बा अद बा मुलाहीजा, होशियार….. साव सुधाच्या बोधात टक्केवारीच्या शोधातले पालक अतुल सावेकृत बहुरंगी लोकनाट्य! सहभाग- लाख कोशीश करलो मुझे बदनाम करने की म्हणत, धनुभाऊ भाजपाच्या असंतुष्ट फर्ड्या वक्त्या पंकजा मुंडे, धरणीमाता जागा दे, कुठल्या तरी पक्षात प्रवेश दे, म्हणत याचना करणारे ‘क्षिरा’च्या सागरातले जयदत्त…. आष्टीच्या दुष्काळात उभारलेले धस‘कट’…. पंडितमुक्त गेवराईचे अन् शक्ती लागता लागता राहिलेले ‘लक्ष्मण’ राजेच्या राजेपणात पराजयाचे साजेपण असलेले अमरसिंह….रोज पक्ष बदलीचे ‘प्रकाश’ पाडणारे सोळंके…. मार्तृत्वाच्या ओझातल्या ‘नमिता’ ताईंच्या ऐकण्यातल्या प्रितम… ‘मै हू डॉन’चा गजर आणि डान्स मास्टर संदीप क्षीरसागर…. उद्ध्वस्त पक्षातल्या आणि खासदारकी खिशातल्या…. पाटीलवाड्याच्या रजनी…. सादर करत आहेत….
होळी रे होळी, पुरणाची पोळी..! थोरल्या घरच्या हाती विनापक्षाची जोडी….बोंबला रे बोंबला, कापूस-कांद्याला भाव न देणार्या सरकारला लोंबवा…होळीच्या लाकडाचा विटी-दांडू, इथे कोण गांडू, आंडू, पांडू…शिंदे-फडणवीसांची खसखस पिकली, ठाकरेंची कंबर वाकली…बोंबला रे बोंबला म्हणत कारटे गल्लीबोळात गोंधळ घालत होते. तेवढ्यात बोक्याचं भांडण-कोल्ह्याच मटण, शेतकर्यांच्या माथी मात्र सरण म्हणत सरकारच्या नावाने आणखी एक आरोळी उठली. तसं मी फेसबुक, व्हॉटसअॅप, इन्स्टा, ट्विटर बोक्याचं भांडण-कोल्ह्याचं मटणची टिवटिवी ऐकली आणि पाहिली होती. गल्लीबोळात या लोकनाट्याचे पोस्टर लागले होते.
या विचारात असतानाच कोंबीचा रस्सा लागतो कसा, जलजीवनच्या अधिकार्याला पुसा, कोंबडीची टांग लागती छान, खायची असेल तर पालकमंत्र्याला सांग म्हणत नाटकाचे प्रमोशन करणारी गाडी गल्लीतून जाताना दिसली. म्हटलं चला आपण उठावं, स्नान संध्या करावी, अन नाटक कुठं हाय ते पहावं. स्नान संध्या उरकून होळी पेटवत तिला नैवेद्य दाखवून दोन दोन हातांनी व्यवस्थेविरूध्द बोंब ठोकून मी रिकामा झालो. पुरणपोळी, गुळवणी, आमटीचा फुरका मारत जेवण केले अन निघालो मी नाटकाच्या स्थळाकडे. रस्त्याच्या कडेला लागलेल्या बोक्याचे भांडण-कोल्ह्याचे मटणच्या पोस्टरवर नजर गेली. स्थळ दिसून आले, ते होते नाट्यगृहाचे…तसा मी नाट्यगृहाच्या दिशेने पायी निघालो. वाटेत होळीसाठी लाकडे जमा करणारी पोरं आचरट विचरट बोलून दोन दोन हातांनी बोंबलत होते.
