तळपत्या उन्हात शेतकर्यांसाठी अन्नत्याग
महिला आयोग बरखास्त करा, हिवताप कर्मचारी संघटनेचे धरणे
भूमाफियांपासून जीवितास धोका; कारवाईच्या मागणीसाठी आमरण उपोषण
आम आदमी पार्टीने केला केंद्र सरकारचा निषेध
बीड (रिपोर्टर) कापसाला दहा हजार रुपये व सोयाबीनला सात हजार रुपये भाव जाहीर करण्यात यावा या मागण्यांसाठी भाई गंगाभीषण थावरे यांनी आज तळपत्या उन्हात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर अन्नत्याग आंदोलन केले तर महिला आयोग बरखास्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांनी बरखास्ती आंदोलन केले. आपच्या उपमुख्यमंत्र्यास अटक केल्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीने निदर्शने केले. शहरी हिवताप कर्मचारी संघटनेनेही विविध मागण्यांसाठी आंदोलन केले.
अतिवृष्टीचे अनुदान अद्यापही शेतकर्यांना मिळाले नाही. हे सरकार नुसतेच घोषणा करत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राज्य करायचे आणि त्याच राज्यात शेतकर्यांसाठी आंदोलन करणार्या कार्यकर्त्यांच्या आंदोलनावर बंदी आणायची, असा हुकुमशाही कारभार या सरकारचा सुरू असून शेतकर्यांचे प्रश्न घेऊन आज गंगाभीषण थावरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर तळपत्या उन्हात अन्नत्याग आंदोलन केेले.
कापसाला दहा हजार, सोयाबीनला सात हजार रुपयांचा भाव देण्यात यावा, विमा कंपनीने जे खाद्य होल्ड केले ते काढण्यात यावे यासह इतर मागण्या भाई थावरे यांच्या आहेत. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांना अटक केल्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली.
या वेळी अनेकांची उपस्थिती होती. शहरी हिवताप कर्मचारी व कामगार युनियन नगर परिषदच्या वतीनेही आंदोलन करण्यात आले. अस्थाई पदांना मान्यता आणि आकृबंधनात समावेश करावा अशी कर्मचार्यांची मागणी आहे.
जामा मस्जिद इनामी व बालेपीर दर्गाह इनामीच्या जमीनीचा बोगस खालसा, बोगस सातबारा व बेकायदेशीर खरेदी-विक्री करणार्या भूमाफियांपासून आपल्या जीवीतास धोका असून या सर्वांची चौकशी करून त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शेख सरफराज शेख बशीर हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 12 फेब्रुवारी 2023 पासून उपोषण करत आहेत. एकूणच या सर्व आंदोलनांमुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर गजबजून गेला होता.