सौदी, रशियासह या देशांनी घेतला धक्कादायक निर्णय
मुंबई (रिपोर्टर) देशात आणि राज्यात वीज, टोल आणि औषध दरवाढ झाल्यानंतर आता देशात पेट्रोल आणि डिझेलचे मोठ्या प्रमाणावर भाव वाढण्याची दाट शक्यता असून कच्च्या तेलाच्या भाववाढीबरोबर सौदी अरेबियाने केलेल्या अनपेक्षित घोषणेचे या दरवाढीवर गंभीर परिणाम होणार असल्याचे सांगण्यात येते.
देशात पेट्रोल डिझेलच्या किंमतींमध्ये गेल्या वर्षभरापासून काहीच बदल करण्यात आलेला नाहीय. बॅरलचा दर घसरला तरी कंपन्या किंमत कमी करत नव्हत्या. उलट जेव्हा वाढत होता तेव्हा दिवसागणिक इंधनाचे दर 30-35 पैशांनी वाढविले जात होते. आता पुन्हा ते दिवस परतण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामागे सौदी अरेबियाने अमेरिकेसह सर्वांना अनपेक्षित असलेली घोषणा केल्याचे कारण आहे. जगातील सर्वाधिक कच्चे तेल उत्पादन करणार्या देशांमध्ये सौदी अरेबियाचा समावेश आहे. सोमवारी बाजार सुरु होताच कच्च्या तेलाच्या किंमतीत सहा टक्क्यांची वाढ झाली. सौदी अरेबियासह ओपेक देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन दररोज 10 लाख बॅरलनी कमी करण्याची घोषणा केली आहे. यामुळे वेस्ट टेक्सस इंटरमीडिएट कॉन्ट्रॅक्ट (थढख) ची किंमत 80.01 डॉलर प्रति बॅरलवर गेली. तर ब्रेंट क्रूडची किंमत 5.67 टक्क्यांनी वाढून 84.42 डॉलर प्रति बॅरलवर गेली आहे. कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात करणार्यांमध्ये सौदीसह इराक, युएई, कुवेत, अल्जेरिया आणि ओमान हे देश आहेत. ऑक्टोबरनंतरची मोठी कपात आहे. तेव्हा ओपेक प्लस देशांनी दररोजच्या उत्पादनात 20 लाख बॅरल कपातीची घोषणा केली होती.