बीड (रिपोर्टर) कोविडसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या कर्मचार्यांच्या पगारातील दीड कोटीच्या निधीपैकी 30 ते 35 लाखांचा निधी कर्मचार्यांच्या क्रीडा स्पर्धा आणि इतर बाबींवर खर्च केल्या प्रकरणी आज सकाळी जिल्हा परिषदचे सर्वच विभागातील वर्ग तीनचे कर्मचारी, अधिकारी संतप्त होत त्यांनी आमचा निधी इतरत्र का वळवला असे म्हणत सीईओंच्या कॅबिनमध्ये धाव घेतली. सीईओंनी त्यांची समजूत काढल्यानंतर हे कर्मचारी आपल्या कामकाजाला लागले.
कोविडच्या कालावधीमध्ये जिल्हा परिषदेच्या कर्मचार्यांच्या पगारातून निधी कपात करत दीड कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला होता. एखाद्या कर्मचार्याला कोरोना आजार झाला किवा दुर्दैवाने एखाद्या कर्मचार्याचा मृत्यू झाला तर शासनाकडून मिळणार्या फायद्यासह जिल्हा परिषदेच्या संबंधित कमर्पचार्याला मदत करण्यासाठी हा निधी राखीव ठेवण्यात आला होता. मात्र या दीड कोटीतून जिल्हा परिषद कर्मचार्याच्या क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांवर 20 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला व पारधी समाजाच्या घरकुलासाठी 5 लाख रुपये वळते करण्यात आले. यासह एकूण 30 ते 35 लाखांचा निधी खर्च करण्यात आल्यामुळे हे कर्मचारी संतप्त होत आमच्या हक्काचा निधी इतर ठिकाणी का खर्च केला? याचा जाब विचारण्यासाठी आज सकाळी अकरा वाजता सर्वच कर्मचारी जिल्हा परिषद सीईओंच्या कॅबिनमध्ये धाव घेतली. सीईओ अजित पवार यांनी कर्मचार्यांची एक तास समजूत काढत हा निधी उसनवारी घेतला आहे, लवकरच इतर बाबींतून या निधीची भरपाई करून तुमचा निधी तुम्हाला परत एक महिन्यात देतो, असे आश्वासन दिल्यानंतरच हे कर्मचारी आपल्या कामाला लागले.