बीड (रिपोर्टर) तु माझ्यासोबत लग्न का करत नाही? असे म्हणत 23 वर्षीय तरुणीस एक तरुण सतत त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून तरुणीने रात्री विषारी औषध प्राशन केले. तिला उपचारार्थ रात्री बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान पहाटे तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना शिवणी येथे घडली. आरोपीविरोधात कठोर करवाई करण्यात यावी, अशी मागणी मयत मुलीच्या नातेवाईकांनी केली असून मुलीचे आई-वडिल कर्नाटक राज्यात ऊसतोडणीसाठी गेलेले आहेत.
जयश्री गोरख राठोड (वय 23 वर्षे, रा. शिवणी) या मुलीचे आई-वडिल कर्नाटक राज्यातील एका कारखान्याला ऊसतोडणीसाठी गेलेले आहेत. ही मुलगी आपल्या आजी-आजोबांकडे राहत असे. या मुलीस शिवणी परिसरातीलच एका तांड्यावरील मुलगा सतत त्रास देत असे, तु माझ्यासोबत लग्न कर, असा तगादा लावत होता. मुलाच्या या सततच्या त्रासाला कंटाळून जयश्री राठोड हिने रात्री आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. तिला उपचारार्थ बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान पहाटे मुलीचा मृत्यू झाला. सकाळी जिल्हा रुग्णालयामध्ये मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणातील दोषी मुलाविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मयत मुलीच्या नातेवाईकांनी केली असून जिल्हा रुग्णालयामध्ये पिंपळनेर ठाण्याचे पोलिस दाखल झाले होते. दुपारपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.