मी साठे चौकात आलो तेव्हा बसस्थानक परिसरातून एक टोळकं येताना दिसले. ते त्यांच्या धुंदीत होते. आरडाओरड आणि बोंबाबोंब सुरू होती. त्यातला एक म्हणाला, एकनाथाची वर्षा काय म्हणती, शेतकरी नवरा नको म्हणती. म्हटलं आता हा एकनाथ कोण आणि वर्षा कोण? पण लगेच लक्षात आले एकनाथ म्हणजे मुख्यमंत्री आणि वर्षा म्हणजे त्यांचे निवासस्थान. म्हटलं कारटे काय बोंब मारतील याचा नेम नाही. तेवढ्यात दुसरा बोंबलला, अमरत्वाच्या नावाला कंबरेत वाकवा, विजयाचा गुलाल कपाळी चिटकवा, विजयाचं राजेपण पराजयाच्या कानी, शिवछत्राची ही अमरकहाणी…आता मात्र मला अवघड होवून बसलं होते. पोरं कही पे निगोह कही पे निशाणा मारत होते. आणखी एकाने देवइंद्राच्या नावाने आरोळी दिली. फसवणीसाच्या शेंडीत चिक्कीताई अडकली, ना मान ना पान म्हणून रोज भडकली. आता मात्र कहर झाला होता. मी साठे चौकातून पुढे शिवाजी चौकात आलो.
तेव्हा तिथे आणखी एक टोळकं येणार्या जाणार्यांची वात्रट बोलण्यातून छेड काढत होते. त्यातल्या एकाने मुझे बदनाम मत करो, मै तो प्यार का राही हू, अशा आशयाचे फलक हाती घेवून उंचावले होते. त्या फलकातला बोध शोधताना माझ्या नाकीनऊ आले. मात्र जेव्हा चल धन्नू तेरी इज्जत का सवाल है, बसंती तो नाचेगी, चिल्लायेगी यावर पोरं मोठमोठ्याने बोंब ठोकत होते. तेव्हा मात्र त्यांचा उंगली निद्रेश हा परळीच्या दिशेने होता. तिथली ती परिस्थिती आणि बोंब पाहता मी कडेकडेने तहसिलच्या बाजूने थेट नाट्यगृह गाठलं.
म्हटलं, अतुल सावेकृत बोक्याचं भांडण-कोल्ह्याचं मटण हे नाटक जिथे होणार आहे ते नाट्यगृह तरी कसे? प्रत्यक्षात जेव्हा नाट्यगृहाकडे पाहिलं तेव्हा तोंड सुंदरीसारखं बैठा व्यवस्था मोरीसारखी दिसली. अनेकठिकाणी अस्वच्छता, एसी बंद, खुर्च्या तुटलेल्या. म्हटलं, क्षीराच्या सागरात हे धुवून नव्हे तर वाहून गेले. जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत एखादी चांगली खुर्ची पाहिली आणि तिथेच आपण नाटकाला बसायचे ठरवून मी परतलो. उद्या नाटक कसे होईल? अतुल सावेकृत बोक्याचं भांडण-कोल्ह्याचं मटण या नाटकाचे नायक कोण असतील? क्षीरसागर, पंडित, मुंडे की धस? व्हिलन कोण असेल? ताई-बाई आक्का, की गणपत पाटलाचा रोल कोणाला दिला असेल? असे एकना अनेक प्रश्न डोक्यात घुमत होते. नाटकाच्या शिर्षकावरून हमाम मे सब नंगे दिसून येत होते.
गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा चित्रपटाची आठवण येत होती. इथं आम्हाला बीडातल्या गोंधळाची अन ममईच्या मुजर्याची आठवण येण्यापेक्षा मोडलिग आणि जामखेडची अधीक आठवण येवून जात होती. सरपंच असो वा जिल्हा परिषदेचा सदस्य असो…त्याचं नातं जामखेड, मोडलिंगची कायम असतं. घरात बायकांच्या केसांना गजरा नसतो मात्र यांच्या हातात गजरा असतो. असो….मी भरकटलो, मनोमनी म्हणत पुन्हा उद्याच्या नाटकावर आलो. सायंकाळ झाली होती. रात्रीचं जेवण केले. शतपावली केली. अन धरणी मातेच्या कुशीत निजलो. कारण उद्या धुरवडीच्या निमित्ताने कोण कुठे निजल, पालथं पडल, कोणाच्या दांड्या वर होतील? हे सांगणे मुश्कील होतं. दरवर्षी गाण्याच्या भेंड्यात. चपटी, बोटी, हातभट्टी, देशी, विदेशी, रम, मठ्ठा, थंडाई, घोठ्यात साजरी होणारी धुरवड औंदा नाटकाच्या रूपात होते. पंधरा वर्षाच्या कालखंडात आयोजक पालकाने प्रथमच हा बदल केला होता. म्हटलं सर्व मातब्बर इथं येणार, नाटकातल्या कलाकुसरी दाखवणार पण यांच्या खाण्या पिण्याचे काय? म्हणून मी तेवढ्या रात्री पालकाच्या पीएला फोन केला. त्यांच्या खाण्या-पिण्यापेक्षा माझ्या पोटपाण्याचा विचार आला होता. त्याने कार्यक्रम झाल्यावर सर्वकाही मिळेल. खायचं, प्यायचं अन झोपायचं. मी म्हटलं, खाणं-पिणं ठिक, झोपण्याची व्यवस्था सर्वांसाठीच केली आहे का? माझ्या झोपण्याच्या व्यवस्थेच्या प्रश्नावर पीए खडबडला, गडबडला अन म्हणाला तुम्ही उद्या कार्यक्रमाला या हो…
सकाळी झाली, झोपेतून उठलो, स्नानसंध्या उरकून थेट नाट्यगृहाकडे निघालो. मला माहित होतं आजचं नाटक हे नाटकी कलावंत करणार आहेत. त्यामुळे त्यातून बातमी तर मिळणारच म्हणून मी नाट्यगृहाच्या गेटवर थांबलो. कार्यक्रमाचा वेळ 11 चा होता. पावणे अकरा झाले आयोजक आलेले नव्हते. जिल्हा बाहेरून आयोजक येणार असल्याने तिथली जबाबदारी आष्टीतल्या धसमुसळ्या माणसाकडे दिली होती.
त्यामुळे सुरेश धस जरा लवकरच नाट्यगृहाकडे आले. व्यवस्था पाहिली, त्यांना साद घालण्याहेतू गेवराईचे लक्ष्मणअण्णा त्याठिकाणी आले. दोघांचा रामराम शामशाम झाला. कोण आल्यावर किती अन कुठं वाकायचं? कोण आल्यावर कमरेचं सोडून डोस्क्याला बांधायचं? हे त्यांनी आधीच ठरवलं. हे दोन्हीही आयोजकांचे हस्तक दुरूस्त मस्तकाने कार्यक्रमाचे आयोजन ठरू पाहणार होते. नाटकात विघ्न येणार नाही, बोक्याच्या भांडणात कोल्ह्याचं मटण आपल्या आयुष्यात शिजणार नाही याचीही त्यांना दखल घ्यायची होती.
तेवढ्यात या नाटकाचे आयोजन जिल्ह्याचे पालक अतुल सावे त्याठिकाणी आले. त्यांना व्यवस्थेची माहिती देत असतानाच आष्टीवरून आजबे त्याठिकाणी केव्हा पोहोचले ते आम्हालाही कळले नाही. कार्यक्रम अवघ्या काही क्षणात सुरू होणार परंतू कलाकार आपापल्या तोर्यात येत होते. थोरल्या घराच्या धाकल्याला नाट्यगृह लांब नव्हतं परंतू मै हू डॉनचा डान्स बसवून बसवून अन डोळ्याला ऐनक बदलून बदलून धाकलं पार थकून गेलं होतं. धाकल्याची गाडी आली अन भैय्या म्हणत सर्वांनी चिकनी सुपारी चिक चिक करती, क्षीरसागरांच्या धाकल्याला विजयाची भरती…मी म्हटलं, बरं झालं यमक बदललं, नाहीतर इथं बदाबदाच झालं असतं. संदिपभैय्या पाठोपाठ हम तो तंबू मे बंबू लगाये बैठे गाणं वाजवत शेलाटीसारखे लांबलचक लंबू पंडितांचे अमरभैय्या नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारावर आले. त्यापाठोपाठ बंडखोरीसदृश्य भलामोठा प्रकाश दिवसाढवळ्या पडला. पण तो ना अमरसिंहांना दिसला, ना संदिपभैय्यांना दिसला. तो प्रकाश थेट सुरेश धसांच्या आखमिचोलीत सामावून गेला. पुरूष कलावंत सर्व आले होते. आता महिला कलाकार कोण येतात याकडे सर्वांचे लक्ष असतानाच दिवसाढवळ्या अंधारसदृश्य परिस्थिती निर्माण होताना दिसून आली. तेव्हा रजनी झाली की काय? असे वाटत असतानाच पाटीलवाड्याच्या पाटलीन बाई गाडीच्या खाली उतरल्या. पाठोपाठ लेकरूवाळ्या नमिता यांची गाडी त्याठिकाणी आली.
