पुणे (रिपोर्टर) भाजपासह बांधील शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि शिवसेनेने अस्तित्वाची करून सोडलेली कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली असून दोन्ही मतदारसंघात अत्यंत संथगतीने मतदान सुरू आहे. दुपारी एक वाजेपर्यंत कसब्यात 18.5 टक्के तर चिंचवडमध्ये 20.68 टक्के एवढे मतदान झाले आहे. सरकारने या दोन्ही जागा जिंकण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात पाच ते सहा मंत्री तळ ठोकून बसून ठेवले होते. या निवडणुकीमध्ये सायंकाळी पाच वाजता कसब्यातील काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर, भाजपा उमेदवार हेमंत रासने तर पिंप्री चिंचवडमध्ये भाजपा उमेदवार अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे, अपक्ष राहुल कराटे यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे.
कसबा पोट निवडणुकीत दुरंगी तर चिंचवड पोटनिवडणुकीत चुरशीची तिरंगी लढत पहावयास मिळत आहे. या दोन्ही पोट निवडणुकीत भाजपा व शिंदे गट यांनी आपले अस्तित्व पणाला लावले आहे तर आघाडीकडूनही मोठ्या ताकतीने या निवडणुकीत आपले अस्तित्व पणाला लावून सोडले आहे. आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. तेव्हा कसब्यातील काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर, भाजपा उमेदवार हेमंत रासने, चिंचवडच्या भाजपा उमेदवार अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे, अपक्ष राहुल कलाटे यांनी मतदानाचा हक्क बजावला. सदरच्या निवडणुकीमध्ये अत्यंत चुरस निर्माण करून सोडल्याने अवघ्या राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागून आहे. दुपारी एक वाजेपर्यंत कसब्यात 18.5 टक्के तर चिंचवडमध्ये 20.68 टक्के एवढे मतदान झाले आहे. अत्यंत संथगतीने मतदान होत असून सकाळी पिंपळ गुरव माध्यमिक विद्यालय मतदान केंद्राबाहेर दोन गटात मारामारी झाल्याचेही दिसून आले. कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदान सुरू असून सायंकाळी पाच वाजता पाच उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होत आहे.