Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeसंपादकीयकोरोनात कळलं, कोण आपलं अन् कोण परकं आधार आणि मदतीची गरज

कोरोनात कळलं, कोण आपलं अन् कोण परकं आधार आणि मदतीची गरज


जेव्हा कोवीडचा इतिहास लिहला जाईल तेव्हा वरील सर्व समाजसेवक आणि लोकप्रतिनिधीचं नाव अर्जुन घ्यावं लागेल. सुखात कुणीही सहभागी होतं. दु:खात मदत करणारे हात खरे समाजसेवा करणारे आणि माणुसकीचा दिप लावणारे असतात. कोरोनात आपलं कोण आणि परकं कोण? हे मात्र दिसून आलं.  कधी,कधी रक्ताच्या नात्यांनी दुर सारलं पण माणुसकी असणारांनी सहारा दिला,मदत केली, रुग्णालयात धाव घेवून दिलासा दिला. उपचारासाठी धडपड केली  हे विसरण्यासारखं नाही. समाजासाठी झोकून देणारी माणसं खरचं ग्रेट असतात, ती माणसं माणसांना परकं होवू देत नाही, अशी समाजसेवा आदर्शवत असते. समाजसेवा ही सगळ्यात मोठी सेवा आहे, ते सगळ्यात मोठं सुखही आहे.    
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने खुप मोठे नुकसान केले, हे नुकसान कधीच भरुन येण्यासारखे नाही. होत्याचं नव्हतं झालं. चालता-बोलता कित्येक माणसं गेली आणि आज ही जात आहेत. ही लाट काही प्रमाणात ओसरली असली तरी पुर्णंत: संपलेली नाही. सौम्य लक्षणं असलेली माणसं बरी झाली पण ज्यांना  गंभीर लक्षणं होती, ज्यांचा ऑक्सीजन कमी होत होता, ज्यांचा न्युमोनिया वाढला होता. त्यांना मात्र खुपच त्रास झाला. त्यांच्या कुटूंबांचे हाल झाले. या महामारीत  अनेक रुग्णांंच्या नातेवाईकांना मोठी आर्थिक झळ सहन करावी लागली. खाजगी दवाखान्यात उपचारासाठी मोठी रक्कम मोजावी लागते. पैसे दिल्याशिवाय उपचार होत नाहीत. महामारी म्हटलं की, त्यात मोठं नुकसान ठरलेलंच असतं. पण ती आटोक्यात आणता आली पाहिजे, रडून आणि भावनिक होवून महामारी आटोक्यात येत नसते. त्याला योग्य ते नियोजन करावे लागते. योग्य नियोजन झाले नसल्याने मोठ्या प्रमाणात लोकांचा बळी गेला.  महामारी कोणती ही असो त्यात झोकून देवून काम करणारी काही माणसं असतात. समाजात चांगली माणसं आहेत, हे वेळोवेळी दिसून आलेलं आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने या बाबत अफवा जास्त पसरवल्या जातात. त्यामुळे याचा त्रास रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना सहन करावा लागतो. ज्यांना कोरोना झाला, तेव्हाच त्याला त्या आजाराची जाण कळते. नाही तर ऐरवी लोक सहज घेतात आणि दुसर्‍यांच्या आजाराबाबत चेष्टा करत बसत असतात. कोरोनाच्या पहिल्या लाटेत समाजसेवकांनी पुढे येत लोकांना आर्थिक व साहित्याची मदत केली. आज मात्र ‘आधार’ आणि वैद्यकीय मदतीची गरज निर्माण झाली. ती मदत करण्यासाठी ज्याला जमेल त्याने पुढे यायाला हवे, पण पैशावाले आणि काही राजकीय मंडळी घराच्या आत आहेत. समाजात  असा एक वर्ग असतो, तो फक्त बघ्याची भुमिका पार पाडत असतो, आणि काही माणसं अशी असतात ती नियमीत लोकांच्या संपर्कात राहून मदतीसाठी पुढे येत असतात.
असा आमदार
लोकप्रतिनिधी कसा असावा असा प्रश्न नेहमीच उपस्थित होत आलेला आहे. निवडणुकीत कुणी ही नाटकं करुन वेगवेगळे फंडे करत असतात. मतदानासाठी कुणी शेतात शेतकर्‍यांची भेट घेत असतात, कुणी शेतकर्‍यासमोबत सेल्फी घेतात,  महिला प्रतिनिधी असेल तर ती भाकरी थापते, महिलांचे मेळावे घेवून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं फोटो काढण्यापुरते नाटकं केली जातात. मात्र जेव्हा जनतेवर संकट येतं तेव्हा नाटकं करणारे कधीच पुढे येत नसतात, ते फक्त वृत्तपत्रातून आवाहन करत असतात. घाबरु नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. घाबरण्याचं काही काम नाही. शासन तुमच्यासाठीच आहे. जिल्हा रुग्णालयात एखादा रुग्ण उपचाराविना तडफडून मेला तरी लोकप्रतिनिधीला काही देणं घेणं नसतं. बाता तर लाखाच्या मारल्या जातात. सध्या एकच आमदार चांगला चर्चेत आहे ते म्हणजे आ. निलेश लंके, हे आमदार पारनेर मतदार संघातील आहेत. या आमदारांचे भरभरुन कौतुक होत आहे. आमदार असावा तर असा, असचं त्यांच्या बद्दल बोललं जातं. लंके यांनी कोव्हीड सेंटर सुरु केलं. नुसतं कोव्हीड सेंटरच सुरु केलं नाही, तेथील रुग्णांना दिलासा देण्यासाठी ते रात्र-दिवस सेंटरमध्येच असतात, ते झोपतात देखील  सेंटरमध्येच, असा आमदार देशात आजच्या महामारीत पाहावयास मिळाला नाही. जनतेची खरी सेवा निलेश लंके हे करत आहेत.