आता मुख्य आणि स्फोटक कलावंत उरले होते. ताईंच्या स्वागतासाठी प्रितमच्या गालिछाची व्यवस्था करण्यात आली होती. आता सर्वांचे लक्ष या नाटकाच्या मुख्य कलावंतांकडे होते. कोण हेलिकॉप्टरने येणार? कोण गाडीने येणार? यावर चर्चा होत असतानाच खाल्याकडून धनुभाऊ तर वरल्याआडून पंकूताई नाट्यगृहाच्या गेटवर आल्या. आता थोरल्या घरचे थोरले यायचे राहिले होते. त्यांचे आधीच तळ्यात मळ्यात असल्याने ते येतील की नाही हे वाटत असतानाच अन ते आले. नाटकाला अर्धातास उशिर झाला. तसे हे दोघे थेट व्यासपिठावर पोहोचले. प्रेक्षकांनी नाट्यगृह खचाखच भरलं होतं. इथे हौशे नौशे अन गौशांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. कोणी आंबट शौकीन तर कोणी चावट चोथे इथे येवून बसलेले होते. मी माझ्या खुर्चीवर जावून बसलो. तिकडे व्यासपिठावर सर्वांनी एकमेकांना नमस्कार चमत्कार केला. नाटकाला सुरूवात होईल असे वाटत असतानाच प्रेक्षकातून आवाज आला, जलजीवन माया कोणाच्या कुशीत, टक्केवारीची काया कुणाच्या खिशात? जलजीवनमध्ये ज्यांनी ज्यांनी टक्केवारी घेतली त्यांचे मन खजील झाले मात्र चेहर्यावर त्यांनी ते दाखवून दिले नाही. तसा सुत्रसंचालन कर्त्याचा आवाज घुमला. ऐका आणि आवाजाकडे लक्ष द्या. बोक्याचं भांडण-कोल्ह्याचं मटण सादर करत आहेत अतुल सावे. सुत्रसंचालन कर्त्याच्या या आवाजावर टाळ्याच्या कडकडाटासह टक्केवारी..टक्केवारीचा आवाज घुमला अन अतुल सावेंना खजीलपणा वाटला. मनातली मनात पुटपुटताना ते म्हणाले, खाया-पिया कुछ नही ग्लास फोडा बाराना. नाटकाला सुरूवात झाली, म्हटलं, वग असेल परंतू इथं ऑर्केस्ट्रा टाईप गाणे गायीले जाणार होते. सुरूवातीला कोण गाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागुन असतानाच आष्टी-पाटोद्यात लॉटरी लागलेले आजबेंचे बाळ उठले. अन बडबड गिती गाऊ लागले
छडी लागे छम छम छम
विद्या येई घम घम घम
मोठ्या मोठ्या मिशा
डोळे एवढे लाल
मी शरद पवारांचा बाळ
आपली निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न आजबेंनी बाळबोाधातून करून दाखवला. त्यांच्या या गाण्याला त्यांच्या कामासारख्याच तुटपूंज्या टाळ्या मिळाल्या. पहिलेच गाणे पडल्याने अतुल सावेकृत नाटकाचा बोजवारा उडणार असे वाटत असतानाच ढोल उचलत सुरेश धस पुढे आले. अन त्यांनी पहाडीपण भरल्या आवाजाने गायला सुरूवात केली.
गरिबाने ताटातुट केली आम्हा दोघांची, झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची, वेळ होती ती भल्या पहाटची, बांधाबांध झाली भाकरतुकड्याची, घालवीत निघाली मला माझी मैना, चांदणी शुक्राची, जामगाव दरी येताच कळी कोमजली तिच्या मनाची, शिकस्त केली मी तिला हसवण्याची, खैरात केली पत्राची, वचनाची, दागिण्याने मढवून काढण्याची, बोली केली शिंदेशाही तोड्याची, साज कोल्हापूरी वज्रटिक, गळ्यात माळ पुतल्याची, बोली केली पायात मासोळ्या, दंडात ईळा आणि नाकात नथ सर्ज्याची परि उमलली नाही कळी तिच्या अंतराची, आणि छातीवर दगड ठेवून वाट धरली होती मी मुंबईची.
