नेकनूर (रिपोर्टर) एचपीएम कंपनीने नुसताच रस्ता खोदून ठेवला. रस्त्याचे काम रखडल्यामुळे त्याचा त्रास नागरिकांसह वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. कंपनीने तात्काळ रस्त्याचा मार्ग मार्गी लावावा यासह इतर मागण्यांसाठी आज नेकनूरचे नागरिक रस्त्यावर उतरले होते. मुख्य चौकामध्ये अर्धातास रास्ता रोको करण्यात आले. या आंदोलनामध्ये अनेक नागरिकांचा सहभाग होता. हे आंदोलन नारायण शिंदेंसह आदींच्या नेतृत्वाखाली झाले.
गेल्या काही दिवसांपासून एचपीएम कंपनीच्या विरोधात नेकनूरकरात संताप व्यक्त केला जात आहे. या कंपनीने नेकनूर-मांजरसुंबा रोडचे अर्धवट काम केले. नेकनूर येथील नुरानी चौकातील रोडचे काम रखडल्याने नागरिकांना व वाहनधारकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार निवेदने देऊनही कंपनी रस्त्यासंदर्भात गांभीर्याने घेत नसल्याने याच्या विरोधात नागरिक रस्त्यावर उतरले. आज सकाळी अर्धातास नुरानी चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. शहरातील अनेक नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण शिंदे, सय्यद सादेक, चंद्रकांत शिंदे, सय्यद खालेद, तुळशीराम शिंदे, शेख अझरोद्दीन जहागीरदार, शिवाजी शिंदे, सचीन शिंदे, गणेश शिंदे, फाजलभाई, विजय निर्मळ यांच्या नेतृत्वात झाले. निवेदन स्वीकारण्यासाठी मंडल अधिकारी पाळवदे, एचपीएम कंपनीचे अधिकारी आंदोलनस्थळी दाखल झाले होते.