ग्रामीण भागात आधाराची गरज
दुसर्‍या लाटेचा कोरोना खरतनाक ठरु लागला. कोरोनाने ग्रामीण भाग विळख्यात घेतला. काही गावात शंभरापेक्षा जास्त रुग्ण आढळून आले. ग्रामीण भागात मरणारांची संख्या वाढली. ग्रामीण भागातील लोकांत कोरोनाच्या बाबतीत पुर्वीपासून नकारात्मक भुमिका राहिलेली आहे. मला काही होत नाही, अशी समज, गैरसमज लोकात असल्याने लोकं अंगावर दुखणं काढतात आणि त्यामुळे आजाराची तीव्रता वाढते. रुग्ण गंभीर झाल्यानंतर दवाखान्यात जातात. त्याचा परिणाम म्हणुन एक तर संसर्ग वाढतो आणि रुग्णांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न निर्माण होतो. थोडे लक्षणे दिसले की, चाचणी केली जात नाही. ती केली पाहिजे यासाठी जागृती होणं गरजेचं आहे.  ग्रामीण भागात जागृती करण्याचं काम आमदार, खासदार, त्यांचे कार्यकर्ते, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांचे आहे. मात्र ही मंडळी ग्रामीण भागाकडे तितके लक्ष देत नाहीत. एखादी निवडणुक असती तर दिवसातून कित्येक पुढारी गावात मतासाठी आले असते. जेव्हा मदतीची गरज असते, तेव्हा मात्र कुणी फिरकेना, सगळे कसे संधीसाधू आहेत हे कोेरोनाच्या काळात दिसलं. ज्या  जनतेच्या जीवावर आपण मोठे राजकारणी झालोत याचा विसर पुढार्‍यांना पडला नाही पाहिजे, पण पुढार्‍यांना लोकांशी तितकं देणं घेणं नसतं. काही थोडे सोडले तर इतर पुढार्‍यांनी ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष केले.  लोकांच्या आरोग्याची काळजी पुढार्‍यांनी घेतली पाहिजे. मदतीसाठी पुढे आले पाहिजे. ग्रामीण भागातील लोक पॉझिटिव्ह निघाले की, बहुतांश लोकांना नेमकं कुठं अ‍ॅडमीट व्हावं याची माहिती नसते. रिपोर्ट मोबाईलवर सांगितला जातो. त्यामुळे लोक गोंधळून जातात. गावात एखादा चांगला ‘शहाणा’ माणुस असेल तर तो पॉझिटिव्ह रुग्णाला मदत करतो. शक्यतो त्याच्या मदतीला कुणी जातच नाही. केवळ नकारात्मक भावनेतून लोक कोरोनाच्या रुग्णाकडे पाहतात व त्यामुळे रुग्णात भीती  निर्माण होवून त्यांना आपण एकटेच आहोत असा भास निर्माण होतो. माणसांची जितकी चांगली विचार शक्ती आहे. तितका हा रोग तात्काळ आटोक्यात येतो, पण भीती आणि नकारात्मक विचारामुळे माणसांच्या मनात वेगवेगळे विचार येवून तो खचतो. केवळ भीतीमुळे अनेक रुग्ण दगावलेले आहेत. रुग्णांची मानसीकता चांगली ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तेच प्रयत्न होतांना दिसत नाहीत. कोरोना झाला….झाला.. म्हणुन बोंबा ठोकणारेच जास्त दिसतात. मदत आणि मार्गदर्शन करणारे कमी दिसून येत आहे. मदत आणि मार्गदर्शनाची खरी गरज आहे.