मैना खचली मनात
ती हो रूसली डोळ्यात
नाही हसली गालात
हात उंचावून उभी राहिली
माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतेय काहिली
या गाण्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. धसांच्या धासू परफॉर्मसवर सर्वांचेच तनमन आपल्या घराकडे वळाले. तसे टाळ्यांचा कडकडाट पाहून अतुल सावेही सावरले. या गाण्यावर उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्यावर पंडितमुक्तीचा नारा घुमला. तसे लक्ष्मण पवार समोर आले.
मी साधा भोळा सच्चा,
मला म्हणतात विरोधक लुच्चा
त्यांच्या कमरेचा फाडेल कच्चा
या अर्थअनार्थाच्या गिताने समर्थकांकडून टाळ्या मिळाल्या खर्या तशा नमिता उठल्या. अन अंगाई गित गाऊ लागल्या.
बा नीज गडेऽ नीज नीज लडिवाळा
पाळणा लवांकुश बाळा
मी वासंती आळविते अंगाई
छकुल्रांनो तुमची ताई, तुमची ताई
त्यांच्या अंगाई गिताला तसा प्रतिसाद मिळाला खरा, परंतू कार्यक्रमात पून्हा निष्तेजता आली. प्रेक्षक गोंधळून गेले. कार्यक्रम चांगला म्हणावा की वाईट या चर्चेत असताना पहिले तुम पहिले तुमचा नारा व्यासपिठावर घुमत राहिला. प्रत्येकजण आधी तुम्ही आधी तुम्ही म्हणत असताना पुण्याची रजनी पाटलाच्या चरणी राहिलेल्या आणि उध्वस्त पक्षात खुलत असलेल्या रजनीताई उठल्या. त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागुन होते. अनेकांना लावणीची प्रतिक्षा होती. ताई लावणी म्हणतील का? त्यांना लावणी येत असेल का? या प्रश्नचिन्हात अडकलेल्या प्रेक्षकांना आपल्या ठसक्यादार लावणीतून घायाळ करत रजनीताईंनी सुर धरला अन सवाल जवाबातला सवाल विचारला.
पंचांग सांगता जलम गमविला उगाच सांगता काय भिती, अन चंद्रकोरीपुढे तुमचा काजवा चमकून चमकलं तरी किती, पोथ्या पुरान वाचून अक्कल वाढली असंल अती, तर चंद्राच चांदणं शितल का उष्ण का सांगा हो मज प्रती, लावणीतले सवाल विचारून रजनीताईंनी व्यासपिठासह प्रेक्षकांना अबोल केले. प्रत्येकजण या सवालाचे उत्तर शोधत असताना प्रितमताईंनी पुढे येवून उत्तर द्यायला सुरूवात केली. प्रितमताई म्हणाल्या,
तुझ्या गं सवालाचे उत्तर देते मी, क्षयी कोर तु सुर्यापुढची केज ओकिशी किती गं… विरहामध्ये उष्ण चांदणे…शितल पती संगती गं… प्रितमच्या या उत्तराने भल्या रजनीत पहाट झाली. अन व्यासपिठासह प्रेक्षक गॅलरीत टाळ्यांची ललकारी उठली. प्रितमच्या या जबाबावर पंकूताईंनी स्माईल दिली. तसे अमरसिंह पुढे आले अन गीत गाण्यापेक्षा पोवाड्याला महत्व देवू म्हणत डफावर थाप दिली. अन ते पोवाडा गावू लागले.
