बीड (रिपोर्टर) राज्यभरातील नायब तहसीलदार आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. नायब तहसीलदार यांच्या मागण्या राज्य सरकारकडून सोडवल्या जात नसल्याने त्यांनी कामकाजावर बहिष्कार टाकत आंदोलन सुरू केले आहे तर माजी सैनिकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यामध्ये अनेक माजी सैनिकांचा सहभाग होता.
नायब तहसीलदार यांना वर्ग 3 मधून वर्ग 2 (ब)चा दर्जा शासन निर्णय दि. 13-11-1998 अन्वये दिलेला आहे. मात्र त्यांचे वेतन अद्यापपर्यंत वर्ग 3 च्या कर्मचार्यांप्रमाणेच आहे. त्यामुळे नायब तहसीलदार ग्रेड पे वर्ग 2 च्या राजपत्रित अधिकार्यांप्रमाणे 4800 करणे या मागणीसाठी आजपासून नायब तहसीलदार संपावर गेले आहेत. या संपामध्ये जिल्ह्यातील सर्व नायब तहसीलदार सहभागी झाले तर त्रिदल सैनिक सेवा संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर माजी सैनिकांनी मोर्चा काढला होता. माजी सैनिकांच्या मागण्यांकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत असल्याने जंतरमंतर या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी बीडमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. यात अनेकांचा सहभाग होता. दरम्यान सेवानिवृत्त माजी सैनिकांच्या संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तर नायब तहसीलदार यांनी कामकाज बंद करून आंदोलन सुरू केल्याने त्याचा परिणाम कार्यालयीन कामकाजावर झाल्याचे दिसून आले.