माणुसकी जाणणारे
माणुसकी जाणणारे लोक समाजात खुप कमी आहेत. बीड जिल्हयात कोरेाना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जो तो आप-आपल्या परीने मदत करत आहे.  शासकीय विभागात  चांगलं काम होत आहे. काही गैरप्रकार होत असेल तो भाग वेगळा. डॉक्टर, नर्स, पोलिस कर्मचारी रात्र-दिवस जागृक दिसतात. समाजसेवा कशी असावी याची अनेक उदाहारणे समोर दिसतात.  नावापुढे समाजसेवक लावलं म्हणजे कुणी समाजसेवक होत नाही. त्याला तसं कार्य करावे लागते. काही लोकप्रतिनिधी कोव्हीड सेेंटर उभा करुन लोकांची मदत करत आहेत.  पालकमंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे, आ. अमरसिंह पंडीत, आ. सुरेश धस, आ. विनायक मेटे, बाळासाहेब आजबे, कुंडलीक खांडे, जमियत उलेमा यासह अन्य काही लोकप्रतिनिधींनी आणि संघटनेने केव्हीड सेंटर सुरु केले आहे. ही चांगली गोष्ट आहे. इतर पुढारी कुठं  दिसेना? बीड शहरातील सगळ्यात चांगली कामगिरी बजावणारी जोडी म्हणुन अमर नाईकवाडे आणि फारुक पटेल याचं नाव घ्यावं लागेल, हे दोघे  गेल्या दीड वर्षापासून जिल्हा रुग्णालयात चांगलं काम करतात. ज्या वेळी रुग्णांच्या जवळ कुणी जात नव्हतं, हे दोघे अगदी सहज रुग्णाजवळ जावून त्यांची विचारपुस करुन त्यांना आधार देत मदत करत होते, समाज सेवक कसे असावेत याचं हे दोघे जिवंत उदाहारण आहेत. कसलाही गाजावाजा न करता ते निष्ठेने काम करतात. त्यांची समाजसेवा म्हणजे माणुसकीचा वाहता झराच आहे. कोरोनामुळे मरण पावल्यानंतर मृतदेहा जवळ कुणी जात नाही. बीड येथील ज्येष्ठ नेते मोईन मास्टर व त्यांची टीम मुस्लिम समाजातील व्यक्ती कोरोनामुळे मरण पावल्यानंतर मृतदेहावर तकीया मस्जिद याठिकाणी दफनविधी करतात. गेल्या दीड वर्षापासून ते हे कार्य करत आहेत. त्यांच्या धाडसाचं कौतुक करावं तितक कमी आहे, ही सगळ्यात मोठी समाजसेवा आहे. पत्रकारितेसोबत समाजसेवा करणारे पत्रकार  भागवत तावरे हे गेल्या दीड वर्षापासून कोवीडच्या काळात काम करतात. भाकरी वाटपापासून ते ग्रामीण भागातील लोकांची तपासणी करुन घेण्यापर्यंत त्यांचं काम सुरु आहे, ते आणि त्यांची टिम हे काम करत आहे. त्यांच्या या कार्याला सलामच करावा लागेल.  वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. ढवळे, डॉ. राऊत यासह अन्य काही डॉक्टर  मंडळी मोफत उपचार करत आहेत. बळी गवते सारखे तरुण आपल्या गावातील नागरीकांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. मोहन जाधव, संगमेश्वर आंधळकर,राजेश शिंदे, पत्रकार बालाजी मारगुडे यांचंही रुग्णांच्या मदतीसाठी मोलाचं योगदान आहे. पाटोदा येथील बाळा बांगर यांचं काम  अंत्यत चांगलं आहे. त्यांच्या कामाची सर्वत्र चर्चा होवू लागली. ज्यांच्या नातेवाईकांनी कोरोना झालेल्या आपल्या माणसांना वाळीत टाकलं अशांच्या मदतीला पाटोद्यात बांगर धावून जातात.  त्यांचे धाडस आणि काम करण्याची पध्दत वेगळीच असून त्यांच्यामुळे अनेकांना आधार मिळाला. तात्काळ लोकांच्या मदतीला धावून जाणारा समाजसेवक म्हणुन बाळा बांगर यांची पाटोद्यात ओळख निर्माण झाली. स्वत:च्या खर्चातून ते लोकांना मदत करतात ही खुप मोठी बाब आहे. अगदी जिवाची पर्वा न करता बांगर हे समाजासाठी काम करतात. जेव्हा कोवीडचा इतिहास लिहला जाईल तेव्हा वरील सर्व समाजसेवक आणि लोकप्रतिनिधीचं नाव अर्जुन घ्यावं लागेल. सुखात कुणीही सहभागी होतं. दु:खात मदत करणारे हात खरे समाजसेवा करणारे आणि माणुसकीचा दिप लावणारे असतात. कोरोनात आपलं कोण आणि परकं कोण? हे मात्र दिसून आलं.  कधी,कधी रक्ताच्या नात्यांनी दुर सारलं पण माणुसकी असणारांनी सहारा दिला,मदत केली, रुग्णालयात धाव घेवून दिलासा दिला. उपचारासाठी धडपड केली  हे विसरण्यासारखं नाही. समाजासाठी झोकून देणारी माणसं खरचं ग्रेट असतात, ती माणसं माणसांना परकं होवू देत नाही, अशी समाजसेवा आदर्शवत असते. समाजसेवा ही सगळ्यात मोठी सेवा आहे, ते सगळ्यात मोठं सुखही आहे.

Most Popular

error: Content is protected !!