गोदावरी तिरी पराभव झाला विजयाचा,
तो छावा पंडितांचा पंडितांचा…
आज मितीला जयाची हो आस
लक्ष्मणाला लागणार शक्ती ही बाब खास…
अमरसिंहाच्या या आत्मग्लानी पोवाडानामीवर काहींनी टाळ्या दिल्या तर काहींनी आपापसात चर्चा करत राजकीय समिकरण जुळवण्यास सुरूवात केले. बर्यापैकी गाणे झाले होते. आता सर्वांचे लक्ष पुढच्या गाण्यावर होते तसे नाटकात एक जाहिरात पडली. उंचे लोग, उंची पसंत हे वाक्य ऐकताच प्रेक्षकांनी प्रकाशदादा गाणं म्हणण्यासाठी समोर येणार हे ओळखून घेतले आणि दादा आपल्या छोट्या पावलांनी आणि मोठ्या वजनाने व्यासपिठावर आले. परंतू गेल्या काही दिवसापासून त्यांचं मन वडाये वडाये होत असल्याने ते गाणं न म्हणता तोंडातला तोबरा चघळत प्रेक्षकांना नमस्कार केला अन ते जाग्यावर जावून बसले. प्रकाश सोळंकेंचा हा अबोलपणा जेवढा व्यासपिठावरच्या राष्ट्रवादीला खटकला. तेवढ्याच गुदगुल्या भाजपशासीत सेवकांना झाल्या. आता कार्यक्रम शेवटच्या टप्यावर येवून पोहोचला होता. कोण कुठलं गाणं म्हणेल? कारण आता शिल्लक राहिले होते ते कोण वादग्रस्त, कोण वरदहस्त तर कोण आधातले ना मधातले? सुत्रसंचलन करणारा असे वक्तव्य करत असताना जयदत्त क्षीरसागर पुढे आले.
नशिबाने करणी ही केली
कुठल्या पक्षात वरणी न मिळाली
म्हणत धुसमुसू लागले, घसा कोरडा पडला तसा झिलक्याने पाण्याचा ग्लास त्यांच्यासमोर धरला. पाणी गटागट पेत जयदत्तअण्णा खुर्चीवर जावून बसले. प्रेक्षकांना टाळ्या वाजवाव्यात की न वाजव्या, गाणं आहे की संपलं हे अण्णांच्याच परिस्थितीनुसार समजायला मार्ग उरला नाही. तेवढ्यात मै हू डॉनचा स्वर कानी पडला तसा संदिपभैय्या डान्सची एकच स्टेप्स करत स्टेजवर आले. संदिप क्षीरसागर कुठले गाणे म्हणणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र संदिपभैय्यांनी केवळ पुष्पा, झुकेगा नही साला….असा डायलॉग मारला अन ते आपल्या खुर्चीवर जावून बसले. तशा पंकजाताई पुढे आल्या आणि त्यांनी
मी शेरणी परळीची,
माझी केली शिकार
फसवणीसाच्या देवइंद्राला
घेरतील अनेक विकार
असा शाप देत पंकजाताई खाली बसल्या. आता धनंजय मुंडे कुठलं गीत गाणार? ताईच्या गाण्याला उत्तर देणार का? त्यांच्या दु:खात सहभागी होणार का? की शरद पवारांच्या कार्यप्रणालीची स्तुतीगुमने ऐकवणार? या विचारात असतानाच धनंजय मुंडे समोर आले. अन म्हणू लागले,
मुझे लाख कोशिश करलो बदनाम करणे की, मै जब जब बिखरा हू, तब तब दुगनी रफ्तारसे निखरा हू
मुंडेंच्या या शेरशायरीवर लोक टाळ्या वाजवत असतानाच बोक्याचं भांडण-कोल्ह्याचं मटण नाटकाचे सर्वासर्वे अतुल सावे उठले. अन सरळ सरळ जाहिर आभार मानताना टक्केवारीचे गणित सांगून ते बीड जिल्ह्याच्या व्यासपिठाशी नतमस्तक झाले. पडदा पडला. प्रेक्षक नाट्यगृहाबाहेर मी खाणपिणाच्या ठिकाणाकडे वळलो. व्हेज, नॉनव्हेजच्या पदार्थाचा घमघमाट येत होता. चपटी, हातभट्टी, देशी, विदेशी, रम, घोटा, थंडाईचे ग्लास काठोकाठ भरले होते. प्रत्येकाने एक एक ग्लास हातात घेतल. चिअर्स केला आणि भूकेल्या पोटाने ढसाढस ढोसून घेतला. वेळ बराच झाला होता. जो तो पिण्याचा आणि खाण्याचा आस्वाद घेत होता. कुणाचा तोल जात होता तर कोण गमे ऐ जुदाई म्हणून दाखवत होते.