंडात थोरल्या क्षीरसागरांना पुतणे संदीप क्षीरसागर सातत्याने आव्हान देत एकतर गारद करतात किवा त्यांना राजकीयदृष्ट्या अडवण्यात यशस्वी होतात. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेतून बाहेर काढण्यात आल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीशी जवळीक साधायला सुरुवात केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सानिध्यात राहून आपण भाजपाच्या वाटेवर असल्याचे त्यांनी जिल्ह्याला दाखवून दिले. अशाच वेळी मराठवाडा शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आली अन् ही निवडणूक आपल्या बळावर भाजपाला जिंकवून दाखवू, या आवेषात त्यांनी थेट भाजपा उमेदवाराला पाठिंबा देण्याची घोषणा केली. त्यामुळे मोठे संस्थानिक असलेले थोरले क्षीरसागर राष्ट्रवादीपासून दुरावले गेले त्याचा फटका आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांना बसेल, अशा चर्चा घडवूनही आणण्यात येऊ लागले. मात्र इथे थोरल्या क्षीरसागरांच्या आव्हानाला सामोरे जात आ. संदीप क्षीरसागर यांनी गेल्या आठ दिवसाच्या कालखंडात बीड जिल्ह्यातील शिक्षक मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. संस्थानिक क्षीरसागरांच्या शिक्षकांनाही कुठल्या दबावाला बळी पडू नका, मी तुमच्या पाठिशी आहे, असे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आश्वासन देत आधार दिला. त्यामुळे इथले शिक्षक मतदार आघाडीचे उमेदवार विक्रम काळेंच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. विक्रम काळेंचा सात हजारांपेक्षा जास्त मतांनी झालेला हा विजय भाजपाचे मनसुबे उधळून लावणारा जेवढा महत्वाचा आहे, तेवढाच जयदत्त क्षीरसागरांच्या भाजप जवळकीत भाजपा उमेदवार किरण पाटील यांचा झालेला पराभव पनौती ठरवणारा म्हणावा लागेल. थोरल्या क्षीरसागरांनी या पाठिंब्याच्या माध्यमातून भाजपाला विजयी मिळवून दिला असता तर क्षीरसागरांचे महत्व अधिक वाढले असते. परंतु निती आणि नियती या दोघींवरही माजी मंत्री क्षीरसागरांची पनौती सरस ठरली आणि आ. संदीप क्षीरसागरांची विजयी निती यशस्वी झाली.