कागदावरचा हिरकणी कक्ष पंधरा दिवसात सुरू करा, महिलांच्या तक्रारी सोडविण्यासाठी पोलीस विभागाने विशेष मोहीम राबवावी
महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकरांच्या बैठकीत सुचना
बीड (रिपोर्टर) शासकीय कार्यालये आणि खासगी आस्थापनांमध्ये कोणत्याच ठिकाणी हिरकणी कक्ष चालू नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे स्तनपान करणार्या महिलांसाठीचे हिरकणी कक्ष जे कादावर आहे ते प्रत्यक्षात पंधरा दिवसात स्थापन करावेत, ज्या पिडीत महिलांच्या अनेक तक्रारी पोलिस विभागाच्या अनुषंगाने आहेत त्या अनेक दिवसांपासून प्रलंबीत आहेत. त्यासाठी पोलीस विभागाने विशेष मोहीम राबववावी आणि या तक्रारींचा निपटारा करावा, याचाही अहवाल आयोगाला तात्काळ पाठवावा, अशा सूचना करत महिला आयोगाच्या राज्याच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी महिलांची जनसुनवाई घेतली.
आज सकाळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महिलांच्या तक्रारीच्या अनुषंगाने जनसुनवाईस सुरुवात केली. या वेळी जिल्हाधिकारी दीपा मुंडे-मुधोळ, पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, महिला बालकल्याण अधिकारी तडवी, केकाण, समाजकल्याण अधिकारी रविंद्र शिंदेंसह महिला आयोगाच्या सदस्या या वेळी उपस्थित होत्या. प्रत्येक कार्यालयामध्ये महिलांसाठी हिरकणी कक्ष स्थापन केलेला आहे. हा कक्ष कागदावरच आहे. विशाखा समित्याही स्थापीत झालेल्या आहेत, मात्र त्यांच्याकडच्या तक्रारी वेळेवर जातही नाहीत. त्यांच्याकडून सोडवणूकही होत नाही. त्यामुळे प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये हिरकणी कक्ष तात्काळ स्थापीत करावे, हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. त्यातील आरोपींची चार्जशीट पोलीस ठाण्याकडून वेळेवर न्यायालयात दाखल केल्या जात नाहीत. कौटुंबिक हिंसाचाराच्या अनेक तक्रारी आहेत, त्यांचेही गुन्हे नोंद पोलीस ठाण्याने करावेत, या तक्रारी सोडविण्यासाठी पोलीस विभागाने विशेष मोहीम राबवावी, या जनसुनावणीत शहरासह जिल्ह्यातून आलेल्या पिडीत महिलांनी आपले लेखी म्हणणे आयोगाच्या अध्यक्षांकडे सांगितले. पिडीत महिलांचे लेखी म्हणणे ऐकून घेण्यासाठी या वेळी तीन पथक करण्यात आले होते. स्वत: श्रीमती चाकणकर यांनी प्रत्येक महिलेच्या तक्रारीची आस्थेवाईकपणे दखल घेत ज्या तक्रारी पोलीस विभागाशी संबंधित आहेत त्या पोलीस अधिक्षकांकडे सोडविण्यासाठी सूचना केल्या. तर प्रशासकीय तक्रारींची सोडवणूक जिल्हाधिकार्यांनी संबंधित विभागाला लेखी आदेश देऊन अशाही सूचना या वेळी चाकणकर यांनी केले. ही जनसुनवाई जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दुपारी अडीच ते तीन वाजेपर्यंत चालणार आहे. या वेळी महिला आयोगाच्या सदस्या अॅड. संगीता चव्हाण, महिला बालकल्याण समितीच्या सदस्या अॅड. प्रज्ञा खोसरेंसह महिला बालकल्याण विभागाच्या अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.