बीड (रिपोर्टर) रोजगार हमी योजनेअंतर्गत सातत्याने कुठले ना कुठले बदल केले जात असतात. 20 किंवा 20 पेक्षा जास्त मजूर असल्यावर त्या मजुराची ऑनलाईन हजेरी घेण्यासाठी आता मजूर मित्र ‘मेट’ची नियक्ती करण्यात येणार आहे. यामध्ये महिला बचत गटाच्या मजुरांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.
रस्त्याच्या किंवा इतर कामांवर 20 व त्यापेक्षा जास्त मजुरांची संख्या असते. या मजुरांची ऑनलाईन हजेरी घेण्याचे निर्देश ग्रामरोजगार सेवकांना देण्यात आले होते, मात्र संघटनेने याला विरोध केल्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला. आता मजुरांमधूनच मजूर मित्राची नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला. मजूर मत्र सर्व मजुरांची हजेरी घेऊन हे हजेरीपट ऑनलाईन करणार आहे. सदरील या मजुरांचे कामाचे स्वरुप ठरवण्यात आले आहे. मजुरांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी रोजगार योजनेच्या कामाची माहिती देणे व त्यांना कामावर येण्यास प्रोत्साहीत करणे, ग्रामपंचायतीवरील सार्वजनिक कामांवरील मजुरांची हजेरी एमएनएमएसद्वारे नोंदवणे, मजुरांना पुर्ण मजुरी मिळवण्यासाठी त्यांनी दिवसभरात करावयाच्या अपेक्षीत कामाचे चिन्हांकन करणे, कामावरील मोजमापे घेण्यासाठी तांत्रिक सहायक यांना मदत करणे, जॉब कार्डवरील माहिती वेळोवेळी अद्यावत करण्यासाठी ग्रामरोजगार सेवक, ग्रामसेवक यांना मदत करणे, मजुरांकडील पुढील कामासाठी मागणीपत्र घेणे व त्याबाबत ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवकाला अवगत करणे यासह इतर कामांचे स्वरुप मजुर मित्रांना देण्यात आलेले आहे.