माजलगाव, रिपोर्टर : माजलगाव मतदारसंघातील माजलगाव, वडवणी, धारूर या तिनही तालुक्यातील पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात अवैध धंदे बोकाळले असुन यातुन अनेकांचे संसार उध्वस्त होत असल्याने गुटखा, मटका, गावठी दारूची विक्री बंद करण्याची मागणी आमदार प्रकाश सोळंके यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे निवेदनाव्दारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मतदार संघातील माजलगाव ग्रामीण, शहर पोलिस स्टेशन, धारूर, वडवणी, दिंद्रुड, सिरसाळा या पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गावठी दारू, गुटखा, जुगार, मटका, अवैध प्रवासी वाहतुक, वाळु चोरी, दारू विक्री मोठ्या प्रमाणात सर्रासपणे सुरू आहे तर धाब्यावर देखिल दारू विक्री सुरू आहे. परिणामी दारू पिउन जाणा-या अनेक व्यक्तींचे आपघात होवून मृत्यु झाले आहेत. त्याचबरोबर शासकीय धान्याची काळ्या बाजारात विक्री केली जात आहे. त्यामुळे गोरगरिब शेतमजुर धान्यापासुन वंचित राहत आहे. त्यामुळे मतदारसंघातील सहा पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील अवैध धंदे बंद करावेत अशी मागणी जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे आमदार प्रकाश सोळंके यांनी केली आहे.