गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
लोढा यांच्यावर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार
नेकनूर/चौसाळा (रिपोर्टर) भीमाशंकर शुगरचे चेअरमन नितीन लोढा यांच्यावर चौसाळा येथील एका तरुणाने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना रात्री घडली असून या घटनेच्या निषेधार्थ आज चौसाळा येथील व्यापार्यांनी बंद ठेवला आहे. या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला असून लोढा यांच्यावर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणातील हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया दुपारी एक वाजेपर्यंत सुरू होती.
बीड तालुक्यातील चौसाळा येथील माजी आ. स्व. चांदमल लोढा यांचे नातू व भीमाशंकर शुगर्सचे चेअरमन नितीन लोढा यांच्यावर गावातीलच तरुणाने धारदार शस्त्राने हल्ला केला. यात नितीन लोढा हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लोढा हे 6 जून रोजी नात्यातील एका लग्नसमारंभासाठी बाहेरगावी गेले होते. रात्री साडेऊन वाजता लोढा कुटुंबिय घरी परतले. साडेदहा वाजता रणजीत गुंजाळ याने नितीन लोढा यांना फोन करून भेटायचे असल्याचे सांगितले. त्यांनी सकाळी भेटू, असे सांगितल्यावर ‘मी घराकडे येत आहे, तात्काळ भेटायचे आहे’, असे सांगितले.
त्याला भेटण्यासाठी लोढा हे घराबाहेर येताच दुचाकीवरून आलेल्या रणजीत गुंजाळने सत्तूरने वार केला. यामध्ये लोढा यांच्या चेहर्यावर जखम झाली. आरडाओरड केल्यानंतर दुचाकी घटनास्थळावर सोडून आरोपी पळून गेला होता. मात्र नेकनूर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख, उपनिरीक्षक अजय पानपाटील व सहकार्यांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडील हत्यारही जप्त केले. या प्रकरणी आज दुपारपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेच्या निषेधार्थ आज चौसाळा येथील व्यापार्यांनी बंद पुकारला होता. व्यापार्यांनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभाग घेतला होता. लोढा यांचा जबाब घेण्यासाठी नेकनूर पोलीस औरंगााबदकडे रवाना झाले होते.